Thursday 12 January 2017

प्रवासी भारतीयांच्या संवेदनशीलतेमधून

उत्तम साहित्यकृतींची निर्मिती: गुलशन सुखलाल



शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठात आयोजित आतरराष्ट्रीय हिंदी परिषदेचे उद्घाटन करताना गुलशन सुखलाल, प्रा. गोपीनाथन, डॉ. शंकरलाल पुरोहित, प्रा. पद्मा पाटील आदी.

श्री. गुलशन सुखलाल

कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: प्रवासी भारतीयांच्या संवेदनशीलतेमधून जागतिक स्तरावर उत्तम साहित्यकृतींची निर्मिती झाली आहे, असे प्रतिपादन मॉरिशस येथील विश्व हिंदी सचिवालयाचे माजी उपमहासचिव गुलशन सुखलाल यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागात आजपासून प्रवासी हिंदी साहित्य आणि मानवाधिकार या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेस सुरवात झाली. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. जी. गोपीनाथन होते.
श्री. सुखलाल म्हणाले, स्वातंत्र्योत्तर कालखंडात विशेषतः १९५०नंतर भारतीय लोक विविध कारणांनी देशाबाहेर जाऊ लागले. अर्थार्जनाबरोबरच अनेक उद्दिष्ट्ये त्यांच्या स्थलांतरामागे होती. अशा प्रकारे जागतिक प्रवासी बनत असताना त्यांची भारतीय विचारपद्धती आणि मूलभूत अधिकारांविषयीची सजगता त्यांच्यात जागृत होती. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींकडे ते त्यांच्या भारतीयत्वाच्या नजरेतून अत्यंत सजगपणे व संवेदनशीलपणे पाहात होते. आपली मातृभूमी, आपले लोक, भाषा यांपासून दूर असले तरी त्यांनी हे संबंध राखण्याचा प्रयत्न कायम ठेवला. या साऱ्यांमुळे त्यांची जी मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर जडणघडण, गुंतागुंत होत राहिली, तिला साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्तीचे आयाम लाभले. ती समजून घेण्यासाठी प्रवासी हिंदी साहित्याचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे.
आपण स्वतःला प्रवासी किंवा स्थलांतरित मानत नसल्याचे सांगून श्री. सुखलाल पुढे म्हणाले, मॉरिशसमध्ये प्रवासी हिंदी साहित्याची निर्मिती जोमदारपणे झालेली आहे. या साहित्याचा आणि त्यामागील प्रेरणांचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. गोपीनाथन म्हणाले, प्रवासी साहित्यातून भाषेला महत्त्वाची देणगी जर कोणती मिळत असेल तर ती शब्दभांडाराची होय. देशोदेशींचे विविध भाषांतील प्रचलित शब्द हिंदी साहित्यात येतात आणि त्यांच्या माध्यमातून भाषा समृद्ध होण्यास बळ मिळते. प्रवासी साहित्याचे हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शोध या डिजीटल संशोधन पत्रिकेचे श्री. गुलशन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
हिंदी अधिविभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या परिषदेच्या आयोजनाची संपूर्ण प्रक्रिया डिजीटल पद्धतीने राबविण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. प्रदीप लाड यांनी आभार मानले. परिषदेस अमेरिका, त्रिनिदाद एन्ड टोबॅगो, नेपाळ, श्रीलंका, मॉरिशस येथील संशोधक उपस्थित आहेत.

No comments:

Post a Comment