Monday, 2 October 2017

शिवाजी विद्यापीठात स्वच्छता अभियानास उत्साही प्रतिसाद



Pro-Vice Chancellor Dr. D.T. Shirke


Registrar Dr. Vilas Nandavadekar











कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात आलेल्या विद्यापीठ परिसर स्वच्छता अभियानाला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद लाभला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रेरणेने प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी आठ ते दहा या कालावधीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यापीठ परिसर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा अशा प्रकारचा कचरा आज मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीकमुक्ती करण्यात आली होती. परिणामी सर्वच घटकांमध्ये याविषयी झालेल्या जागृतीमुळे यंदाच्या सफाईदरम्यान अत्यल्प प्लास्टीक सापडले. हे या मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले. मानव्यविद्या इमारतीमधील अधिविभागांनी परिसरात प्लास्टीकमुक्ती व छत स्वच्छता मोहीम राबविली.

कोणत्याही औपचारिकतेशिवाय प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी हातात खराटे घेऊन स्वच्छतेला सुरवात केली. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एनसीसी भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये तर अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आणि ग्रंथालयाचा परिसर चकाचक केला.
यंदाच्या मोहिमेदरम्यान विद्यापीठ परिसरातील प्लास्टीक व काचेच्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे स्पष्ट झाले. स्वच्छता मोहिमेतून विद्यार्थ्यांसह सर्व संबंधित घटकांमध्ये झालेल्या जागृतीचेच हे लक्षण आहे, अशी भावना प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के, कुलसचिव डॉ. नांदवडेकर व श्री. गुरव यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील शिवपुतळ्याचा उद्यान परिसर स्वच्छ केला. त्यानंतर त्यांनी परीक्षा भवनसह कॅम्पसवरील प्रत्येक अधिविभागाला प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. सहभागी विद्यार्थ्यांचे प्र-कुलगुरू डॉ. शिंदे यांनी मनापासून अभिनंदन व कौतुक केले.
अभियानानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर गांधी अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. भारती पाटील यांनी उपस्थितांना अहिंसा, शांततेची तसेच स्वच्छतेची शपथ दिली. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी नाष्ता व चहापानाची सुविधा करण्यात आली.

No comments:

Post a Comment