कोल्हापूर, दि. ३१
डिसेंबर: कोल्हापूरचा गार्डन
क्लब व राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
करण्यात आलेल्या ५०व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या
फुलांना व उद्यानांना सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त होणे म्हणजे कोल्हापूर शहराच्या
फुप्फुसाची देखभाल करणाऱ्या श्रमिकांचाच सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.
येथील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णमहोत्सवी पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये
शिवाजी विद्यापीठाचा उद्यान विभाग ४० गटांत सहभागी झाला. त्यापैकी ३० गटांत यश
मिळविले. १२ गटांत प्रथम क्रमांक, १२ गटांत द्वितिय क्रमांक आणि ६ गटांत तृतीय
क्रमांक पटकावून स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. या निमित्त उद्यान विभागाच्या
सहकाऱ्यांसाठी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या
प्रमुख उपस्थितीत चहापानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा परिसर आणि येथील उद्याने
नेत्रसुखद तर आहेतच, पण कोल्हापूर शहराचे फुप्फुस म्हणून या परिसराकडे पाहिले
जाते. या परिसराची देखभाल करणारे उद्यान विभागातील सहकारी हे पुरस्कारापलिकडे
अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत. वर्षभर सर्व परिस्थितीत उद्यानांची देखभाल ते
अत्यंत आत्मियतेने करतात. विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांची शोभा या विभागाने
सदैव तयार ठेवलेल्या कुंड्यांतील रोपेच वाढवितात. आता विभागाने पुढच्या पाच
वर्षांसाठीचा आराखडा तयार करावा आणि विद्यापीठाचे उद्यान राज्यात सर्वोत्कृष्ट
बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, पूर्वी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे
इच्छा असूनही उद्यानाच्या देखभालीमध्ये अडचणी येत असत. मात्र, आता पाण्याच्या
अनुषंगाने विद्यापीठ परिसर स्वयंपूर्ण झाल्यामुळे उद्यान विभागाला पाण्याची योग्य
तऱ्हेने उपलब्धता होत आहे. ही महत्त्वाची बाब आहे. उद्यान विभागाने असेच कार्य
करीत राहावे.
यावेळी उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलकर्णी, डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आपले मनोगत
व्यक्त केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अभियांत्रिकी
विभागाचे मेस्त्री गणपती मस्ती, उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव, हेडमाळी
संभाजी कांबळे, हेडमाळी संजय सोनुले, माळी सुरेश वागवेकर उपस्थित होते.
गार्डन क्लब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने प्राप्त केलेली पारितोषिके
पुढीलप्रमाणे-
क्लास-१: गुलाब (एकच फूल)
पांढरा- प्रथम क्रमांक
फिका गुलाब- प्रथम व तृतीय
नारिंगी- द्वितिय व तृतीय
गडद पिवळा- प्रथम व द्वितिय
मिश्र रंग व इतर- प्रथम
क्लास-७ (फुले)
डेलिया- प्रथम
मिनी डेलिया- प्रथम
झिनिया- द्वितिय
अॅस्टर- तृतीय
कर्दळ- तृतीय
शेवंती- द्वितिय व तृतीय
झेंडू- प्रथम व द्वितिय
सालव्हिया- प्रथम व द्वितिय
निशीगंध- प्रथम व द्वितिय
जास्वंद- द्वितिय
इतर फुले- द्वितिय
दुरंगी- द्वितिय
क्लास-९ (कुंड्यांतील रोपे)
कोलीयस- प्रथम
बेगोनिया- तृतीय
इतर झाडे (फुलांशिवाय)- द्वितिय
इतर झाडे (फुलांसह)- द्वितिय
औषधी व सुगंधी वनस्पती- द्वितिय व तृतीय