Monday, 10 February 2025

नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या अभिनव संशोधनास जर्मन पेटंट

डॉ. सागर डेळेकर

डॉ. तुकाराम डोंगळे

डॉ. दीपक कुंभार

डॉ. प्रमोद कोयले

डॉ. सुनिल कदम

डॉ. क्रांतीवीर मोरे


कोल्हापूर, दि. १० फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी अभिनव बाईंडरविरहित पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीस जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक तथा रसायनशास्त्रज्ञ डॉ. सागर डेळेकर यांच्यासह डॉ. क्रांतिवीर मोरे, डॉ. तुकाराम डोंगळे, भारती विद्यापीठाच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल कदम, डॉ. प्रमोद कोयले, डॉ. अनंत दोडामणी (एस.जी.एम. कॉलेज, कराड), डॉ. दीपक कुंभार (.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी) यांनी सदर संशोधन प्रक्रियेत सहभाग घेतला.

हे संशोधन सौरऊर्जा निर्मिती क्षेत्राला गती देणारे ठरेल, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला. तयार केलेली वेगवेगळी नॅनोसंमिश्रे आणि त्यापासून तयार करावयाचे उपकरण कमीत कमी तापमानात आणि अत्यल्प वेळेमध्ये बनवता येते,  तसेच ते सुलभतेने हाताळता येते. हे उपकरण तसेच ते तयार करण्याची पद्धत सौरऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

सौरऊर्जेचे उत्पादन त्या उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवर अवलंबू असते. तसेच ते उपकरण बनवण्यासाठी वापरली जाणारी पद्धतही महत्त्वाची ठरते. विद्यापीठातील संशोधकांनी वेगवेगळ्या नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी पद्धत कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार केली आहे. यामध्ये कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईडच्या नॅनोमलद्रव्यांचा वापर केला आहे. या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे सौर ऊर्जा क्षेत्राला नवीन चालना मिळेल.

या संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे सर यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

Saturday, 8 February 2025

विद्यापीठांच्या सशक्तीकरणाबाबत राज्य शासन गंभीर: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 शिवाजी विद्यापीठाचे पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन



शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी कोनशिला अनावरण करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.


शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे फीत कापून उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.



शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर पाहणी करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर पाहणी करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.



(शिवाजी विद्यापीठाचा पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाची काही छायाचित्रे)

(शिवाजी विद्यापीठ भुयारी मार्ग उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ८ फेब्रुवारी: विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सशक्तीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने काम करीत आहे, असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना कायमस्वरुपी जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन आज मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यापीठांना पायाभूत सुविधा पुरवून त्या अनुषंगाने त्यांचे सक्षमीकरण जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यापीठांनी देशविदेशांतील विविध विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांना प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस म्हणून आमंत्रित करून त्यांच्याकडील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिवाजी विद्यापीठाने विविध परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करार केले आहेत, ही चांगली बाब आहे. पुढील काळात याचे प्रमाण वृद्धिंगत करावे, असेही त्यांनी सांगितले.

‘‘कमवा व शिका योजनेचे सशक्तीकरण करावे

यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेचे अधिक सशक्तीकरण करावे, अशी सूचना केली. ते म्हणाले, सध्या या योजनेअंतर्गत काम करीत असणाऱ्या विद्यार्थिनींचे कामाचे तास आणि त्यासाठी त्यांना देण्यात येणारे शुल्कही वाढवावे. यासाठी काही खाजगी उद्योगांकडून सामाजिक दायित्व निधी मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू, जेणे करून योजनेतून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त साधारण अडीच हजार रुपयांचा अधिकचा निधी संबंधित विद्यार्थिनींना मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल, असे ते म्हणाले.

सिंधी, गुजराती, राजस्थानी भाषा अभ्यासक्रमांसाठी प्रस्ताव द्या

मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर परिसरात सिंधी, गुजराती, राजस्थानी बांधवही कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरीत असताना त्यांनाही त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा हक्क प्रदान केला पाहिजे. त्या दृष्टीने सुरवातीला या भाषांतील ३ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावेत, जेणे करून या बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मातृभाषा शिक्षण घेता येऊ शकेल. शिवाजी विद्यापीठाने या भाषांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांना केली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळेच भुयारी मार्ग अस्तित्वात: कुलगुरू डॉ. शिर्के

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास गेले, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले. ते म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या भुयारी मार्गाच्या कामाची घोषणा केली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाच्या कारकीर्दीत त्याला आवश्यक निधीची तरतूद करून त्याच्या कामासाठी शासकीय यंत्रणांचे संपूर्ण सहकार्य मिळवून देण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असा हा मार्ग अस्तित्वात आला.

यावेळी सुरवातीला मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्यासह सर्वच मान्यवरांनी भुयारी मार्गाची चालत जाऊन पाहणी केली. झालेल्या कामाबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

त्यानंतर मंत्री श्री. पाटील यांनी विद्यापीठाच्या परिसरात लोकांच्या दातृत्वातून साकारत असलेल्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या कामास भेट देऊन त्याविषयी माहिती घेतली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, पुण्याच्या अॅस्टुट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रतिनिधी विनायक पारळकर, स्थापत्य कामाचे ठेकेदार रमेश भोजकर, विद्युत कामाचे ठेकेदार श्रीकांत गुजर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, राहुल चिकोडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. व्ही.एम. पाटील, स्वागत परुळेकर यांच्यासह बांधकाम समितीचे सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुयारी मार्गाचे काम एक वर्षात पूर्ण

गत वर्षी ३ फेब्रुवारीला भुयारी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतर वर्षभराच्या अवधीत हे काम पूर्णत्वास गेले आहे. यामध्ये विद्यापीठ परिसराच्या पूर्व व पश्चिम बाजूचे जोड रस्ते व सेवा मार्ग आणि भुयारी मार्ग यांचा समावेश आहे. पश्चिम बाजूकडील जोड रस्त्याची लांबी १६६ मीटर इतकी तर पूर्व बाजूकडील जोड रस्त्याची लांबी २९.३२ मीटर इतकी आहे. भुयारी मार्गाची लांबी ३१.३२ मीटर असून रुंदी ८.५० मीटर आणि उंची ३ मीटर आहे. भुयारी मार्गातील वाहनमार्ग ५.५० मीटर इतका असून दोहो बाजूला १.२५ मीटरचा पदपथ आहे. पूर्व बाजूस महामार्गावरुन खाली उतरण्यासाठी जिना, पश्चिम बाजूकडील जोड रस्त्यासाठी रिटेनिंग भिंत आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आर.सी.सी. गटर आदी कामेही या अंतर्गत करण्यात आली आहेत.

Friday, 7 February 2025

श्याम बेनेगल यांची नायिका पुरूषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारणारी: डॉ.चंद्रकांत लंगरे

 शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन

 

शिवाजी विद्यापीठात 'दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा' या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. चंद्रकांत लंगरे. मंचावर (डावीकडून) डॉ. विश्राम ढोले आणि डॉ. निशा मुडे-पवार. 

कोल्हापूरदि. ७ फेब्रुवारी: ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या समग्र चित्रपटांतून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारणारी नायिका प्रखरतेने दिसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रांतर्गत आयोजित 'दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा'  या दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बीजभाषक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाच्या संवादशास्त्र विभागाचे डॉ.विश्राम ढोले होते.

डॉ. लंगरे म्हणाले कीबेनेगल यांच्या चित्रपटांतील महिलांच्या व्यक्तिरेखा विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या असून स्त्री समस्या त्यांनी स्त्रियांच्याच दृष्टिकोनातून मांडल्या. या चित्रपटांतील महिला व्यक्तिरेखा या आपल्या समस्यांची उत्तरे शोधणाऱ्या खऱ्या 'नायिकाअसून त्यामुळेच त्या आजच्या काळाशी सुसंगत वाटतात.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विश्राम ढोले म्हणाले कीश्याम बेनेगल यांचे चित्रपट म्हणजे व्यावसायिक व समांतर अशा दोन प्रवाहांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. व्यावसायिक व वास्तविक सिनेमांचा सुंदर मिलाफ त्यांनी कल्पकतेने साकार केला.

यावेळी स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. निशा मुडे-पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. चित्रपट समीक्षक सर्फराज मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. अश्विनी कांबळे यांनी आभार मानले.

याप्रसंगी नांदेड विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र गोणारकरएमजीएम औरंगाबाद विद्यापीठाच्या डॉ. विशाखा गारखेडकरएफटीआयआय पुण्याचे डॉ.प्रसाद ठाकूरडॉ. चेतना सोनकांबळेडॉ. शिवाजी जाधवडॉ. चंद्रशेखर वानखेडेडॉ. अंबादास भासके, डॉ. नितीन रणदिवेविठ्ठल एडकेदिग्विजय कुंभाररोहिणी साळुंखेशैलेश कोरे व विजय जाधव यांच्यासह संजय घोडावत विद्यापीठ तसेच निटवे महाविद्यालयातील पत्रकारितेची विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उद्या शोधनिबंध सादरीकरण

या चर्चासत्रासाठी २० शोधनिबंध आले असून त्यांचे सादरीकरण आणि श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांतील गाणी या विषयावर संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ.अंजली निगवेकर यांचे उद्या मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती डॉ. निशा मुडे-पवार यांनी दिली आहे.

Thursday, 6 February 2025

मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा आदर आवश्यक: डॉ. मेघा पानसरे

विद्यापीठात कार्निव्हल-२०२५ची सांगितिक सांगता

शिवाजी विद्यापीठात 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवात जर्मन सोलोवर भरतनाट्यम सादर करताना निधी सावर्डेकर

शिवाजी विद्यापीठात 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवात विदेशी गीते सादर करताना विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात 'कार्निव्हल-२०२५' महोत्सवाच्या सांगता समारंभात विदेशी भाषा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मेघा पानसरे

(कार्निव्हल-२०२५ महोत्सवाच्या सांगता समारंभाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ६ फेब्रुवारी: जगामधील विविध मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा माणूस म्हणून प्रत्येकाने आदर केला पाहिजे. विदेशी भाषा आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही खूप महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा अधिविभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा अधिविभागातर्फे विविध देशांच्या कलांचे दर्शन घडविणाऱ्या कार्निव्हल-२०२५या कला-सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारंभामध्ये डॉ. पानसरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात करण्यात आले.

डॉ. पानसरे म्हणाल्या, जगामध्ये स्थलांतर होत असतात, मानवी समूह एकमेकांमध्ये मिसळत असतात. त्यावेळी विदेशी भाषा शिक्षणाचा चांगला उपयोग होतो. शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांना या विदेशी भाषा अवगत असणे खूप महत्त्वाचे असते. विदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाषेचा सातत्याने सराव केल्यास ती जागतिक भाषा आणि त्या देशातील संस्कृती कायम स्मरणात राहते.

कार्यक्रमात विविध विदेशी भाषांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर, निधी सावर्डेकर यांच्या जर्मन सोलोवर आधारित भरतनाट्यमने कार्यक्रमाची सुरूवात झाली. जपान, जर्मनी, रशिया आणि पोर्तुगीज देशांची सोलो गीते, कविता, समूहगीते, कथा-कथन, नाटक अशा बहारदार विविधांगी १९ कार्यक्रमांच्या सादरीकरणातून विदेशी भाषा अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक कला-संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राजवर्धन पाटील आणि निधी सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर ऐश्वर्या चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ.अनिल घुले यांच्यासह ज्योती पाटील, प्रियांका माळकर, गीतांजली शहा, स्नेहल शेटे, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विधी विभागाच्या पाचदिवसीय कार्यशाळेत

तज्ज्ञ न्यायाधीश, वकीलांकडून मार्गदर्शन


शिवाजी विद्यापीठात आयोजित पाचदिवसीय विशेष कार्यशाळेचे उद्घाटन करताना न्या. शरद मडके. सोबत अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विधी अधिविभाग प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे आदी


शिवाजी विद्यापीठात आयोजित पाचदिवसीय विशेष कार्यशाळेत न्या. शरद मडके यांचे स्वागत करताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. शेजारी विधी अधिविभाग प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे


 

कोल्हापूर, दि. ६ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विधी अधिविभागामध्ये प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या योजनेअंतर्गत “व्हॅल्यू अॅडेड कोर्स ऑन ज्युडिशिअल एक्झामिनेशन ट्रेनिंगया विषयावरील पाच दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञ न्यायाधीश आणि वकीलांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी (दि. १) न्यायाधीश शरद दिगंबर मडके यांच्या हस्ते आणि मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी न्या. मडके यांनी उत्तम न्यायाधीश कसे बनावे, न्यायदान करीत असताना घ्यावयाच्या दक्षता याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. देशमुख यांनी शिवाजी विद्यापीठाने राबवलेल्या विविध योजनांचे विद्यार्थ्यांना होणारे लाभ विषद केले.

दुसऱ्या सत्रात सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ या कायद्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये न्या. एस. पी. कुलकर्णी यांनी न्यायाधीश म्हणून जबाबदारी बजावत असताना आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. न्यायाधीश पदासाठी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी करावयाच्या तयारीविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात कोल्हापूर न्यायालयातील वरिष्ठ फौजदारी वकील गिरीश नाईक यांनी आपले फौजदारी दावे हाताळण्याविषयी मार्गदर्शन केले. अनेक उदाहरणे देत त्यांनी न्यायाधीश आणि वकील यांच्यामधील व्यावसायिक नाते कसे जपले पाहिजे, याविषयी सांगितले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आपल्या शंकांचे समाधान करवून घेतले. कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात गिरीश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अधिविभागप्रमुख डॉ. विवेक धुपदाळे यांनी सर्वांचे आभार मानले. 

Wednesday, 5 February 2025

पाचगणीत शिवाजी विद्यापीठाचे नेतृत्व विकास शिबिर सुरू

पाचगणी येथील बहाई अकादमीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, डॉ. तानाजी चौगुले आणि डॉ. लेसन आझादी


पाचगणी येथील बहाई अकादमीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नेतृत्व विकास शिबिरात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. 

पाचगणी येथील बहाई अकादमीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नेतृत्व विकास शिबिरासाठी आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी. 

कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने पाचगणी (जि. सातारा) येथील बहाई अकादमी येथे नेतृत्व विकास शिबीर आजपासून सुरू झाले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते शिबिराचे आज सकाळी उद्घाटन करण्यात आले. शिबिरात एकूण ८२ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांमधून तसेच शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतून ८२ विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त गुणांची जाणीव करून देण्यासाठी तसेच कालसुसंगत बाबींच्या परिचय करून देण्यासाठी शिबिरामध्ये अनेक मान्यवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली आहेत. व्याख्यानांबरोबरच कृती कार्यक्रम तसेच बहाई अकॅडमीच्या वतीने हॅप्पी हिप्पो शोचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम यांनी शिबिराची सुरुवात होते. उद्घाटन प्रसंगी बहाई अकॅडमीचे संचालक डॉ. लेसन आजादी, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगले, शिबिर समन्वयक डॉ. प्रल्हाद माने तसेच विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शिबिराची सांगता ७ फेब्रुवारी रोजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.