विद्यापीठात नूतन आर.ओ. जलशुद्धीकरण व बॉटलिंग प्रकल्पाचे उद्घाटन
कोल्हापूर, दि. १३
जानेवारी: विविध शासकीय योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत शिवाजी विद्यापीठ परिवाराचे सकारात्मक
योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.
शिवशंकर यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाने
उभारलेल्या नूतन रिव्हर्स ऑस्मॉसिस (आर.ओ.) पद्धतीच्या जलशुद्धीकरण व बॉटलिंग प्रकल्पाचे
उद्घाटन आज सकाळी श्री. शिवशंकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
P. Shivsankar (IAS) |
श्री. शिवशंकर
म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे शासनाला सदैव सहकार्य लाभले आहे. जलयुक्त विद्यापीठ
मोहिमेची अंमलबजावणी असो, वृक्षारोपण मोहीम असो की स्वच्छ भारत, मतदार जागृती वा
बेटी बचाओ अभियान असो, प्रत्येक उपक्रमात विद्यापीठ हिरीरीने अग्रभागी राहिले आहे.
आता सुद्धा आर.ओ. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून विद्यापीठ स्वच्छ पाण्याच्या
बाबतीतही स्वयंपूर्ण झाले आहे. स्वच्छ पाणी हा सर्वांचा हक्क आहे, असे आपण म्हणत
असलो तरी, विद्यापीठाने त्या दिशेने टाकलेले पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संशोधनाबरोबरच
त्याच्या उपयोजनातही विद्यापीठ अग्रेसर असल्याची प्रचिती या प्रकल्पाच्या
माध्यमातून आल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाच्या
अभियांत्रिकी विभागाने निर्धारित मुदतीपेक्षा कमी कालावधीत या प्रकल्पाची उभारणी
करून तो कार्यान्वित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे म्हणाले, आर.ओ. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यामागे एक
महत्त्वाचे कारण आहे; ते म्हणजे पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे आणि सर्वांना
एकसारखेच शुद्ध पाणी मिळायला हवे, अशी भूमिका त्यामागे आहे. विद्यापीठाच्या
कुलगुरूंपासून ते कर्मचाऱ्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांना अशा सर्वांनाच समान आणि
चांगल्या दर्जाचे पाणी मिळावे, यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. यापुढे
विद्यापीठातील अधिविभाग, प्रशासकीय विभाग, अतिथीगृह, कॅन्टीन, वसतिगृहे इतकेच
नव्हे, तर अगदी कॅम्पसवर राहणाऱ्या परिवारांना सुद्धा या प्रकल्पातून शुद्ध पाणी
पुरविण्यात येणार आहे.
यावेळी कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, सुमारे
५००० लीटर प्रतितास इतकी उच्च शुद्धीकरण क्षमता असलेला हा प्रकल्प विद्यापीठाने
स्वनिधीतून १७.५० लाख रुपयांत उभारला आहे. या जलशुद्धीकरण यंत्रणेबरोबरच
सेमी-ऑटोमॅटिक प्रकारातील बॉटलिंग प्लँटही उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाद्वारे
विद्यापीठातील प्रत्येक घटकाला शुद्ध पाण्याची हमी मिळणार आहे.
यावेळी या
प्रकल्पाचे ऑपरेटर वैभव कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपकुलसचिव
डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आभार मानले. प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले,
विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्रभारी परीक्षा नियंत्रक जी.आर.
पळसे यांच्यासह बिल्डींग वर्क्स कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक, प्रशासकीय
अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment