Friday, 15 July 2016

कौशल्यांच्या योग्य वापराने ध्येयसिद्धी निश्चित: कौस्तुभ बंकापुरे


कौस्तुभ बंकापुरे





शिवाजी विद्यापीठात जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात

कोल्हापूर, दि. १५ जुलै: आपल्याला आयुष्यात कोठे पोहोचायचे आहे, ते ठरवून त्या दृष्टीने आपल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करण्याबरोबरच अन्य आवश्यक कौशल्ये आत्मसात करून त्यांचा योग्य वापर केल्यास आपले ध्येय निश्चितपणे साध्य करता येते, असा विश्वास कौशल्य प्रणेते कौस्तुभ बंकापुरे यांनी आज विद्यार्थ्यांच्या मनात जागविला.
शिवाजी विद्यापीठाच्या 'कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रा'तर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज 'आइस ब्रेकिंग फॉर स्कील डेव्हलपमेंट' या विषयावर श्री. बंकापुरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. जे.एस. बागी प्रमुख उपस्थित होते.
विविध उदाहरणांसह कौशल्याचे महत्त्व पटवून देताना श्री. बंकापुरे यांनी कौशल्य विकासाची चतुःसूत्रीच विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले, आयुष्यात कोणतेही कौशल्य मिळवायचे असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम आपली तयारी असणे हा पहिला मंत्र आहे. त्यानंतर तुम्हाला काय येते, ही गोष्टही महत्त्वाची ठरते. आपल्या मनात आलेल्या प्रत्येक विचाराला गांभीर्याने घेऊन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे ही तिसरी महत्त्वाची बाब, तर तांत्रिक व अतांत्रिक कौशल्यांचा समतोल अंगिकार व विकास ही चौथी महत्त्वाची बाब ठरते. या बळावर आयुष्यात कोणत्याही कौशल्याचे उत्तम रोजगारात यशस्वी रुपांतर करता येऊ शकते. संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करणे आणि सामान्यज्ञान या मूलभूत गोष्टींच्या बळावर स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा निर्माण करणे ही बाबही महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, आजच्या युवा पिढीची तंत्रज्ञानावर उत्तम पकड आहे. त्यामुळे तंत्रविषयक कौशल्ये सहजतेने आत्मसात केली जाताहेत. कौणतेही कौशल्य शिकण्याची संधी विद्यार्थ्यांनी अजिबात सोडता कामा नये. ते आत्मसात करणे अवघड आहे, असे मानू नये. आत्मसात केलेले कोणतेही कौशल्य कधीही वाया जात नाही. त्याचा योग्य वेळी वापर केला तर ते निश्चितच आयुष्याला दिशादर्शक ठरते.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी इंग्रजी भाषा आणि संभाषण कौशल्याचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, वाचन, लिखाण या बाबींप्रमाणेच श्रवण ही सुद्धा कौशल्यपूर्ण बाब आहे. आणि संभाषण हे तर त्याहूनही महत्त्वाचे कौशल्य आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा बाऊ न करता तिच्या माध्यमातून हे संभाषण कौशल्य विकसित केले पाहिजे. तथापि, पारंपरिक ज्ञानाबरोबर आयुष्यात उभे करणारे कोणतेही कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची नितांत गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोगजार विभागाचे सहाय्यक संचालक सचिन जाधव यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment