Tuesday, 9 July 2024

नॅनो संमिश्रापासून सौर ऊर्जा उपकरण निर्मितीच्या

अभिनव संशोधनाला यू. के. सरकारचे पेटंट

 शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

डॉ. क्रांतीवीर मोरे


डॉ. सागर डेळेकर

कोल्हापूर, दि. ९ जुलै: अतिसूक्ष्म अशा नॅनो-संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या अभिनव स्वरुपाच्या बाईंडरविरहित उपकरण तयार करण्याच्या पद्धतीला यू.के. सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतीवीर मोरे आणि डॉ. सागर डेळेकर यांनी ही पद्धती विकसित केली आहे.

या संशोधनाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. मोरे म्हणाले, सौरऊर्जेचे उत्पादन हे त्या उपरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवर अवलंबू असते. ते उपकरण बनवण्यासाठी वापरली जाणारी पद्धतीही तितकीच महत्त्वाची असते. त्या दृष्टीने वेगवेगळ्या अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारे नाविन्यपूर्ण उपकरण कमीत कमी वेळेमध्ये आणि अल्पखर्चामध्ये तयार करण्यात यश आले आहे.  कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईड या नॅनो मूलद्रव्यांचा वापर हे उपकरण बनवण्यासाठी करण्यात आला. या उपकरण निर्मितीच्या नव्या पद्धतीमुळे सौर ऊर्जाक्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळेल. सदर उपकरण हे कमीत कमी तापमानामध्ये अत्यल्प वेळे बनवता येते. तसेच ते सुलभ रितीने हाताळता येते. सौरऊर्जा  निर्माण करण्याकरिता हे उपकरण आणि ते तयार करण्याची पद्धत सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल, अशी खात्री डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. डॉ. मोरे यांचे संशोधन क्षेत्रातील हे चौथे पेटंट आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. सागर डेळेकर म्हणाले, ऊर्जेचे  संकट ही जागतिक स्तरावर भेडसावणारी प्रमुख समस्या आहे. ऊर्जेचे विविध पर्याय शोधणे हा त्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. त्यासाठी सौरऊर्जा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. शेतीसोबतच दैनंदिन जीवनात सौरउपकरणांचा अधिकाधिक वापर केला, तर बरीचशी कामे कमी खर्चा होऊ शकतात. जगावरील ऊर्जेचा ताणही कमी हो शकतो. बदलत्या काळानुरूप आपण सौर ऊर्जेचा वापर वाढविला पाहिजे. सद्यस्थितीत सौरऊर्जा उत्पादनाचा खर्च हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. म्हणूनच कमीत कमी खर्चामध्ये सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या नाविन्यपूर्ण उपकरण निर्मितीचे द्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संशोधन केले. त्यातून अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणारी नाविन्यपूर्ण बाईंडरविरहित उपकरणाची पद्धती विकसित केली. या पद्धतीला भारत सरकारबरोबरच आता यू. के. सरकारचेही पेटंट मिळाले आहे, ही आनंदाची बाब आहे.

या संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या संशोधकांची अभिमानास्पद कामगिरी: कुलगुरू डॉ. शिर्के

ऊर्जेची समस्या ही आज जागतिक स्तरावर भेडसावत आहे. त्यावर विविध उपाययोजना करण्यासाठी जगभरातील संशोधकांनी प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये सुरवातीपासूनच शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामध्ये आता या नॅनो संमिश्रापासून बाईंडरविरहित सौरऊर्जा उपकरण निर्माण करण्याची नवी पद्धती शोधून डॉ. क्रांतीवीर मोरे आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. सागर डेळेकर यांनी मोलाची भर घातलेली आहे. या संशोधनास यू.के. पेटंट जाहीर झाल्याने संशोधनाच्या दर्जावरही जागतिक मोहोर उमटली आहे. संशोधकांची ही कामगिरी अभिमानास्पद असून उदयोन्मुख संशोधकांसाठी आदर्शवत स्वरुपाची आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीकडून

प्रा. एस.आर. यादव यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड

शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस.आर. यादव यांची प्रतिष्ठेच्या इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व डॉ. राजाराम गुरव.

 


कोल्हापूर, दि. ९ जुलै: शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस.आर. यादव यांची इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी (इन्सा) या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल विद्यापीठ कार्यालयात त्यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. यादव यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी आपल्या संशोधन कार्यात खंड पडू दिलेला नाही, ही सर्वच क्षेत्रांतील संशोधकांसाठी आदर्शवत बाब आहे. त्यांच्या या निवडीचा विद्यापीठास नितांत अभिमान आहे.

डॉ. यादव म्हणाले, आजवर मी जे थोडेफार संशोधन करू शकलो आहे, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ या माझ्या मातृसंस्थेचा मोलाचा वाटा आहे. भावी काळातही वनस्पतीशास्त्रातील संशोधन अव्याहत करीत राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव उपस्थित होते.

डॉ. यादव हे सध्या विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात इन्सा वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर आता इन्साकडून त्यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. पुढे आणखी दोन वर्षे मुदतवाढही मिळू शकते. हा सन्मान प्राप्त करणारे विद्यापीठातील ते पहिले शास्त्रज्ञ आहेत. या अंतर्गत त्यांना संशोधनविषयक बाबींसाठी एक लाख रुपयांचे अनुदानही प्राप्त होणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयातर्फे देण्यात येणारा इ.के. जानकी अम्मल जीवन गौरव पुरस्कारहा संशोधनातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार वनस्पतीशास्त्रातील संशोधनातील योगदानासाठी त्यांना सन २०१८मध्ये प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारे डॉ. यादव हे राज्यातील एकमेव संशोधक आहेत. आता इन्साकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड होणे, हा त्यांच्या संशोधकीय कारकीर्दीचा गौरवच आहे.

 

Thursday, 4 July 2024

शिवाजी विद्यापीठात यंदापासून बी.कॉम. (बीएफएसआय) पदवी अभ्यासक्रम

 बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात करिअरच्या संधी; एक वर्षाची पूर्ण अप्रेंटिसशीप



कोल्हापूर, दि. ४ जुलै: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध अभिनव अभ्यासक्रम राबविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने या वर्षीपासून बी.कॉम. (बीएफएसआय) हा आणखी एक अभिनव आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी आज दिली.

डॉ. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची रोजगाराभिमुखता वाढविण्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण राबविले आहे. याअंतर्गत अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह पदवीस्तरीय आणि एकात्मिक अभ्यासक्रमही राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना विद्यार्थ्यांचा प्रतिसादही लाभतो आहे. या अभिनव अभ्यासक्रमांच्या मालिकेतच विद्यापीठाने यंदापासून वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागाच्या अंतर्गत बी. कॉम. (बीएफएसआय) हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस (वित्तीय सेवा) आणि इन्शुरन्स (विमा) या दैनंदिन व्यावहारिक जीवनातील अत्यावश्यक सेवा आहेत. त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात. त्या दृष्टीने विद्यापीठाने सदर अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता यावा, यासाठी या अभ्यासक्रमामध्ये एक वर्षाच्या अप्रेंटिसशीपचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी मिळण्याची अधिक शक्यता निर्माण होईल. त्यासाठी विद्यापीठाने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन यांच्यासमवेत सामंजस्य करार केला आहे. तसेच, सेक्टर स्किल कौन्सिल यांच्यासोबतही करार करण्यात आला आहे. या संस्था, संघटनांचे विद्यापीठास अप्रेंटीसशीपसह प्लेसमेंट आणि कौशल्य मूल्यमापन आदी बाबींसाठी सहकार्य लाभणार आहे. कौशल्याधारित आणि अनुभवाधिष्ठित अध्ययनाला महत्त्व असणाऱ्या या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विविध वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये बँकिंग, अकाऊंटिंग, ऑडिटिंग, इन्शुरन्स यांसह विविध वित्तीय सेवा संस्थांमध्येही करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरला वेगळी दिशा द्यावी, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. महाजन यांनी केले आहे.

 

बी.कॉम. (बी.एफ.एस.आय.) अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये-

1)    पश्चिम महाराष्ट्रातील पहिला अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (ए.ई.डी.पी.)

2)    कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र

3)    विद्यार्थ्यांना पूर्ण एक वर्षाची अप्रेंटिसशीप

4)    प्रत्येक सत्रामध्ये कौशल्यावर आधारित अध्यापन-अध्ययनावर भर

5)    औद्योगिक क्षेत्राच्या मागणी व गरजेनुसार तयार केलेला अभ्यासक्रम

6)    अप्रेंटिसशिपसह नोकरी रोजगार मिळण्याच्या अधिक शक्यता

 

Wednesday, 26 June 2024

महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे शाहू महाराज पहिले जनक: डॉ. रमेश जाधव

 

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ संशोधक डॉ. रमेश जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. प्रतिमा पवार व डॉ. प्रतिभा देसाई

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ संशोधक डॉ. रमेश जाधव.

कोल्हापूर, दि. २६ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे पहिले जनक होत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शाहू संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने आज डॉ. जाधव यांचे शाहू छत्रपती: एक चिंतन या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. रमेश जाधव यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या शेतीविषयक कार्यावर विशेष प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, शाहू महाराज यांनी त्यांच्या अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यामध्ये काम केले नाही, असे एकही क्षेत्र उरलेले नाही. प्रत्येक क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. राजर्षींचे शेतीच्या क्षेत्रातील कार्यही त्याला अपवाद नाही. शाहू महाराजांवर महात्मा फुले यांच्या विचारकार्याचा प्रभाव असल्याचे जाणवते. त्यांचे सहकारी भास्करराव जाधव हे फुले यांच्या सामाजिक चळवळीतून पुढे आले होते. त्यामुळे महाराजांनी फुले यांचे साहित्य वाचले. फुले आणि शाहू हे एक प्रकारचे वैचारिक अद्वैत होते. फुले यांच्या शेतकरी सुखी तर जग सुखी, या वचनाचा प्रभाव महाराजांवर होता. महाराजांना राजर्षी पदवी देण्यात आली, त्या भाषणातही त्यांनी शेतकऱ्यांविषयी कळकळ व्यक्त केली होती. आपल्या मुलाला शेतकी शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठविल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असल्याची जाणीव त्यांना होती. संशोधन वाढले, तरच उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांत संपन्नता येईल, अशी त्यांची धारणा होती.

नवसंकल्पना राबविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे धोरण शाहू महाराजांनी स्वीकारल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले, ऊस गाळण्याच्या लोखंडी घाण्यात अडकून शेतकऱ्यांची बोटे तुटतात म्हणून लाकडी घाणा तयार करणाऱ्यास त्यांनी बक्षीस जाहीर केले आणि लाकडी घाणा वापरणाऱ्यांचा सत्कारही केला. संस्थानात कॉफी, चहाच्या लागवडीचे प्रयोग यशस्वी केले. त्याचप्रमाणे साबुदाणा झाडांसह नवनवीन पिके काढण्यासही प्रोत्साहन दिले. इंग्लंड दौऱ्यामध्ये तेथील शेती आणि शेतीपूरक व्यवसायांत चाललेले प्रयोग, तेथील उद्योग यांची त्यांनी पाहणी केली आणि येथे परतल्यावर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना व्याजदर कमी केले. पाणी योजना राबविण्यावर भर दिला. धरण, बंधारे बांधले. शेतकऱ्यांना अनेक सवलती जाहीर केल्या. रामचंद्र शेटे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठविले. पहिल्या महायुद्धाच्या प्रसंगी लोखंडाअभावी शेतकऱ्यांना बाजारात नांगर मिळत नव्हते. त्यावेळी किल्ल्यांवरील तोफा किर्लोस्कर कारखान्यात वितळवून त्यापासून नांगर तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध केले. शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी पालकांवर १ रुपया दंड बसविला. इतक्या मोठ्या दंडाच्या भीतीपोटी पालक मुलांना शाळेत पाठवित असत. अशी अनेक शेतकरी हिताची कामे त्यांनी केली.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, शाहू महाराजांचे द्रष्टेपण हे काळाच्या शंभर वर्षे पुढे होते. आजच्या पिढीने त्यांच्याविषयी वाचन करावे आणि त्यांचे विचार अंगीकृत करण्याचा प्रयत्न करावा. महाराजांनी त्यांच्या काळातच शेतकी प्रदर्शने भरविण्यास सुरवात केली. सहकार ही संकल्पनाही त्यांनी संस्थानात अंमलात आणली. शाहू महाराजांच्या पाऊलखुणा कोल्हापुरात पदोपदी आहेत. त्या वाचण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला, डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.