कोल्हापूर, १६
ऑक्टोबर: ज्येष्ठ
नेते यशवंतराव
चव्हाण यांनी सार्वजनिक जीवनात वावरत असताना स्त्रियांची प्रतिष्ठा जपण्यास नेहमीच
सर्वोच्च प्राधान्य दिले, असे प्रतिपादन माजी खासदार प्रतापराव भोसले यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, यशवंतराव चव्हाण अध्यासन व गांधी अभ्साय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
''यशवंतराव चव्हाण: व्यक्ती, कार्य आणि विचार'' या विषयावर एक दिवसीय चर्चा व मुलाखतीचा कार्यक्रम
शुक्रवारी (दि. १३) आयोजित करण्यात आला. त्यावेळी बीजभाषक व उद्घाटक या नात्याने
श्री. भोसले बोलत होते.
श्री. भोसले यांचे यशवंतराव चव्हाण यांच्याशी अत्यंत सौहार्दाचे संबंध
होते. त्यांनी आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी जागविताना त्यांच्या नैतिक
राजकारणाचा पटच उभा केला. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाणांचे स्त्रियांची प्रतिष्ठा जपण्यास
सर्वोच्च प्राधान्य होते. अगदी वेणूताईंशीही त्यांचे नाते साथीदाराचे होते. राजकीय
स्पर्धेत, प्रचारात त्यांनी प्रतिस्पर्धी स्त्री उमेदवारांवर
कधीही टीका केली नाही. प्रत्येक मतदारास चव्हाण स्वत: पत्र लिहित. त्यामुळे यशवंतरावांचे
लोकांशी प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. संस्कृती व नितिमूल्यांच्या भक्कम पायावर
चव्हाण साहेबांचे राजकारण उभे होते. त्याच बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणाचा
व राजकारणाचा पाया रचला. त्याच भरभक्कम पायावर आजही महाराष्ट्राचे भरणपोषण होत आहे.
या उपक्रमांतर्गत दिवसभरात यशवंतराव चव्हाण यांच्या पैलूंवर चर्चा व मान्यवरांच्या
मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये गौतमीपुत्र कांबळे यांनी ‘यशवंतराव चव्हाण यांचे सर्वसमावेश धोरण’ याबद्दल, तर अशोक चौसाळकर यांनी ‘राष्ट्रीय राजकारणातील यशवंतराव चव्हाण यांचे योगदान’ याबद्दल मुलाखत दिली. दुपारच्या
सत्रात किशोर बेडकिहाळ यांनी ''समाजवादाचे
चिंतन'' याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन
केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी यशवंतरावांचे भाषा, साहित्य, संस्कृती व शिक्षण
यामधील योगदान प्रकट केले. डॉ. वसंत भोसले यांनी यशवंतरावांचे सामाजिक व कृषी या क्षेत्रांतील
योगदान विस्तृत मुलाखतीद्वारे प्रकट केले.
उमेश गडेकर, डॉ. भारती
पाटील, डॉ. मेघा पानसरे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. दत्तात्रय
घोलप, चेतन गळगे यांनी या मुलाखती घेतल्या. डॉ. भारती
पाटील यांनी समारोपाचे भाषण केले.
शिवाजी विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, यशवंतराव चव्हाण
स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश पवार व गांधी अध्यासन केंद्राच्या
समन्वयक डॉ. भारती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कार्यक्रमासाठी विविध
अधिविभागातील विदयार्थी, प्राध्यापक
व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment