भाषा भवन तलावाला येऊन मिळणारे पाणी |
पूर्ण क्षमतेने भरलेला भाषा भवन तलाव |
भरून वाहणारे शेततळे क्र. १ |
तिन्ही शेततळ्यांचे एकत्र दर्शन |
संगीत अधिविभागाशेजारील ओसंडून वाहणारा तलाव |
सिंथेटिक ट्रॅकशेजारील पूर्ण क्षमतेने भरलेली विहीर |
क्रीडा अधिविभागामागील ओसंडून वाहणारी विहीर |
पूर्ण क्षमतेने भरलेली सुतार विहीर |
कोल्हापूर, दि. १२ जुलै: गेल्या
चार दिवसांपासून कोल्हापूर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येथील शिवाजी
विद्यापीठ परिसरातील सर्व पाणवठे आज 'ओव्हर-फ्लो' झाले. विशेष म्हणजे सन २००५ नंतर कधीही न भरलेला वि.स. खांडेकर भाषा
भवनामागील तलाव चार दिवसांतच शंभर टक्के भरून वाहू लागला आहे. त्याचप्रमाणे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने
हाती घेतलेल्या शेततळे विकास कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात आलेली तीन शेततळीही
दोन दिवसांतच पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
शिवाजी विद्यापीठात भाषा भवनामागील
तलावाबरोबरच संगीत अधिविभागामागील तलाव, नूतन तीन शेततळी आणि पाच विहीरी असे एकूण
दहा पाणवठे आहेत. संगीत अधिविभागाशेजारील तलाव काल सायंकाळीच पूर्ण क्षमतेने
भरल्याचे दिसून आले. पुलाच्या दोन्ही बाजूला तलाव पाण्याने तुडूंब भरल्याचे दृष्य
खूप दिवसांनंतर पाहता आले. भाषा भवनमागील तलावही जवळ जवळ दहा वर्षांनंतर पहिल्याच
पावसात शंभर टक्के भरला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, यंदा विद्यापीठाने
शेततळी विकास कार्यक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत तीन शेततळी विकसित करण्यात
आली होती. ही तीनही शेततळी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. याबरोबरच विद्यापीठ
परिसरातील सुतार विहीर, क्रीडा अधिविभागाशेजारील विहीर आणि रसायनशास्त्र
अधिविभागाशेजारील विहीर या तिन्ही पूर्ण भरल्या आहेत. या खेरीज विद्यापीठाच्या
सिंथेटिक ट्रॅकच्या मागील बाजूची आणि सुतार विहीरीशेजारील शिंदे विहीर या दोन
विहीरींमधील गाळ काढून यंदा पुनरुज्जीवन करण्यात आले. या दोन्ही विहीरीसुद्धा भरून
ओसंडून वाहू लागल्या आहेत.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त
करताना प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर मोरे म्हणाले, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन तीन महिन्यांत विद्यापीठाने परिसरात हाती
घेतलेल्या जलयुक्त विकास कार्यक्रमाचे फलित या निमित्ताने सामोरे आले आहे. विद्यापीठाचा
अभियांत्रिकी विभाग, उद्यान विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शारीरिक शिक्षण
संचालक आदींच्या योगदानातून हा विकास कार्यक्रम राबविण्यात आला. विहीरींतील गाळ
काढून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच विद्यापीठ परिसरात इतस्ततः वाहून जाणारे
पाणी चरी निर्माण करून तलावांकडे वळविण्यात आम्हाला यश आले. त्यामुळे इतक्या कमी
कालावधीत पाणवठे जलसंपन्न होऊ शकले.
विद्यापीठाच्या या जलविकास
कार्यक्रमात अतिशय कळीची भूमिका पार पाडणारे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे
यांनी विद्यापीठाने राबविलेल्या विकास कार्यक्रमाला यंदा पावसाने उत्तम साथ
दिल्याने विद्यापीठाचा परिसर जलसंपन्न होऊ शकल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते
म्हणाले, विद्यापीठ परिसरातील पाणी तलावांकडे वाहून नेण्यासाठी भाषा भवनच्या मागील
बाजूस सात चरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्याचप्रमाणे रसायनशास्त्र
अधिविभागाच्या मागील बाजूस नवीन चर तयार करण्यात येऊन तेथूनही भाषा भवनच्या तलावाकडे
पाणी वळविण्यात यश आले. त्यामुळे हा तलाव यंदा राजाराम तलावाच्या आधीच भरल्याचे
पाहावयास मिळाले.
विद्यापीठातील
विविध पाणवठ्यांची क्षमता पुढीलप्रमाणे:-
·
भाषा भवन तलाव - २२ कोटी १५ लाख लीटर
·
संगीत अधिविभाग तलाव - ५ कोटी २० लाख लीटर
·
सुतार विहीर - ४ लाख लीटर
·
क्रीडा अधिविभाग विहीर - ४.८७ लाख लीटर
·
रसायनशास्त्र अधिविभाग विहीर - ३ लाख लीटर
·
सिंथेटिक ट्रॅकशेजारील विहीर - ५ लाख लीटर
·
शिंदे विहीर - ३ लाख लीटर
·
तीन नूतन शेततळी - एकूण ३५ लाख लीटर (२५+५+५)
very good
ReplyDeleteThank you Sir... Come sometime for morning walk... You will enjoy...
Delete