Thursday, 28 July 2016

विद्यापीठाकडे पात्रता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ




कोल्हापूर, दि. २८ जुलै: शिवाजी विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालये/ मान्यताप्राप्त संस्था व अधिविभाग यांना सन २०१६-१७साठी पात्रतेसंदर्भातील पात्रता अर्ज व शुल्क सादर करण्यासाठीची मुदत वाढवून दिली आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक आज सर्व संबंधितांना पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी दिली.
या परिपत्रकानुसार, पूर्वी ३० जुलैपर्यंत असणारी ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह सादर करण्याची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, विलंब शुल्क, विशेष विलंब शुल्क आणि अतिरिक्त विलंब शुल्क यांच्यासह अर्ज सादर करण्याची मुदत अनुक्रमे २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर अशी वाढवून देण्यात आली आहे. तरी, संबंधित महाविद्यालये व संस्थांनी या मुदतीत पात्रता अर्ज व शुल्क जमा करून सहकार्य करावे. त्याचप्रमाणे या उपर कोणत्याही प्रकारे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही कुलसचिव डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या वेबसाइटवर वाढलेल्या ट्रॅफिकच्या अनुषंगाने माहिती देताना कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, गेल्या सोमवारपर्यंत स्टुडंट व कॉलेज पोर्टल हे विद्यापीठाच्या एकाच सर्व्हरवर होते. विद्यार्थी, महाविद्यालये आणि सायबर कॅफे यांनी एकाच वेळी त्याचा वापर सुरु केल्याने विद्यापीठाच्या वेबसाइटचा ॲक्सेस मंद झाला होता. सोमवारी दुपारीच यासंदर्भात निर्णय घेऊन स्टुडंट पोर्टलकरिता विद्यापीठाच्या डाटा सेंटरमध्ये आठ सीपीयू, १६ जीबी रॅम असलेला सर्व्हर नव्याने सुस्थापित करण्यात आला असून तो १०० एमबीपीएस इंटरनेट लाइनवर जोडण्यात आला आहे. त्यानंतर विद्यापीठाकडील तक्रारी कमी झाल्या आहेत. बुधवारी रात्री १२ पासून गुरुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत या सर्व्हरचे रेकॉर्ड पाहता सुमारे सव्वा लाख हिट्सची नोंद झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे १७० जीबी इतक्याडाटा ट्रान्स्फरची नोंदही दिसून येते. सध्या स्टुडंट पोर्टलवरून सरासरी ४० एमबीपीएस इतक्या गतीने डाटा ट्रान्स्फर सुरु आहे. विद्यापीठाचे अभियंते सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मंगळवार सकाळपासून कोणत्याही अडचणीबाबत तक्रार प्राप्त नाही. तरीही विद्यार्थीहितार्थ सदर मुदत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Monday, 25 July 2016

शासकीय योजनांच्या मूल्यमापनासाठीच्या नामिकासूचीमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश



कोल्हापूर, दि. २५ जुलै: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या दि. २२ जुलै २०१६च्या शासन निर्णयानुसार विविध शासकीय योजनांच्या मूल्यमापनासाठी नामांकित बाह्यस्थ संस्थांची नामिका सूची तयार करण्यात आली असून त्यामध्ये सिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. शिंदे म्हणाले, सद्यस्थितीत नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत सिमीत प्रमाणात योजनेचे मूल्यमापन करण्यात येते. मूल्यमापनाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने तसेच नमुना पाहणी व सांख्यिकी विषयाबाबत शासनाच्या विभागांना व कार्यालयांना सल्ला देऊ शकेल अशा सक्षम व नामांकित संस्थांची नामिका सूची तयार करण्यात आली आहे. या सूचीमध्ये शासन सहाय्यित संस्था- १० पेक्षा कमी जिल्ह्यात किंवा एका महसुली विभागासाठी (गट-२ प्रकार-२) शिवाजी विद्यापीठाची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या केवळ दोन अकृषी विद्यापीठांचा समावेश आहे.
या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे काम अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे यांनी केले. यामध्ये अर्थशास्त्र विभागातील डॉ. एम.एस. देशमुख, संख्याशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागामधील डॉ. डी.एन. काशीद, संतो सुतार, डॉ. पी. डी. राऊत, डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा ज्ज्ञ म्हणून समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे बुधवारी कोल्हापूरमध्ये व्याख्यान




Dr. K. Kasturi Rangan
कोल्हापूर, दि. २५ जुलै: शिवाजी विद्यापीठ आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई., नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी (दि. २७ जुलै) सकाळी १०.३० वाजता भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. कस्तुरी रंगन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
आय.एस.टी.ई.तर्फे 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत हे व्याख्यान होत आहे. राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असतील. ही माहिती आयएसटीईचे अध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. देसाई म्हणाले, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचे स्मरण चिरंतन राहावे, यासाठी आयएसटीईतर्फे व्याख्यानमाला आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे व्याख्यान आयोजिले आहे. या आयोजनामध्ये सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये हे व्याख्यान होत आहे. 'इव्हॉल्यूशन ऑफ इंडियाज् स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स' (भारताच्या अवकाश दळणवळण यंत्रणेमधील उत्क्रांती) असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
तसेच, या प्रसंगी ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्रिडिटेशन (एनबीए)चे सदस्य सचिव डॉ. अनिलकुमार नासा यांच्या प्रमुख उपस्थितीत 'श्रीनिवास रामानुजन गणित स्पर्धा-२०१६'चा पारितोषिक वितरण समारंभही होणार असल्याचे प्रा. देसाई यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाची दीक्षान्त अर्ज पेमेंट गेटवे सुविधा कार्यान्वित; ॲन्ड्रॉइड ॲपही सादर





कोल्हापूर, दि. २५ जुलै: शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन महत्त्वपूर्ण ऑनलाइन उपक्रम कार्यान्वित केले आहेत. सध्या दीक्षान्त प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ती पूर्णतः पेमेंट गेट-वेच्या माध्यमातून करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्या बहुतांश विद्यार्थी मोबाईल वापरत असल्याची बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या ॲन्ड्रॉइड ॲप्लीकेशन निर्मिती करण्यात आली आहे. ही माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणाहून विद्यापीठाची माहिती घेता यावी, तसेच शुल्कही भरता यावे, यासाठी त्यांच्यासाठी ऑनलाइन सुविधा विकसित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने पेमेंट गेट-वे आणि मोबाइल ॲप हे दोन्ही उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सध्या दीक्षान्त अर्जांसाठी पेमेंट गेट-वेची सुविधा उपलब्ध केली असली तरी टप्प्याटप्प्याने इतर शुल्कांसाठीही ती विकसित करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोबाईल ॲप ऑफलाइन मोडमध्येही वापरता येऊ शकेल. तथापि, अद्ययावत माहितीसाठी त्यांना ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

दीक्षान्त अर्ज प्रक्रियेसाठी पेमेंट गेटवे सुविधेची सविस्तर माहिती परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिली. ते म्हणाले, गतवर्षी दीक्षान्त प्रमाणपत्रासाठी सुमारे एक कोटी साठ लाख रुपये इतके शुल्क विद्यार्थ्यांनी भरले. त्यापैकी ४० टक्के विद्यार्थ्यांनी बँकेच्या डी.डी.द्वारे शुल्क भरले. त्यासाठी त्यांना प्रत्येकी किमान ६५ ते ७० रुपये इतके शुल्क भरावे लागले. इतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन चलन सुविधेद्वारे शुल्क भरले. त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च झाला. पेमेंट गेटवेमुळे  विद्यार्थ्यांचा हा सर्व वेळ व खर्च वाचणार आहे. इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांच्या सहाय्याने विद्यार्थी हे शुल्क भरू शकणार आहे. त्याची त्यांना पावतीही ऑनलाइन प्राप्त होईल. या सुविधेला मदत करणाऱ्या ॲक्सिस बँकेने विद्यार्थ्यांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतल्याने हा खर्चही वाचणार आहे. ही सुविधा विकसित केल्यापासून गेल्या चार दिवसांत ५५०हून अधिक विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ. मिलींद जोशी यांनी यावेळी मोबाईल ॲपविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षके कर्मचारी यांना विद्यापीठाबाबत संपूर्ण माहिती मोबाईलद्वारे तत्काळ देण्यासाठी विद्यापीठाच्या इंटरनेट विभागाने ॲन्ड्रॉइड  बेस्ड 'मोबाईल ॲप' विकसि केले आहे. या ॲपमध्ये विद्यापीठाविषयी माहिती, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम, महत्त्वाच्या बातम्या, परिपत्रके, कार्यशाळा, दूरशिक्षण विभागाची माहिती, ग्रंथालये, फोटो गॅलरी, संलग्न महाविद्यालयांची माहिती, परीक्षांचे निकाल, विद्यापीठातील सर्व अधिविभागांची माहिती, विद्यापीठाचा गुगल नकाशा, शिवसंदेश (विद्यापीठाचा ब्लॉग) इत्यादी माहिती आहे. विद्यापीठासाठी मोबाईल ॲप विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्याचे सातत्याने अद्यावतीकरण करण्याचा प्रयत्न राहील. यामधील काही लिंक्स विद्यापीठाच्या सर्व्हरद्वारे दाखविण्यात येतील काही माहिती ॲपमध्ये ऑफलाईनसुद्धा उपलब्ध होईल. जेणेकरुन कायम इंटरनेट सुविधेची गरज भासणार नाही. सदर ॲप डाऊनलोड करण्यासाठी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ॲप विद्यापीठासाठी मे.ड्रीम कॉम्प्युटर, कोल्हापूर यांनी विकसित केले आहे. सदर ॲपची निगराणी विद्यापीठाच्या वेबसाईट सेलमार्फत केली जाईल.

या पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. आर.के. कामत, श्रीमती एस.एस. खराडे यांच्यासह शिक्षक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



पेमेंट गेटवेद्वारे पदवी प्रमाणपत्र अर्ज करण्याची पद्धत:

1
प्रथम विद्यार्थ्याने शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in  
 या संकेतस्थळावर जाऊन online convocation 2016-17 येथे क्लिक करावे.
2
या नंतर  दिलेल्या सुचना वाचून आपली सहमती I agree  
या बटनवर क्लिक करून दर्शवावी .
3
यानंतर New Registration for Convocation  
या बटनवर क्लिक करावे.
4
पदवी प्रमाण पत्र अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्याने याठिकाणी 
User Name and Password तयार करुन Log In या 
बटनवर क्लिक करावे.
5
यानंतर शिवाजी विद्यापीठ पदवी उत्तीर्ण वर्ष नमूद करून  Submit 
या बटनवर क्लिक करावे.
6
यानंतर दहा अंकी PRN नमूद करून Tab या बटनवर क्लिक केल्यानंतर 
विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती उपलब्ध होईल. 
7
फॉर्ममधील आवश्यक ती माहिती भरल्यानंतर खालीलप्रमाणे विद्यार्थ्याने 
 स्वत: फोटो अपलोड करावा.
फोटो फॉरमॅट -- jpg  फोटो साईज 20 केबी इतकी असावी.
8
यानंतर पदवी प्रमाणपत्राचे शुल्क भरण्यासाठी Online Payment 
दर्शविलेल्या बटणावर क्लिक करावे.
9
यानंतर ॲक्सिस बँकेचा फॉर्म उपलब्ध होईल. यामध्ये क्रेडीट कार्ड / डेबीट कार्ड 
क्रमांक भरुन ऑनलाईन पेमेंट करावे.
10
ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर print receipt हा ऑप्शन दिसेल.  
त्यावर क्लिक करुन पावती प्रिंट उपलब्ध होईल. 
 त्यानंतर फॉर्म प्रिंट या ऑप्शनवर क्लिककरुन फॉर्मची प्रिंट घ्यावी. 
11
फॉर्म, पावती गुणतक्त्याची छायांकित प्रत दीक्षांत विभागात जमा करावी.
12
विद्यार्थ्यांना संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 0231-2609302  
ई-मेल paysuk@unishivaji.ac.in