कोल्हापूर, दि. २८ जुलै: शिवाजी विद्यापीठाने
सर्व संलग्नित महाविद्यालये/ मान्यताप्राप्त संस्था व अधिविभाग यांना सन
२०१६-१७साठी पात्रतेसंदर्भातील पात्रता अर्ज व शुल्क सादर करण्यासाठीची मुदत वाढवून
दिली आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक आज सर्व संबंधितांना पाठविण्यात आले असल्याची
माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी दिली.
या परिपत्रकानुसार, पूर्वी ३० जुलैपर्यंत असणारी ऑनलाइन
अर्ज नियमित शुल्कासह सादर करण्याची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
तसेच, विलंब शुल्क, विशेष विलंब शुल्क आणि अतिरिक्त विलंब शुल्क यांच्यासह अर्ज
सादर करण्याची मुदत अनुक्रमे २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर अशी वाढवून
देण्यात आली आहे. तरी, संबंधित महाविद्यालये व संस्थांनी या मुदतीत पात्रता अर्ज व
शुल्क जमा करून सहकार्य करावे. त्याचप्रमाणे या उपर कोणत्याही प्रकारे मुदतवाढ
देण्यात येणार नाही, असेही कुलसचिव डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या वेबसाइटवर वाढलेल्या ट्रॅफिकच्या अनुषंगाने
माहिती देताना कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, गेल्या सोमवारपर्यंत स्टुडंट व कॉलेज
पोर्टल हे विद्यापीठाच्या एकाच सर्व्हरवर होते. विद्यार्थी, महाविद्यालये आणि
सायबर कॅफे यांनी एकाच वेळी त्याचा वापर सुरु केल्याने विद्यापीठाच्या वेबसाइटचा ॲक्सेस
मंद झाला होता. सोमवारी दुपारीच यासंदर्भात निर्णय घेऊन स्टुडंट पोर्टलकरिता विद्यापीठाच्या
डाटा सेंटरमध्ये आठ सीपीयू, १६ जीबी रॅम असलेला सर्व्हर नव्याने सुस्थापित करण्यात
आला असून तो १०० एमबीपीएस इंटरनेट लाइनवर जोडण्यात आला आहे. त्यानंतर
विद्यापीठाकडील तक्रारी कमी झाल्या आहेत. बुधवारी रात्री १२ पासून गुरुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत या सर्व्हरचे रेकॉर्ड पाहता सुमारे सव्वा लाख हिट्सची नोंद झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे १७० जीबी इतक्याडाटा
ट्रान्स्फरची नोंदही दिसून येते. सध्या स्टुडंट पोर्टलवरून सरासरी ४० एमबीपीएस इतक्या गतीने डाटा ट्रान्स्फर सुरु आहे. विद्यापीठाचे अभियंते सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत.
त्यामुळे मंगळवार सकाळपासून कोणत्याही अडचणीबाबत तक्रार प्राप्त नाही. तरीही
विद्यार्थीहितार्थ सदर मुदत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment