Friday, 29 March 2019

शिवाजी विद्यापीठात ‘कलर्स-२०१७’ समारंभ उत्साहात

विद्यापीठाच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सिद्ध व्हावे: गिरीजा पाटील-देसाई






कोल्हापूर, दि. २९ मार्च: विद्यापीठाच्याकलर्सविजेत्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात यश मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे कौशल्य दर्शविण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय नेमबाज व ठाण्याच्या वनाधिकारी गिरीजा संदीप पाटील-देसाई यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे सन २०१७-१८ मध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गुणगौरव समारंभ (कलर्स-२०१७) आज मानव्यशास्त्र सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
यावेळी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवून सर्वाधिक गुण संपादन केल्याबद्दल दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांना सन २०१७-१८चे खेळांमधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. न्यू कॉलेजने सलग तिसऱ्यांदा हा बहुमान पटकाविला आहे. कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्यासह खेळाडूंनी हा गौरव स्वीकारला.
श्रीमती गिरीजा पाटील-देसाई म्हणाल्या, आंतरविद्यापीठ स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकण्याची जिद्द खेळाडूंच्या मनात जागली पाहिजे. त्यासाठी जागतिक स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील प्रवाह काय आहेत, याची माहिती खेळाडूंनी करून घ्यायला हवी. त्यासाठी तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घ्यावा. आपल्या स्थानिक मार्गदर्शकांबरोबरच जागतिक स्तरावर उपलब्ध कोचिंगचीही मदत घेणे आवश्यक आहे. त्यासठी येणाऱ्या कालखंडात आपल्या कारकीर्दीचे योग्य नियोजन करा आणि किती उंच भरारी घ्यायची, हे ठरवून त्या दिशेने झेप घ्या, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
क्रीडापटूंसाठी राज्य तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पाच टक्के राखीव जागा असतात, त्याचाही लाभ घ्यायला हवा. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचा सराव करणे आवश्यक असल्याचे सांगून पाटील यांनी तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे, राही सरनोबत असे आम्ही सारेच शासकीय सेवेत आपापल्या कामाचा ठसा उमटविण्यात यशस्वी झालो आहोत, असे अभिमानपूर्वक नमूद केले.

कुलगुरू डॉ. शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा लौकिक देशभरात उंचावण्यात क्रीडापटूंचे योगदान मोलाचे आहे. केवळ पारंपरिक खेळांतच नव्हे, तर रग्बी, ग्रीको-रोमन कुस्ती, फेन्सिंग अशा या विभागाला अपारंपरिक असणाऱ्या क्रीडा प्रकारांतही त्यांनी यश मिळविले आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. या खेळाडूंना सराव व स्पर्धेदरम्यान विमा संरक्षण योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना दोन लाख रुपयांचा मदतनिधी अशा अनेक योजना विद्यापीठ राबविते आहे. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शारीरिक शिक्षण संचालकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व संचालकांसाठीही वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक प्रकारांत पाच सुवर्ण, पाच रौप्य व तेरा कांस्य अशी एकूण २३ पदके मिळविणाऱ्या आणि २१व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०१७मध्ये  सहा सुवर्ण, आठ रौप्य व सात कांस्य अशी एकूण २१ पदके प्राप्त करणाऱ्या क्रीडापटूंचा गिरीजा पाटील-देसाई यांच्या हस्ते ब्लेझर, स्मृतिचिन्ह, पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेता अक्षय मधुकर देशमुख (तलवारबाजी), खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक विजेती अश्विनी राजेंद्र मळगे (वेटलिफ्टिंग), सुवर्ण विजेता ओंकार मारुती हंचनाळे (खो-खो), कांस्य विजेती मयुरी रामचंद्र देवरे (वेटलिफ्टिंग) यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आयर्नमन स्पर्धेत (२ किमी जलतरण+ १० किमी सायकलिंग+ २१ किमी धावणे) महाराष्ट्राकडून सर्वाधिक जलद वेळ (६ तास १० मि.) नोंदवून फ्रान्स येथील स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विवेकानंद महाविद्यालयाच्या सुप्रिया विराज निंबाळकर हिचाही गौरव करण्यात आला.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षक जे.एच. इंगळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बाबासाहेब उलपे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, छत्रपती पुरस्कार विजेते संभाजी पाटील यांच्यासह शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडापटू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 27 March 2019

जलसाक्षरता रुजविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा

- जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे आवाहन



शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ. राजेंद्रसिंह राणा, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह (डावीकडून) डॉ. जयदीप बागी, डॉ. डी.आर. मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अजय कोराणे, डॉ. पी.डी. राऊत.

डॉ. राजेंद्रसिंह राणा

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. राजेंद्रसिंह राणा. शेजारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदी.

कोल्हापूर, दि. २७ मार्च: पाण्यावरुन होणारे तिसरे जागतिक महायुद्ध रोखायचे झाल्यास जलसाक्षरतेला पर्याय नाही. जलसाक्षरता रुजविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स एन्ड इंजिनिअर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागे व्हा, पंचगंगेसाठी या मोहिमेअंतर्गत व जागतिक जलदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

जलसाक्षरतेचे काम महाराष्ट्रात अत्यंत उत्तम पद्धतीने झाल्याचे कौतुकोद्गार काढून डॉ. राणा म्हणाले, या मोहिमेमुळे महाराष्ट्र अधिकाधिक पाणीदार होण्यास मदत झाली. जलयोद्धा आणि जलनायक नियुक्त करण्याची कल्पनाही अत्यंत महत्त्वाची ठरली. तथापि, शिवाजी विद्यापीठासह राज्यातील प्रत्येक विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना, भूगर्भशास्त्र तसेच अन्य संबंधित विषयांशी निगडित विद्यार्थ्यांचे चमू करून आपापल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये जलसाक्षरताविषयक जगजागृती मोहिमा राबविण्याची गरज आहे. आजघडीला सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्याही महाराष्ट्रातच होत आहेत. या पार्श्वभूमीवर, येथून पुढच्या काळात मध्यवर्ती सिंचन व्यवस्था ही आता कालबाह्य होऊ लागली आहे. एकविसाव्या शतकात आता जमिनीचे जल-पुनर्भरण हाच पाण्यासाठीचा संवर्धनशील उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र सिंह राणा म्हणाले, जगात नागरिकांचे ऐच्छिक स्थलांतर हितकारक आहे. मात्र परिस्थितीजन्य सक्तीचे स्थलांतर हे कधीही हितकारक ठरत नाही. सद्यस्थितीत देशातील स्थलांतर गावांकडून मोठ्या शहरांपुरते मर्यादित आहे. मात्र, त्यामुळेही शहरांवरील एकूणच भार वाढतो आहे. यापुढील काळात मध्य आशिया आणि आफ्रिकेतील नागरिकांप्रमाणे आपल्यावर देश सोडण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता आपण वेळीच घ्यायला हवी. गावे उजाड होणे आणि शहरांवरील लोकसंख्येच्या बोजा वाढणे या दोन्ही बाबी धोकादायक आहेत. त्या दृष्टीने नैसर्गिक स्रोतांचे पुनर्भरण व पुनरुज्जीवन अत्यंत गरजेचे आहे.
कोल्हापूरची सुमारे चार तासांची भ्रमंती अत्यंत समाधानकारक व आनंददायी ठरल्याचे सांगून डॉ. राणा म्हणाले, जयंती आणि गोमती या नद्यांचे प्रदूषण बऱ्याच अंशी नियंत्रणात राखले असल्याचा हा आनंद आहे. कोल्हापूरची एसटीपी यंत्रणा (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) कार्यरत आहेत, ही फार महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा दर्जा सुधारण्याचे काम येथे सातत्याने सुरू राहील, याची दक्षता घ्या. त्याचप्रमाणे शासनाच्या नोंदींमध्ये गोमती व जयंती या मूळच्या नद्यांची नाले म्हणून नोंद झालेली आहे. ती बदलून पुन्हा त्यांना नद्या म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी त्यांच्या कारकीर्दीत राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छ पाणी व सांडपाणी ही आपण स्वतंत्रच ठेवले पाहिजेत. सांडपाणी स्वच्छ पाण्यात मिसळू देऊन त्यानंतर त्याचे शुद्धीकरण करणे खूपच महाग पडते. शुद्धीकरणावरील खर्च अनाठायी वाढतो. जेथून सांडपाणी निर्माण होते, त्याच ठिकाणी त्यावर प्रक्रिया केल्यास तर त्याच्या शुद्धीकरणाचा खर्च शंभर पटीने कमी होऊ शकतो, असे मतही राणा यांनी व्यक्त केले.
पाण्याचे संवर्धन करावयाचे, तर आता जंगलांना आणि गवताला आगी लावणे थांबविले पाहिजे. त्याचप्रमाणे जमिनीची धूप थांबवावयाची असेल, तर गवत वाचविण्याची मोठी गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
यावेळी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपण शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे, असे सांगितले. ते म्हणाले, मी संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी. मात्र राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांत सहभागाची संधी मिळाली. पर्यावरण संवर्धनाचे धडे तिथेच गिरवले. संपूर्ण शासकीय सेवेची प्रेरणा एन.एस.एस.च्या माध्यमातून मिळाली. कोणताही उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठ केवळ आपल्या कॅम्पसवरीलच नव्हे, तर कोल्हापूर शहरासह या जिल्ह्यातील नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनासाठीही प्रयत्नशील आहे. या परिसरातील हे नैसर्गिक वरदान टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ सातत्याने योगदान देत राहील, याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी विनोद बोधनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी, असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, अनिल कानडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत यांनी केले. श्री. कोराणे यांनी प्रास्ताविक केले. गौरी चोरगे, आसावरी जाधव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. आरती परीट यांनी सूत्रसंचालन केले, तर वंदना कुसाळकर यांनी आभार मानले. यावेळी इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बेपानी से पानीदार बना शिवाजी विश्वविद्यालय
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या कारकीर्दीत आपण तीन दिवस शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवर मुक्काम केल्याची आठवण सांगताना डॉ. राणा म्हणाले, त्यावेळी डॉ. साळुंखे यांच्याशी चर्चा करताना विद्यापीठाच्या साडेआठशे एकराच्या परिसरामध्ये पाण्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण होण्याची क्षमता असून त्या दृष्टीने जलसंवर्धनाच्या योजना राबवाव्यात, असे त्यांना सांगितले होते. त्यानंतर आज या विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अवघ्या दहा वर्षांत विद्यापीठ बेपानी से पानीदारव स्वयंपूर्ण झाल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. जमिनीवरील पाण्याबरोबरच जमिनीखालील पाण्याचे संवर्धन करण्यात विद्यापीठ यशस्वी ठरले आहे. त्याचप्रमाणे येथील आर.ओ. प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याचा प्रयोगही आवडल्याचे त्यांनी सांगितले.
व्याख्यानापूर्वी डॉ. राणा यांनी विद्यापीठ परिसरात फेरफटका मारून विद्यापीठाच्या जलसंवर्धनाच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Wednesday, 20 March 2019

माणगाव परिषद शताब्दीनिमित्त विद्यापीठातर्फे वर्षभर विविध उपक्रम: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के



शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभ प्रसंगी राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. यावेळी (डावीकडून) आलोक जत्राटकर, जयसिंग पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, आनंद खामकर आदी.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून)  प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभ प्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन.

कोल्हापूर, दि. २० मार्च: माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठासह माणगाव येथेही विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी घोषणा प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केली.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषद शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन आज प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे प्रमुख उपस्थित होते.
Dr. D.T. Shirke
डॉ. शिर्के म्हणाले, माणगाव परिषद ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नेहबंध निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोघांचे परस्परसंबंध, मैत्रभाव दर्शविणारी कागदपत्रे, पत्रे, छायाचित्रे आदींचे संकलन करण्याबरोबरच संशोधन, चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. माणगाव परिषदेत जे महत्त्वाचे ठराव करण्यात आले, त्यासंदर्भात गेल्या शंभर वर्षांत आपण किती प्रगती केली, याचाही संशोधकीय धांडोळा केंद्राच्या वतीने घेण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आलोक जत्राटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्नेहबंध या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, बाबासाहेब आणि शाहू महाराज यांचा एकमेकांशी परिचय झाल्यानंतर अवघ्या तीनेक वर्षांत महाराजांचे निधन झाले. तथापि, लंडनला उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यास जाईपर्यंत अवघे काही महिने प्रत्यक्ष आणि त्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत पत्रव्यवहाराद्वारे अप्रत्यक्ष संवाद कायम राहिला. 
Alok Jatratkar
त्या दोघांमध्ये एकमेकांप्रती निर्माण झालेला मैत्रभावाचा ओलावा त्यांच्या पत्रव्यवहारातून पाहायला मिळतो. माणगाव येथे २१-२२ मार्च १९२० रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांची पहिली परिषद आणि त्यानंतर ३०-३१ मे १९२० रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद या दोन परिषदा या दोघांचे विचार व स्नेहसंबंध समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाबासाहेबांना मूकनायक सुरू करण्यासाठी त्या काळात सुमारे २५०० रुपयांची देणगी देणे असो की, लंडनला रवाना होत असताना त्यांना दिलेला १५०० रुपयांचा निधी असो, या घटना म्हणजे शाहू महाराजांचे त्यांच्यावरील प्रेम दर्शविणाऱ्या आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षाच व्यक्त करणाऱ्या आहेत. भारताच्या सामाजिक चळवळीला या दोन व्यक्तीमत्त्वांनी प्रदान केलेले अधिष्ठान आणि प्रेरणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा संशोधकीय अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या दोघांच्या स्नेहबंधाच्या अनुषंगाने ध्वनीचित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.)ग.गो. जाधव अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ पत्रकार-संपादक जयसिंग पाटील, डॉ. सर्जेराव पद्माकर, कास्ट्राईबचे आनंद खामकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Dr. S.S. Mahajan
माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे, छायाचित्रे, आठवणी यांचे संकन करण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून ज्यांच्याकडे त्या संदर्भातील कागदपत्रे असतील, त्यांनी ती केंद्राकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले आहे.

शताब्दीनिमित्त पहिले व्याख्यान शनिवारी
माणगाव परिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने आंबेडकर केंद्राच्या वतीने वर्षभरात विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालेतील पहिले पुष्प प्रा. विनय कांबळे गुंफणार आहेत. माणगाव परिषद आणि तिचे सामाजिक राजकीय संदर्भ या विषयावर प्रा. कांबळे यांचे व्याख्यान येत्या शनिवारी (दि. २३ मार्च) सकाळी १०.३० वाजता केंद्रात आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन असतील.


Wednesday, 13 March 2019

लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी सोशल मिडीयाचा योग्य वापर होणे आवश्यक - जिल्हाधिकारी दौलतराव देसाई


कोल्हापूर, दि.13 मार्च - भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी आणि भारतीय लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी सोशल मिडीयाचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.तसेच, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता सद्सदविवेकबुध्दीने प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता जनसंवाद अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'निवडणूका आणि सोशल मीडिया' या विषयावर सुवर्णमहोत्सवी एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दौलतराव देसाई बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.
जिल्हाधिकारी दौलतराव देसाई पुढे बोलताना म्हणाले, देशामध्ये साधारण नऊशे दशलक्ष मतदार 2019 च्या निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत.कोल्हापूर जिल्हयामध्ये साधारण बत्तीस लाख पंचाहत्त हजार मतदार आहेत. यामध्ये आठरा ते एेकोणतीस या तरूण वयोगटामध्ये सहा लाख मतदार आहेत.सोशल मिडीयाचा वापर या तरूण नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आहे.ग्रामीण आणि शहरी भागातील तरूणांमध्ये सोशल मिडीयाच्या वापरामध्ये फारसा फरक नाही.सोशल मिडीया ही दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मिडीयाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल.सोशल मिडीया हे अदृश्य हातांनी हाताळले जाते.  यामध्ये प्रत्येक नागरिक हा पत्रकार म्हणून काम करीत असतो.समाजाच्या भल्यासाठी या अदृश्य हातांचा वापर झाला पाहिजे.आज, देशामध्ये सहाशे दशलक्ष मोबाईल इंटरनेट वापरकर्ते आहेत ते दिवसातील दोनशे मिनिटे सोशल मिडीयावर खर्च करीत असतात. या माध्यमांद्वारे कमी वेळेत फार मोठया समुहापर्यंत संदेश पोहचू शकतो.सोशल मिडीयाच्या वापरामध्ये राजकीय पक्षांमध्ये सुसंगती असली पाहिजे. आभासी प्रतिमा निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होवू शकतो.अशा वेळी सोशल मिडीयाचा निवडणूकांमध्ये वापर करताना कोड ऑफ कंडक्टचा योग्य वापर प्रत्येकाने केला पाहिजे.फेक न्युजवर कार्यवाही करण्यासाठी देशपातळीवर आयटी ॲक्टमध्ये दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे.सोशल मिडीयावर उमेदवाराची प्रसिध्दी अथवा तिरस्कार करणे अयोग्य ठरेल.मिडीया मॉनिटरींग कक्षाकडून प्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय राजकीय पक्षांना, उमेदवारांना सोशल मिडीयावर प्रचार करता येणार नाही.सोशल मिडीयाचा वापर समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी होणे आवश्यक आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले,वापरापेक्षा गैरवापराकडे सोशल मिडीयाचा जास्त प्रमाणात वापर होताना दिसत आहे.सोशल मिडीयाच्या वापराबाबत आचारसंहिता आलेली आहे. अशावेळी समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करणे हे माध्यमांची कामे आहेत.सोशल मिडीयाच्या वापराबाबत तरूण पिढी आणि सर्वच स्तरांमध्ये संस्कार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.समाजामध्ये, देशामध्ये तेढ निर्माण होणार नाही यासाठी मेसेज फॉर्वर्ड करीत असताना नेहमी जागृक असले पाहिजे.इंटरनेट हे सध्या जीवन जगण्यासाठीचे अनिवार्य साधन झालेले आहे.इंटरनेट हे रक्तविरहीत क्रांती आहे, या क्रांतीने माहितीचे स्वातंत्र्य दिले.इंटरनेट, सोशल मिडीया या सारख्या महासागरामध्ये वावरताना संस्कार हेच योग्य होकायंत्र होवू शकते.विवेक, संवाद, सुसंवाद या त्रिसुत्रीचा उपयोग सोशल मिडयाचा वापर करताना प्रत्येकान केला पाहिजे.
याप्रसंगी, पद्मश्री सुधाकर ओलवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागप्रमुख डॉ.निशा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सहायक प्राध्यापकडॉ.शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी विभागीय माहिती संचालक सतीश लळीत, आयटी तज्ज्ञ राजेंद्र पारिजात, सोलापूर विद्यापीठाचे डॉ.रविंद्र चिंचोळकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांचेसह विविध अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
                                                                                  ------


प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांनी मानव्यशास्त्र इमारत समोरील बागेमध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते.यावेळी विविध छायाचित्रांची अतिशय सुबक पध्दतीने झाडांखाली मांडणी करण्यात आली होती.समाजातील विदारकता आणि कटुसत्याचे चित्रण पाहण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.यावेळी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे आणि जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी पद्मश्री ओलवे यांच्या छायाचित्रांची आवर्जुन पाहणी केली.