Tuesday 3 October 2017

कुलगुरूंकडून ५५ किलोमीटरची ‘शिवपावन पदभ्रमंती मोहीम’ यशस्वीरित्या पूर्ण

Vice Chancellor Dr. Devanand Shinde
Vice Chancellor Dr. Shinde with the participants

 
School-bag distribution ceremony



कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सुमारे ५५ किलोमीटरची शिवपावन पदभ्रमंती मोहीम कुटुंबियांसह यशस्वीरित्या पूर्ण केली.
येथील शिवाजी विद्यापीठ व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले पन्हाळा ते पावनखिंड परिसर अशा शिवपावन पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्साहाने सळसळत्या स्वयंसेवकांच्या साथीने कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पत्नी सौ. अनिता, मुलगा शंतनू व मुलगी कैरवी यांच्यासह मोहिमेत सहभाग घेतला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या संकल्पनेतूनच शिवाजी विद्यापीठ आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने शिवपावन पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार १ व २ ऑक्टोबर २०१७ अशी दोन दिवसांची मोहीम आखण्यात आली. या पहिल्या मोहिमेत आपल्या परिवारासह पूर्ण वेळ सहभागी होऊन कुलगुरूंनी सर्व सहभागींना प्रोत्साहित केले.
शिव पावन पदभ्रमंती मोहिमेचा समारोप काल पावनखिंडीत झाला. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते पावनखिंड परिसरातील फरसबंदी मार्गाचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी, पांढरेपाणी ते पावनखिंड मार्गे पालखी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी विद्यार्थी रोमांचित झाले.
शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन तरूणांनी समाजाभिमुख विकास घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यावेळी म्हणाले, सिद्दी जौहरच्या वेढ्यातून शिवछत्रपती सहीसलामत सुटावेत, यासाठी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, बांदल मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. शेकडो मावळे धारातीर्थी पडले. स्वराज्यासाठी जीवावर उदार होऊन लढण्याची त्यांची तयारी होती. आजही पावनखिंडीचा इतिहास तरूणाईला जाज्ज्वल्य देशप्रेमाची प्रेरणा देत आहे. ही प्रेरणा आत्मसात करून तरूणांनी समाजाच्या विकासासाठी योगदान देणे आवश्‍यक आहे. विशेषत: ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करत तेथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ज्यामुळे मोठ्या शहरांकडे ग्रामीण भागातील लोकांचे होणारे स्थलांतर रोखले जाईल आणि ग्रामीण भागात सुराज्य निर्माण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या वेळी येळवण-जुगाईचे उपसरपंच सत्यवान खेतल यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांचा शिवछत्रपतींची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन मिरजकर व शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाची विद्यार्थिनी शुक्रिया मगदूम पांढरेपाणी परिसरात सर्वप्रथम पोचल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. राजनंदिनी पाटील व कैवल्य शिंदे या पाच वर्षीय चिमुरड्यांनी ही मोहीम पूर्ण केल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, मलकापूरचे नगरसेवक सुहास पाटील, नागरबाई शिंदे, अनिता शिंदे, डॉ. संगीता पाटील उपस्थित होते. प्रदीप थोरवत, सुजीत जाधव, राजेंद्र काटकर, अक्षय पाटील, प्रसाद पाटील, प्रवीण केंबळे, चंद्रकांत वाघ, शुभम कोळी, सागर पाटील, संग्राम मोरे यांनी संयोजन केले. प्राचार्य डी.डी. कुरळपकर यांनी आभार मानले.
दरम्यान, सह्याद्री प्रतिष्ठानचे चिफ पेट्रन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मोहिमेचे उद्‌घाटन झाले. या वेळी नगराध्यक्ष रूपाली धडेल, ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, रवी धडेल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थित होते. पदभ्रमंती मार्गावरील वाड्या-वस्त्यांवरील मुलांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते दप्तरांचे वाटप झाले. करपेवाडी मुक्कामी शाहीर रंगराव पाटील यांनी शाहिरी सादर करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. इतिहास अभ्यासक राम यादव यांनी पन्हाळा ते पावन परिसर घडलेल्या इतिहासाची माहिती दिली, तर अभिलेखापाल गणेशकुमार खोडके यांनी शिवरायांची
पत्रे या विषयी माहिती दिली.

No comments:

Post a Comment