Monday, 27 November 2017

संविधानाचा नियमित अभ्यासक्रमात समावेश आवश्यक

शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर



 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. राजेंद्र कुंभार, प्रा. सुभाष दगडे व डॉ. रविनंद होवाळ.


शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात उपस्थितांसमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट मांडताना रेहान शकील नदाफ हा बालक.

कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: भारतीय संविधानाविषयी नागरिकांत जास्तीत जास्त जागृती करण्याची गरज असून संविधानाचा नियमित अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आज झालेल्या परिसंवादात व्यक्त झाला.
भारतीय संविधान दिनानिमित्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादात डॉ. रविनंद होवाळ (सोलापूर), प्रा. सुभाष दगडे (सांगली) आणि डॉ. राजेंद्र कुंभार (सातारा) यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

क्रांतीचे चक्र पूर्ण फिरविणे आवश्यक: डॉ. कुंभार
Dr. Rajendra Kumbhar
या प्रसंगी बोलताना डॉ. राजेंद्र कुंभार यांनी बाबासाहेबांच्या क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले आहे, या विधानाचा संदर्भ दिला आणि म्हणाले की, भारताचा हा अर्धा प्रवास एक व्यक्ती, एक मत इतकाच झाला आहे. अद्याप एक मत, एक मूल्य हा प्रवास पूर्ण करून क्रांतीच्या चक्रास पूर्णत्व प्रदान करावयाचे आहे. माहीतगार आणि नीतिमान लोकांचा समूहच देशाला खऱ्या लोकशाहीपर्यंत घेऊन जाईल. त्या दृष्टीने अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना केवळ साक्षर होण्याचे नव्हे, तर मनुष्य होण्याचे शिक्षण देण्याची गरज आहे. सामाजिक समता ही आपोआप प्रस्थापित होणारी बाब नसून त्यासाठी शिक्षणाची पुनर्मांडणी करण्याची गरज असून नीतिमानतेचे प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले, एम.एन. रॉय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्य हे मूल्य मानणाऱ्या विचारसरणीचा अभ्यासात समावेश आवश्यक आहे. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य व समता प्राप्त करण्यासाठी संघर्ष अटळ आहे. त्यासाठी सर्वच स्तरांवरील शिक्षण मोफत करण्याची गरज असून ज्ञानाची ऊर्जाकेंद्रे असलेल्या विद्यापीठांनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणव्यवस्था विज्ञानवादी व्हावी: प्रा. दगडे
Prof. Subhash Dagade
प्रा. सुभाष दगडे यांनी संविधानास अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य आणि शिक्षणव्यवस्थेमधील सुधारणा या दृष्टीने अत्यंत चिंतनपर मांडणी केली. ते म्हणाले, बाबासाहेबांनी भारतातील विषमतावादी समाजरचनेचा सर्वंकष अभ्यास करून त्यावर उपाय म्हणून सामाजिक, नैसर्गिक मूल्यांवर आधारित संविधान देण्याचा प्रयत्न केला. येथे पूर्वापार वसलेल्या धर्मसंसदेपेक्षा लोकसंसद प्रभावी ठरली पाहिजे, लोकांना आवाज प्राप्त झाला पाहिजे, असा आग्रह त्यामागे होता. या पार्श्वभूमीवर बुद्धीप्रामाण्यवादी, लोकशाहीवादी दृष्टीकोन निर्माण करण्याची जबाबदारी धोरणकर्त्यांवर आहे. त्याचप्रमाणे आजची शिक्षणव्यवस्था अधिकाधिक विज्ञानवादी व प्रगल्भ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे जंगल, जमीन आणि जल या नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास, संवर्धन व वाटप यांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. संविधानात विषमतेला थारा नाही. अशा व्यवस्थेला प्रोत्साहनाचे प्रयत्न नाकारून सामाजिक-आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी प्रयत्न करण्यासाठी चळवळींचे पुनरुज्जीवन करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.

राष्ट्रीय वृत्ती अंगी बाणवा: डॉ. होवाळ
Dr. Ravinand Howal
डॉ. रविनंद होवाळ यांनी भारतीय संविधानाची विविध वैशिष्ट्ये, पैलू आणि त्याच्या निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या योगदानाचा सविस्तर ऊहापोह केला. ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ७० वर्षांच्या वाटचालीत आपण आता कुठे संविधानाच्या प्रास्ताविकेपर्यंत पोहोचलो आहोत. अद्याप बराच पल्ला आपल्याला गाठावयाचा आहे. डॉ. आंबेडकर यांनी संविधानात प्रत्येक शब्द अत्यंत अभ्यासपूर्वक व चिकित्सकपणे योजला आहे. घटना राबविणारे हात चांगले असतील, तर तिची चांगली फळे मिळतील, अन्यथा हे चांगले हात निर्माण करण्याची जबाबदारी समाजाची आहे, याची जाणीव बाबासाहेबांनी करून दिलेली होती. भारतात विषमतेचे मूळ असणाऱ्या जाती विसर्जित केल्याखेरीज आपण कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी देऊन ठेवला आहे. त्यामुळे आजघडीला या देशातल्या प्रत्येक नागरिकाने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अंगी राष्ट्रीय वृत्ती बाणवण्याची गरज आहे, असे मत डॉ. होवाळ यांनी व्यक्त केले.
Pro-Vice Chancellor Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी संविधानाच्या संदर्भात विद्यार्थ्यांत जागृती घडविण्याची आणि सामाजिक प्रबोधन करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्राची असून हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने संविधान दूत ही योजना आजपासून अंमलात आणली असून त्याअंतर्गत महाविद्यालयांकडून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठ स्तरावर संविधान दूतांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात येईल. संविधान जागृतीसाठी करावयाच्या उपक्रमांचे धोरण आखून त्यानुसार प्रत्येक संबंधित घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते संविधानाची प्रत उघडून परिसंवादाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचा ब्रँड अँम्बॅसिडर असलेल्या पाच वर्षांच्या रेहान शकील नदाफ या बालकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तेजपाल मोरे यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठातर्फे ‘पुस्तकांच्या गावा’ला ५१७ ग्रंथ भेट


शिवाजी विद्यापीठातर्फे भिलार गावाला ५१७ ग्रंथांची भेट देण्यात आली. ती स्वीकारताना महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक श्री. किरण धांडोरे. शेजारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व अन्य मान्यवर.



भिलार या पुस्तकांच्या गावातील प्रकल्प कार्यालयास भेट देऊन त्याविषयी माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

भिलार येथील पुस्तकांची पाहणी करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: देशातील वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने भिलारसारखी पुस्तकांची गावे जिल्ह्या-जिल्ह्यांत निर्माण व्हायला हवीत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल भिलार (जि. सातारा) येथे व्यक्त केली.
Dr. Devanand Shinde
देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या भिलारला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने काल ५१७ पुस्तके प्रदान करण्यात आली. सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे ४५ वे अधिवेशन, मातृ-पितृ पुरस्कार वितरण आणि स्वातंत्र्यसैनिक देशभक्त भि.दा. भिलारे गुरूजी यांची ९८वी जयंती अशा संयुक्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या वतीने हा पुस्तक प्रदान सोहळा पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी भिलारच्या वतीने कुलगुरूंच्या हस्ते ग्रंथभेट स्वीकारली. यावेळी उद्योजक श्री. सारंग श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द.ता. भोसले, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप कुरळपकर, प्राचार्य डॉ. बी.एस. सावंत आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काल सकाळपासूनच भिलार गावात फिरून तेथील विविध घरांमधील ग्रंथसंग्रहाची पाहणी केली. प्रकल्प समन्वयक श्री. धर्माधिकारी यांनी त्यांना या समग्र प्रकल्पाविषयी माहिती दिली. सध्या या प्रकल्पांतर्गत भिलारमध्ये सुमारे १५ हजार पुस्तके असून अनेक घरे वाचकांच्या स्वागतासाठी रात्रंदिवस खुली असतात, अशी माहिती त्यांनी दिली. यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी भिलार येथे राबविलेला पुस्तकांचे गाव हा प्रकल्प स्तुत्य व ऐतिहासिक स्वरुपाचा असून त्यासाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा उत्साह अवर्णनीय आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुस्तकांमधील ज्ञान व त्यांची उपलब्धता या दृष्टीने एक नवा आयाम स्थापित होत असून त्याचे शिवाजी विद्यापीठाच्या सर्व संबंधित घटकांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. अशा शब्दांत आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. विद्यापीठातर्फे सध्या प्रातिनिधिक स्वरुपात ५१७ पुस्तकांची देणगी देत असून या पुढील काळातही या उपक्रमामध्ये विद्यापीठ सर्वोतोपरी सहकार्य करीत राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या प्रसंगी दिली. या पुस्तकांमध्ये विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांबरोबरच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, प्राचार्य यांनीही काही पुस्तके भेट स्वरुपात दिली असल्याचे कुलगुरूंनी या प्रसंगी सांगितले.

नागरबाई शिंदे यांचा मातृ-पितृ पुरस्काराने गौरव
स्वतः अल्पशिक्षित असूनही आपल्या मुलाला मोठ्या संघर्षातून जिद्दीने शिकवून कुलगुरू पदापर्यंत पोहोचविणाऱ्या श्रीमती नागरबाई शिंदे यांचा या कार्यक्रमात संभाजीराव पाटणे यांच्या हस्ते मातृ-पितृ पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. या प्रसंगी त्यांचे सुपुत्र कुलगुरू डॉ. शिंदे व स्नुषा सौ. अनिता यांच्यासह शिंदे परिवारातील अनेक सुहृद उपस्थित होते. आपल्या आईचा गौरव केल्याबद्दल डॉ. शिंदे यांनी आयोजकांना मनापासून धन्यवाद दिले.

Friday, 24 November 2017

संविधान दिनानिमित्त विद्यापीठाची अभिनव ‘संविधान दूत’ योजना




Dr. S.S. Mahajan
कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे येत्या संविधान दिनानिमित्त (दि. २६ नोव्हेंबर) संविधान दूत ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी आज येथे दिली.
संविधान दूत उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. महाजन म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक सक्षम व प्रगल्भ व्हावेत, त्यांच्या माध्यमातून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता आदी उदात्त मानवी मूल्यांची रुजवात व्हावी तसेच भारतीय संविधानाबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ कार्यक्षेत्रात विशेष योजना राबविण्याचे डॉ. आंबेडकर केंद्राने ठरविले होते. त्यानुसार संविधान दूत ही योजना हाती घेण्यात येत आहे. भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांत जागृती निर्माण करणे व त्यांच्या माध्यमातून समाजालाही त्याविषयी अवगत करणे, मानवी हक्क व मानवी मूल्यांप्रती जागृती निर्माण करणे आणि त्यांच्या रुजवातीसाठी प्रयत्न करणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत सांगताना डॉ. महाजन म्हणाले, सांविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य संविधान दूत करतीलच; शिवाय, डॉ. आंबेडकर केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदर केंद्राचे महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून संविधानदूत कार्य करतील. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयातील किमान एका शिक्षकाची संविधान दूत म्हणून निवड करतील आणि त्यांचे नाव डॉ. आंबेडकर केंद्राला कळवतील. या प्रकारे प्रत्येक महाविद्यालयात किमान एक संविधान दूत कार्यरत असेल. डॉ. आंबेडकर केंद्र आणि संलग्नित महाविद्यालये एकत्रितपणे निर्धारित उद्दिष्टांनुसार जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करतील. यामध्ये व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आदींचा समावेश असेल. यासाठी संविधान दूत समन्वयक म्हणून काम पाहतील. त्याचप्रमाणे संयुक्त संशोधनकार्यही हाती घेण्यात येईल. त्यात महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह अन्य समाजघटकांनाही आवश्यकतेनुसार सामावून घेतले जाईल. या सर्व प्रक्रियेमध्ये संविधान दुताची भूमिका महत्त्वाची असेल.

संविधानाविषयी जागृतीसाठी महत्त्वाचा उपक्रम
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राने हाती घेतलेला संविधान दूत हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या माध्यमातून भारतीय संविधानाविषयी विद्यापीठ परिक्षेत्रात जागृती करण्यात येणार असून सांविधानिक मूल्ये आणि मूलभूत मानवी मूल्यांबाबत विद्यार्थी व नागरिक यांना अवगत करण्याच्या दृष्टीने तो अत्यंत उपयुक्त ठरेल. या उपक्रमाला सर्व महाविद्यालये आणि नागरिकांनीही आवश्यक सहकार्य देऊन यशस्वीपणे राबविण्यास हातभार लावावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.

संविधान दिनानिमित्त सोमवारी परिसंवाद
डॉ. आंबेडकर केंद्रातर्फे संविधान दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवारी (दि. २७) सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. परिसंवादात डॉ. रविवंद होवाळ (सोलापूर), प्रा. सुभाष दगडे (सांगली) आणि राजेंद्र कुंभार (सातारा) हे सहभागी होतील. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के असतील. या परिसंवादाचा लाभ घेण्याचे आवाहनही संचालक डॉ. महाजन यांनी केले आहे.

Saturday, 18 November 2017

सामाजिक भान जितके अधिक, तितके विद्यापीठांचे भवितव्य उज्ज्वल

- कुलगुरू डॉ. एस.पी. काणे यांचे प्रतिपादन


शिवाजी विद्यापीठाच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी समारंभाचे प्रमुख पाहुणे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे.

शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे.



शिवाजी विद्यापीठाच्या ५५व्या वर्धापन दिन समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. पी.डी. राऊत. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


विद्यापीठातील गुणवंत शिक्षक-  डॉ. राजश्री साळुंखे

संलग्नित महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक- डॉ. सुरेश पाटील.

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. रमेश अडसूळ


विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना डॉ. मिलींद जोशी
 
विद्यापीठ गुणवंत सेवक- विश्वास शिरोळे

विद्यापीठ गुणवंत सेवक- रत्नमाला साळुंखे

 
विद्यापीठ गुणवंत सेवक- आनंदा पाटील

 
संलग्न महाविद्यालयातील गुणवंत सेवक- रवींद्र हिडदुग्गी


शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा वर्धापनदिन उत्साहात

Dr. S.P. Kane
कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: विद्यापीठांचे सामाजिक भान जितके अधिक तितके त्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल असते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५५वा वर्धापन दिन समारंभ आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
कुलगुरू डॉ. काणे म्हणाले, मानवी जीवनात जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. त्यामुळे त्या दरम्यान आपण काय करावयाचे, कुठल्या पद्धतीने करावयाचे, याची पसंती ठरविता येत असते. संस्था मात्र अमर्त्य असते. संस्थेचे वय जितके वाढेल, तितके तिचे चिरतारुण्य, सशक्तता आणि चैतन्य वृद्धिंगत होत असते. वाढत्या वयागणिक तिची भरभराट होत असते. विद्यापीठांचे स्वरुपही तसेच व्यापक आहे. ते नदीप्रमाणे प्रवाही आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे तिचे दोन तीर आहेत आणि प्रशासन हा या दोहोंना जोडणारा पूल आहे. यातील एकही बाजू कमकुवत झाली की प्रवाहात बाधा निर्माण होते. हा प्रवाह अखंडित ठेवण्याचे काम विद्यापीठांचे सामाजिक भान आणि बांधिलकी करीत असते.
कुलगुरू डॉ. काणे पुढे म्हणाले, आजच्या शैक्षणिक भोवतालामध्ये गुरूशिष्याचे नाते हे ग्राहक आणि सेवा-पुरवठादार अशा पद्धतीचे बनत चालले आहे, ही बाब चिंताजनक आहे. त्याचवेळी आजची पिढी अत्यंत स्मार्ट व ज्ञानपिपासू आहे. नवमाध्यमांमुळे माहितीचे भांडार त्यांच्यासाठी खुले झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. या बदलत्या परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांत समतोल साधण्याची जबाबदारी विद्यापीठांवर आहे. ती जबाबदारी निभावण्यासाठी विद्यापीठांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली यशाची पंचसूत्री अंमलात आणण्याची गरज आहे. यामध्ये जिंकण्याची ऊर्मी, आवश्यक साधने, विद्या अथवा ज्ञान, प्रतिष्ठान (ज्ञान उपयोजनाचे योग्य ठिकाण) आणि सुकर्म (दैव) ही ती पंचसूत्री होय. संस्थेची प्रगती ही तेथील लोकांवरच अवलंबून असते. आपल्या हातून चांगले आणि समाजोपयोगी काम व्हावे, ही भावना आणि मदतीला धावून जाण्याची वृत्ती यातूनच या प्रगतीची दिशा अवलंबून असते.
सन २०११मध्ये नागपूर विद्यापीठाचा परीक्षा नियंत्रक म्हणून एका परिषदेच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठास भेट दिली असता येथील वातावरण आणि लोक पाहून आपण भारावून गेल्याचे डॉ. काणे यांनी सांगितले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छ-सुंदर, नीटनेटक्या परिसराबरोबरच येथील लोकांची समन्वयवादी वृत्ती, सुसूत्रपणे काम करण्याची पद्धती, नवीन गोष्टी आत्मसात करण्याची स्वीकारार्हता या बाबींनी या विद्यापीठाचा मी चाहता बनलो.

कुलगुरू डॉ. शिंदे हे सुषेण
राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला दिशा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिंदे बजावित असलेल्या कामगिरीबद्दल कौतुकोद्गार काढताना डॉ. काणे यांनी त्यांना रामायणातील सुषेणाची उपमा दिली. ते म्हणाले, रावणाचा राजवैद्य असलेल्या सुषेणाने जसे लक्ष्मण मूर्च्छित असताना आपली व्यावसायिक कर्तव्यनिष्ठा स्मरुन त्याच्यावर उपचार केले, बरे केले; त्याचप्रमाणे डॉ. शिंदे हे सुषेणाप्रमाणे आपल्या शैक्षणिक व प्रशासकीय कौशल्यांचा लाभ राज्यांतील इतर विद्यापीठांना करून देत आहेत. त्यांना ही संधी मिळते कारण त्यांच्यामागे शिवाजी विद्यापीठाची विश्वासार्हता आहे.

अन्यत्र मिळालेल्या संधी या केवळ शिवाजी विद्यापीठामुळेच: कुलगुरू डॉ. शिंदे यांची कृतज्ञता

Dr. Devanand Shinde
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, गेल्या वर्षभरात मला या राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठास व्हिजिटींग स्कॉलर म्हणून भेट देण्याची संधी लाभली. गेल्याच आठवड्यात बेल्जियमच्या राणी मॅथिल्डा यांच्यासमवेत नवी दिल्ली येथे झालेल्या एकॅडेमिक राऊंड टेबल परिषदेत सहभागी होणारा देशातील एकमेव कुलगुरू ठरलो. या सर्व संधी केवळ शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणूनच मला प्राप्त झाल्या, याची कृतज्ञ नोंद त्यांनी घेतली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपल्या भाषणात गत वर्षभरात विद्यापीठाने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या लौकिकाचा तसेच वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेतला. ते म्हणाले, गतवर्षी घोषित केल्याप्रमाणे विद्यापीठ मोबाईल ॲप, पेमेंट गेटवे व एम्प्लॉईज कॉर्नर या सुविधा कार्यान्वित झाल्या आहेतच, पण रोखविरहित आर्थिक व्यवहारांना चालना देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला बळकटी देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाने कॅश विभागात पॉईंट ऑफ सेल अर्थात पी.ओ.एस. मशीन्स बसविली आहेत. विद्यापीठाचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्णतः रोखविरहित स्वरुपात करण्यास चालना दिली असून यंदा दीक्षान्त शुल्क ऑनलाइन भरणा करण्याची प्रणाली शंभर टक्के यशस्वी झाली आहे. त्याचप्रमाणे अधिविभागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सेमिनार, कार्यशाळा यांची नोंदणी करणे, नोंदणी फी पेमेंट गेटवे द्वारा ऑनलाइन स्वीकारणे, कार्यशाळा प्रमाणपत्र डिजीटल स्वरुपात उपलब्ध करून देणे  ही सर्व कामे ऑनलाइन पद्धतीनेच होत आहेत. विद्यापीठात अत्यंत यशस्वीपणे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ युवा महोत्सव तथा शिवोत्सव-२०१७ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या आव्हान-२०१७ या उपक्रमांसाठीची नोंदणी, आवश्यक माहितीची देवाण-घेवाण आणि प्रमाणपत्र उपलब्धता आदी बाबीही ऑनलाइन एन्ड्रॉईड एप्लीकेशनच्या माध्यमातून यशस्वीपणे करण्यात आल्या. विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दर्जेदार ग्रंथांना असलेली अभ्यासकांतील मागणी लक्षात घेता गेल्या १७ जून रोजी विद्यापीठाच्या ऑनलाइन बुक स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे जगाच्या पाठीवरुन कोठूनही विद्यापीठाचे ग्रंथ खरेदी करणे अभ्यासक, संशोधकांना आता शक्य होणार आहे. सध्या विभागाच्या बैठकांचे कामकाज पेपरलेस होण्याच्या दृष्टीने ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
परीक्षाविषयक कामकाज अधिक गतिमान व सुरळीत होण्याच्या दृष्टीने विद्यापीठ करीत असलेल्या प्रयत्नांचीही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, केवळ मार्च-एप्रिल २०१७च्या सत्रातील परीक्षांबद्दल सांगायचे झाले तर, एकूण ६२१ परीक्षांपैकी ३१२ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत, १८९ निकाल ४५ दिवसांच्या आत लागले. परीक्षांचा कालावधीही ५६ दिवसांवरुन ४२ दिवस इतका कमी केल्याने वेळ, श्रम आणि आर्थिक बचतही साध्य झाली. परीक्षा विभागाने प्रश्नपत्रिकांच्या वितरणासाठी एस.आर.पी.डी. अर्थात सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी या ई-मोड प्रणालीचा अवलंब करून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे वितरित केल्या होत्या. आता याची व्याप्ती वाढवून आणखी काही नव्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. कॉम्प्युटर सायन्स व आय.टी. शाखांमधील २४ विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या घेण्यात येत आहेत. पथदर्शी प्रकल्पांतर्गत बी. फार्मसी. व एम.फार्मसी. या अभ्यासक्रमांच्या मूल्यांकित उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग व मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना ई-मोड स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी होतो आहे. त्यायोगेही प्रत्यक्ष छपाई, पोस्टेज यांवरील खर्चही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे. डिजीटल इंडिया उपक्रमांतर्गत पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रे व इतर शैक्षणिक कागदपत्रे संगणकीय स्वरुपात साठवणे व हाताळण्याचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर सी.डी.एस.एल. या संस्थेने हाती घेतला आहे. आपण त्यांच्याशी सामंजस्य करार केला असून त्याअंतर्गत प्राथमिक टप्प्यात ५२ हजार विद्यार्थ्यांचा डेटा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यंदाच्या दीक्षान्त समारंभासाठी विद्यार्थ्यांना पत्राऐवजी एसएमएस तसेच ऑनलाइन स्वरुपात सूचना देण्यात आल्या. त्यामुळे सुमारे ५० हजार पत्रांची छपाई तसेच पोस्टेज अशा सुमारे १२ लाख रुपयांच्या खर्चाची बचत झाली. सीबीसीएस प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत राजभवन येथे आयोजित बैठकीवेळी परीक्षा सुधारांबाबतचा आढावा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. महेश काकडे यांनी सादर केला. तेव्हा परीक्षा विभागाची पुस्तिका पाहून मा. कुलपती यांच्या सचिवांनी त्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
परीक्षा विभागाने यंदाच्या हिवाळी सत्रापासून आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या हजर-गैरहजरचा अहवाल कनिष्ठ पर्यवेक्षकाकडून ऑनलाइन भरून घेऊन तत्काळ विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर त्याचा लघुसंदेश (एसएमएस) पाठविला जातो. यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर नजरचुकीने घातलेल्या चुकीच्या बैठक क्रमांकाची माहिती लगेच प्राप्त होते, शिवाय, ई-मार्कशीट अंतिम करताना अडचण येणार नाही. तसेच, याच सत्रापासून प्रायोगिक तत्त्वावर फार्मसीच्या ४५६ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी पीडीएफ स्वरुपात त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविल्या जातील. यातूनही सुमारे १५ लाख रुपयांची बचत अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात 'नॅक'चे '+''' मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील २० संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशांत पांडेकर याचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.
तसेच, सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बी.एस्सी.चा विद्यार्थी प्रशांत पांडेकर याच्या दृष्टी: दि व्हीजन या लघुपटाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्याचा या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.

विविध पारितोषिक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे: विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. प्रकाश दत्तात्रय राऊत (पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख), प्रा. डॉ. (श्रीमती) राजश्री संदीप साळुंखे (रसायनशास्त्र अधिविभाग). महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक: डॉ. सुरेश सोपानराव पाटील (सहयोगी प्राध्यापक, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज), बॅ.पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. रमेश कोंडीबा अडसूळ (श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली), विद्यापीठातील गुणवंत सेवक: डॉ. मिलींद जगन्नाथ जोशी (समन्वयक, इंटरनेट युनिट), श्री. विश्वास सुबराव शिरोळे (अधीक्षक, परीक्षा प्रमाद), श्रीमती रत्नमाला दत्तात्रय साळुंखे (सहा. अधीक्षक, भांडार विभाग), श्री. आनंदा महादेव पाटील (हेड-माळी, उद्यान विभाग). महाविद्यालयीन गुणवंत सेवक: श्री. रवींद्र श्रीशैलाप्पा हिडदुग्गी (कनिष्ठ लिपीक, तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, नेसरी).
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. श्रीमती नंदिनी पाटील व कु. संज्योत माने यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.