Monday, 25 July 2016

शिवाजी विद्यापीठाची दीक्षान्त अर्ज पेमेंट गेटवे सुविधा कार्यान्वित; ॲन्ड्रॉइड ॲपही सादर





कोल्हापूर, दि. २५ जुलै: शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन महत्त्वपूर्ण ऑनलाइन उपक्रम कार्यान्वित केले आहेत. सध्या दीक्षान्त प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ती पूर्णतः पेमेंट गेट-वेच्या माध्यमातून करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्या बहुतांश विद्यार्थी मोबाईल वापरत असल्याची बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या ॲन्ड्रॉइड ॲप्लीकेशन निर्मिती करण्यात आली आहे. ही माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणाहून विद्यापीठाची माहिती घेता यावी, तसेच शुल्कही भरता यावे, यासाठी त्यांच्यासाठी ऑनलाइन सुविधा विकसित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने पेमेंट गेट-वे आणि मोबाइल ॲप हे दोन्ही उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सध्या दीक्षान्त अर्जांसाठी पेमेंट गेट-वेची सुविधा उपलब्ध केली असली तरी टप्प्याटप्प्याने इतर शुल्कांसाठीही ती विकसित करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोबाईल ॲप ऑफलाइन मोडमध्येही वापरता येऊ शकेल. तथापि, अद्ययावत माहितीसाठी त्यांना ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

दीक्षान्त अर्ज प्रक्रियेसाठी पेमेंट गेटवे सुविधेची सविस्तर माहिती परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिली. ते म्हणाले, गतवर्षी दीक्षान्त प्रमाणपत्रासाठी सुमारे एक कोटी साठ लाख रुपये इतके शुल्क विद्यार्थ्यांनी भरले. त्यापैकी ४० टक्के विद्यार्थ्यांनी बँकेच्या डी.डी.द्वारे शुल्क भरले. त्यासाठी त्यांना प्रत्येकी किमान ६५ ते ७० रुपये इतके शुल्क भरावे लागले. इतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन चलन सुविधेद्वारे शुल्क भरले. त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च झाला. पेमेंट गेटवेमुळे  विद्यार्थ्यांचा हा सर्व वेळ व खर्च वाचणार आहे. इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांच्या सहाय्याने विद्यार्थी हे शुल्क भरू शकणार आहे. त्याची त्यांना पावतीही ऑनलाइन प्राप्त होईल. या सुविधेला मदत करणाऱ्या ॲक्सिस बँकेने विद्यार्थ्यांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतल्याने हा खर्चही वाचणार आहे. ही सुविधा विकसित केल्यापासून गेल्या चार दिवसांत ५५०हून अधिक विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ. मिलींद जोशी यांनी यावेळी मोबाईल ॲपविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षके कर्मचारी यांना विद्यापीठाबाबत संपूर्ण माहिती मोबाईलद्वारे तत्काळ देण्यासाठी विद्यापीठाच्या इंटरनेट विभागाने ॲन्ड्रॉइड  बेस्ड 'मोबाईल ॲप' विकसि केले आहे. या ॲपमध्ये विद्यापीठाविषयी माहिती, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम, महत्त्वाच्या बातम्या, परिपत्रके, कार्यशाळा, दूरशिक्षण विभागाची माहिती, ग्रंथालये, फोटो गॅलरी, संलग्न महाविद्यालयांची माहिती, परीक्षांचे निकाल, विद्यापीठातील सर्व अधिविभागांची माहिती, विद्यापीठाचा गुगल नकाशा, शिवसंदेश (विद्यापीठाचा ब्लॉग) इत्यादी माहिती आहे. विद्यापीठासाठी मोबाईल ॲप विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्याचे सातत्याने अद्यावतीकरण करण्याचा प्रयत्न राहील. यामधील काही लिंक्स विद्यापीठाच्या सर्व्हरद्वारे दाखविण्यात येतील काही माहिती ॲपमध्ये ऑफलाईनसुद्धा उपलब्ध होईल. जेणेकरुन कायम इंटरनेट सुविधेची गरज भासणार नाही. सदर ॲप डाऊनलोड करण्यासाठी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ॲप विद्यापीठासाठी मे.ड्रीम कॉम्प्युटर, कोल्हापूर यांनी विकसित केले आहे. सदर ॲपची निगराणी विद्यापीठाच्या वेबसाईट सेलमार्फत केली जाईल.

या पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. आर.के. कामत, श्रीमती एस.एस. खराडे यांच्यासह शिक्षक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



पेमेंट गेटवेद्वारे पदवी प्रमाणपत्र अर्ज करण्याची पद्धत:

1
प्रथम विद्यार्थ्याने शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in  
 या संकेतस्थळावर जाऊन online convocation 2016-17 येथे क्लिक करावे.
2
या नंतर  दिलेल्या सुचना वाचून आपली सहमती I agree  
या बटनवर क्लिक करून दर्शवावी .
3
यानंतर New Registration for Convocation  
या बटनवर क्लिक करावे.
4
पदवी प्रमाण पत्र अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्याने याठिकाणी 
User Name and Password तयार करुन Log In या 
बटनवर क्लिक करावे.
5
यानंतर शिवाजी विद्यापीठ पदवी उत्तीर्ण वर्ष नमूद करून  Submit 
या बटनवर क्लिक करावे.
6
यानंतर दहा अंकी PRN नमूद करून Tab या बटनवर क्लिक केल्यानंतर 
विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती उपलब्ध होईल. 
7
फॉर्ममधील आवश्यक ती माहिती भरल्यानंतर खालीलप्रमाणे विद्यार्थ्याने 
 स्वत: फोटो अपलोड करावा.
फोटो फॉरमॅट -- jpg  फोटो साईज 20 केबी इतकी असावी.
8
यानंतर पदवी प्रमाणपत्राचे शुल्क भरण्यासाठी Online Payment 
दर्शविलेल्या बटणावर क्लिक करावे.
9
यानंतर ॲक्सिस बँकेचा फॉर्म उपलब्ध होईल. यामध्ये क्रेडीट कार्ड / डेबीट कार्ड 
क्रमांक भरुन ऑनलाईन पेमेंट करावे.
10
ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर print receipt हा ऑप्शन दिसेल.  
त्यावर क्लिक करुन पावती प्रिंट उपलब्ध होईल. 
 त्यानंतर फॉर्म प्रिंट या ऑप्शनवर क्लिककरुन फॉर्मची प्रिंट घ्यावी. 
11
फॉर्म, पावती गुणतक्त्याची छायांकित प्रत दीक्षांत विभागात जमा करावी.
12
विद्यार्थ्यांना संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 0231-2609302  
ई-मेल paysuk@unishivaji.ac.in 


No comments:

Post a Comment