Monday, 11 July 2016

अभियांत्रिकीचा आंतरविद्याशाखीय अभ्यास गरजेचा: प्रा. मनुकीड



'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलताना ए.आय.टी. (थायलंड)चे प्रा.मनुकीड. व्यासपीठावर (डावीकडून) समन्वयक उदय पाटील, ग्यान समन्वयक डॉ. आर.के. कामत,  तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. जे.एस. बागी, प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर.मोरे, श्री. एस.डी. प्रधान व कुमार रामचंद्रन.



शिवाजी विद्यापीठात मॅकेट्रॉनिक्ससंदर्भातील 'ग्यान' कार्यशाळेस प्रारंभ

कोल्हापूर, दि. ११ जुलै: अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी आज येथे केले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रायोजित 'ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर ॲकेडेमिक नेटवर्क्स' (ग्यान) या उपक्रमांतर्गत आजपासून शिवाजी विद्यापीठात 'मेकॅट्रॉनिक्स: सिनर्जिक इंटिग्रेशन ऑफ मॅकेनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' या विषयावरील कार्यशाळेस प्रारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. मनुकीड बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते.

टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी व इक्विनॉक्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एस.डी. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे माजी उपाध्यक्ष कुमार रामचंद्रन प्रमुख उपस्थित होते.

मॅकेट्रॉनिक्स व रोबोटिक्स विषयातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ असलेल्या प्रा. मनुकीड यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाविषयी आपली भूमिका थोडक्यात विषद केली. ते म्हणाले, आज जगातील कोणत्याही अभियंत्याला अभियांत्रिकीच्या अन्य शाखांचे वावडे असता कामा नये. मॅकेनिकल अभियंत्याने त्याला आवश्यक असलेल्या हार्डवेअरसाठीचा प्रोग्राम स्वतःच तयार केला, तर त्याला हवा तो निकाल मिळू शकतो. यांसारख्या समस्यांवर मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संगमातून निर्माण झालेल्या मॅकेट्रॉनिक्स या आंतरविद्याशाखेच्या माध्यमातून उपाय शोधता येणे शक्य झाले आहे.

थायलंडची ए.आय.टी. आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान या पूर्वीच झालेल्या सामंजस्य कराराला 'ग्यान' उपक्रमामुळे पुनरुज्जीवन लाभले असून या पुढील काळात दोन्ही शैक्षणिक संस्था व देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास प्रा. मनुकीड यांनी व्यक्त केला. थायलंडवर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असून महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात आपण प्रथमच आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरीच माहिती ऐकण्यात आली. त्यामुळे आता येथून गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाही आपण अभ्यास करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. एस.डी. प्रधान यांनी आपल्या भाषणात 'बाऊंड्रीलेस इंजिनिअर' या संकल्पनेची जगाला विशेषतः भारताला मोठी गरज असल्याचे सांगितले.  ते म्हणाले, आतापर्यंत अभियांत्रिकीने वाफ, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स व आयटी तसेच आता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.), बायोटेक्नॉलॉजी असा व्यापक प्रवास केला आहे. ए.आय. संकल्पनेमुळे पूर्वीच्या अनेक मूलभूत संकल्पनांकडे नव्या दृष्टीने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण बदल, त्यांचा स्वीकार आणि उपयोजन हेच केवळ अभियांत्रिकीचे वास्तव आहे. ए.आय.मुळे निम्न व मध्यम दर्जाचे रोजगार संपुष्टात येणार आहे. यामुळे अभियांत्रिकीचे भवितव्यच बदलणार आहे. या बदलांच्या स्वीकारासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रांतील सुसंवाद वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कुमार रामचंद्रन यांनीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बळावर गेल्या चारशे वर्षांत झाले नाहीत, इतके गतिमान बदल येत्या तीस ते चाळीस वर्षात होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यासाठी अभियांत्रिकी शाखांचा एकात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नजीकच्या काळात शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात टाटा टेक्नॉलॉजीज्‌च्या माध्यमातून विद्यार्थी, नव-अभियंत्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः अभियांत्रिकीच्या क्षेत्रात मानवी जीवनावर आणि जीवनशैलीवर दूरगामी परिणाम करणारे बदल कधी नव्हे इतक्या गतीने होत आहेत. या बदलांशी पूरक अशा पद्धतीने जुळवून घेण्यासाठी प्रत्येकालाच अनुषंगिक बदल करवून घ्यावे लागतील. याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. या गतिमान युगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर या बदलांशी जुळवून घ्यावे लागेल. त्या दृष्टीने उपयुक्त दृष्टीकोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांत विकसित करण्यात ही कार्यशाळा निश्चित यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरवातीला श्री. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे डिजीटल उद्घाटन करण्यात आले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 'ग्यान' प्रकल्पाविषयी समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक उदय पाटील यांनी परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जी.एस. कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, विद्याधर कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment