Monday, 25 July 2016

डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे बुधवारी कोल्हापूरमध्ये व्याख्यान
Dr. K. Kasturi Rangan
कोल्हापूर, दि. २५ जुलै: शिवाजी विद्यापीठ आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई., नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी (दि. २७ जुलै) सकाळी १०.३० वाजता भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. कस्तुरी रंगन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
आय.एस.टी.ई.तर्फे 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत हे व्याख्यान होत आहे. राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असतील. ही माहिती आयएसटीईचे अध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. देसाई म्हणाले, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचे स्मरण चिरंतन राहावे, यासाठी आयएसटीईतर्फे व्याख्यानमाला आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे व्याख्यान आयोजिले आहे. या आयोजनामध्ये सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये हे व्याख्यान होत आहे. 'इव्हॉल्यूशन ऑफ इंडियाज् स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स' (भारताच्या अवकाश दळणवळण यंत्रणेमधील उत्क्रांती) असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
तसेच, या प्रसंगी ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)चे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्रिडिटेशन (एनबीए)चे सदस्य सचिव डॉ. अनिलकुमार नासा यांच्या प्रमुख उपस्थितीत 'श्रीनिवास रामानुजन गणित स्पर्धा-२०१६'चा पारितोषिक वितरण समारंभही होणार असल्याचे प्रा. देसाई यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment