Friday, 6 January 2017

कोल्हापूरची पत्रकारिता सकारात्मक दिशेने जाणारी: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे






शिवाजी विद्यापीठात पत्रकार दिनानिमित्त संपादक परिषद उत्साहात

कोल्हापूर, दि. ६ जानेवारी:  कोल्हापूरची पत्रकारिता ही अत्यंत सकारात्मक दिशेने जाणारी आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग, एम.ए. मास कम्युनिकेशन विभाग, विभागीय तसेच जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संपादक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार, लोकमतचे संपादक वसंत भोसले, तरुण भारतचे निवासी संपादक जयसिंग पाटील, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळित सहभागी झाले. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर अध्यक्षस्थानी होते.
Dr. Devanand Shinde, Vice Chancellor
यावेळी नकारात्मक पत्रकारिता ही अल्पायुषी असल्याचे मत व्यक्त करून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापूरला एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. या वारशाची जाणीव असलेला इथला प्रत्येक पत्रकार हा एक स्वतंत्र विचारमंच आहे, ज्याला समाजाच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते सोडविण्याची तळमळ आहे. ही सकारात्मकता त्यांच्या मनीमानसी रुजलेली आहे. ती त्यांनी सदोदित जोपासावी. तसेच, विद्यापीठाच्या उपक्रमांना येथील पत्रकारांकडून लाभत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी धन्यवादही दिले.

पत्रकारांनी आता विवेकपूर्ण भूमिका घेणे अभिप्रेत: श्रीराम पवार
Shriram Pawar (Sakaal)
यावेळी सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार यांनी वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या गतीने सुरू असलेल्या बदलांचा वेध घेतला. त्या अनुषंगाने आपली निरीक्षणे नोंदविली. ते म्हणाले, पारंपरिक विचारांनुसार वृत्तपत्रांनी एखाद्या विषयाच्या सर्व बाजू द्याव्यात, असा आग्रह असतो. पण, नवमाध्यमांच्या गतिमान आगमनामुळे यामधील ऑब्जेक्टिव्हीटी संपते आहे. सद्यस्थितीत पत्रकारांनी विवेकपूर्ण भूमिका घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
समाजमाध्यमांमुळे आंतरसंवादीपणा वाढल्याचे सांगून ते म्हणाले, आजघडीला ज्याचे अस्तित्व गुगलवर आहे, तोच जिवंत असे मानण्याचा हा कालखंड आहे. नवमाध्यमांमुळे माध्यमांकडे पाहण्याचा, ग्रहण करण्याचा दृष्टीकोन साफ बदलला आहे. बदल हा एकमेव स्थिर असला तरी त्याची गती अफाट आहे. बातमी ब्रेक करण्याचे सूत्र आता समाजमाध्यमांच्या हाती आले आहे. तशात विध्वंसक तंत्रज्ञानामुळे (डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी) जगण्याची सारी अंगं बदलून गेली आहेत. दाव्होस इथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीबाबत भाष्य करण्यात आले. नेट वर्किंग, ऑर नॉट वर्किंग हे या क्रांतीचे सूत्र असणार आहे. नजीकच्या काळात फॉर्च्युन-५००मधल्या ६० टक्के कंपन्या नष्ट होतील, तर सध्या अस्तित्वात असलेले ६० टक्के रोजगारही नसतील. अशा गतिमान बदलाच्या युगात लोकांना ज्या क्षणी, जे हवे, ते देण्याची तयारी असणाऱ्या पत्रकारांची गरज आहे. आपल्या वाचकांना, श्रोत्यांना, दर्शकांना हवा असलेला सर्व प्रकारचा व्यक्तीगत गरजांनुरुप कन्टेन्ट निर्माण करणारे पत्रकार माध्यम क्षेत्राला हवे आहेत. सिटीझन जर्नालिझम हे पत्रकारितेचे भवितव्य आहे. त्यामुळे पत्रकारितेचा प्रवास आता एडिटिंग ते क्युरेटिंग असा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माध्यमांच्या विस्तारामध्ये संधी आणि आव्हानेही: वसंत भोसले
Vasant Bhosale (Lokmat)
पारंपरिक माध्यमांसमोर नवमाध्यमांचे मोठे आव्हान असले तरी माध्यमांचा हा विस्तार सकारात्मक आहे. हा विस्तार आणखी गतीने होणार असून त्यात अनेक संधींबरोबरच आव्हानेही दडलेली आहेत, असे मत लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले.
तंत्रज्ञानाच्या वेगामुळे चिंतन करण्याइतकीही फुरसत मिळत नसल्याचे सांगून श्री. भोसले म्हणाले, या वेगामुळे माहितीचे विश्लेषण करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. माहितीच्या भडिमारात विश्लेषणाची गरज वाढलेली आहे. आजच्या सजग तरुणांसाठी आशयसमृद्ध पत्रकारिता आवश्यक आहे. प्रत्येक माहितीत नवीन विचार, नवा आशय असायला हवा. विकासासंदर्भात आपण नेमकी काय भूमिका घेतो, कोणते धोरण स्वीकारतो, तेही पारखून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, ती मांडण्याची कुवत, वैचारिक बैठक आपण निर्माण करणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. नव्या पिढीचे वाचनाचे संदर्भ आणि गरजा बदलताहेत. त्यांचा दृष्टीकोन, यशाची परिभाषा ग्लोबल होते आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला ग्लोबल विषय घेऊन समाजाच्या गरजेनुसार पत्रकारिताही बदलावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संधी व आव्हाने परस्परपूरक: चारुदत्त जोशी
Charudatt Joshi (B News)
वसंत भोसले यांच्या भाषणातील धागा पकडून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी बदलत्या पत्रकारितेमधील संधी आणि आव्हाने ही एकमेकाशी निगडित असून परस्परपूरक असल्याचे मत व्यक्त केले.
ते म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे काम सोपे झाले हे खरे; मात्र, त्याचवेळी जबाबदारी आणि कामाची व्याप्तीही वाढते आहे. तंत्रज्ञानाच्या कक्षा व मर्यादा तासागणिक बदलताहेत. हे तंत्रज्ञान शिकणे, वापरणे सोपे असले तरी केवळ आत्मविश्वासाच्या अभावी त्यामध्ये आजचा तरुण कमी पडतो. ही त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे.
टीआरपीच्या स्पर्धेत वृत्तवाहिनी चालविणे अधिकच आव्हानात्मक बनल्याचे सांगून श्री. जोशी म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमात किंवा एकूणच माध्यम क्षेत्रात तात्त्विक लढाईबरोबरच आर्थिक लढाई महत्त्वही खूप आहे. आपण काम करीत असलेल्या संस्थेची ध्येयधोरणे स्वीकारून उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यातही जमिनीवर राहणे खूप महत्त्वाचे आहे. पाट्या टाकण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे, ही बाब चिंताजनक आहे. येत्या पाच ते दहा वर्षांत घरातील टेलिव्हिजनचा पडदा कालबाह्य ठरून वेब पोर्टल, वेब सिरीज यांनी त्याची जागा घेतलेली असेल, असे ते म्हणाले.

गुणवत्ता असणाऱ्या व्यक्तीच पत्रकारितेत टिकतील: जयसिंग पाटील
Jaysing Patil (Tarun Bharat)
पत्रकारिता आणि देशातले, समाजातले वास्तव हे कधीच वेगळे करता येत नाही, असे सांगून तरुण बारतचे निवासी संपादक जयसिंग पाटील म्हणाले, या वास्तवाची जाणीव असणारे, सर्वंकष परिस्थितीचा अभ्यास व आवाका असणारे अथवा तो निर्माण करण्याची गुणवत्ता असणारे लोकच पत्रकारितेच्या क्षेत्रात टिकून राहतील, अशी आजची परिस्थिती आहे.
श्री. पाटील म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने मनुष्यबळाचा ओघ दिसत असला तरी दर्जेदार मनुष्यबळाचा प्रश्न माध्यम क्षेत्राला मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. शब्ददारिद्र्य, संवेदनहीनता आणि भावनाशून्यता या दुष्टचक्रात पत्रकारिता अडकू पाहते आहे. त्यातून सोडविणाऱ्या पत्रकारांची या क्षेत्राला गरज आहे. जागतिकीकरणामुळे बदललेले संदर्भ, हिंसाचार, दहशतवाद, राजकीय अस्थिरता, वेगवेगळ्या असमिता अशा सर्व बाजूंनी बोवताल बदलत असताना त्याअनुषंगाने पत्रकारितेचे स्वरुप बदलत जाणे अपरिहार्य होते. वाढत्या वृत्तवाहिन्यांमुळे वृत्तपत्रांची मांडणी व स्वरुप बदलले. पत्रकारितेमधील संघर्ष अधिक तीव्र होत गेला. माध्यमांचे स्वरुप पालटत गेले, शब्द, भाषा बदलत गेली. हे सारे बदल अपरिहार्य असले तरी त्यांना स्वीकारणाऱ्यांची, या बदलांशी जुळवून घेणाऱ्यांची वानवा भासू लागली आहे. हे चित्र बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

विकास पत्रकारांची मोठी गरज: सतीश लळित
Satish Lalit (DGIPR)
यावेळी उपसंचालक सतीश लळित यांनी माध्यमांच्या प्रसारामध्ये तंत्रज्ञान आणि दूरसंचार साधनांच्या विकासाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आजघडीला देशाला विकास पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची मोठी गरज निर्माण झाली आहे. शासनामध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नेमकी ही विकास पत्रकारितेची भूमिका बजावत आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय मर्यादांमध्ये राहूनही महासंचालनालयाने लोकराज्य, दिलखुलास, जय महाराष्ट्र आणि महान्यूज यांसारखी स्वतःची माध्यमे निर्माण केली. महासंचालनालयाच्या या प्रयत्नांना प्रसारमाध्यमांची साथ महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान बदलले तरी ज्ञानसंपादनाची गरज कायम: दशरथ पारेकर
Dashrath Parekar
बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलली, माहितीचे स्रोत बदलले, तंत्रज्ञान बदलले तरी ज्ञानसंपादनाची गरज मात्र कायम राहणार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर, दिलीप पाडगावकर यांच्याबरोबरच कोट्टम राजू पुन्नय्या यांच्या आदर्श पत्रकारितेच्या स्मृती त्यांनी यावेळी जागवल्या. ते म्हणाले, या तिन्ही व्यक्तीमत्त्वांपासून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामध्ये बहुभाषिकता आणि ज्ञानसंपन्नतेची तळमळ हे गुण प्रत्येकाने घ्यायला हवेत. चौफेर वाचन करीत राहून ज्ञानाच्या कक्षा विस्तारणे पत्रकारितेत काम करताना महत्त्वाचे आहे. संवेदनशीलता हरवू न देता सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या पत्रकारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिविभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी केले. शीतल काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह शेती-प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी, डॉ. राजेंद्र पारिजात, डॉ. श्रीहरी देशपांडे, डॉ. सुमेधा साळुंखे, चंद्रशेखर वानखेडे, अनिल देशमुख यांच्यासह पत्रकारितेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment