Saturday, 7 January 2017

विद्यापीठाच्या सुरक्षा ताफ्यात ‘ग्रीन कार’ दाखल







कोल्हापूर, दि. ७ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या वाहन ताफ्यात आज पर्यावरणपूरक वाहन (ग्रीन कार) दाखल झाले. आजच्या नो व्हेईकल डेचे औचित्य साधून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ही ग्रीन कार सुरक्षा विभागास प्रदान करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या ८५० एकर परिसरात सुरक्षा विभागाकडून दिवसरात्र ठराविक वेळेत गस्त (पेट्रोलिंग) घालण्यात येते. त्यासाठी पूर्वी एकच वाहन विभागाकडे होते. त्यामुळे इंधनावरील खर्च मोठा होता. अलिकडेच या ताफ्यात एक मोटरसायकल दाखल झाली. त्यामुळे हा खर्च कमी झाला. आता पर्यावरणपूरक वाहन दाखल झाल्यामुळे हा खर्च आणखी कमी होणार आहे.
या वाहनाची एकूण आसन क्षमता आठ असून कॅम्पसमध्ये पेट्रोलिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पाच बॅटरींवर हे वाहन चालते. या बॅटरी सहा तासांत पूर्ण चार्ज होतात आणि त्यावर साठ किलोमीटर इतके अंतर पार करता येते. यासाठी केवळ ५० रुपये प्रतिदिन इतका खर्च येणार आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांच्यासह काही विद्यार्थिनींना या ग्रीन कारमध्ये बसवून कॅम्पसमध्ये फेरफटका मारला. वाहनाची चाचणी घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, हे वाहन वायू तसेच ध्वनी प्रदुषणमुक्त आहे. याचा देखभाल खर्चही जवळजवळ शून्य आहे. या वाहनाला आरटीओ परवाना अथवा चालक परवान्याचीही आवश्यकता नाही. असे बहुमोल वाहन सुरक्षा ताफ्यात दाखल झाल्यामुळे विद्यापीठाचा इंधनावरील खर्च बराच कमी होणार आहे.

No comments:

Post a Comment