Saturday, 18 January 2020

नेतृत्व गुणांचा उपयोग सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी करणे आवश्यक - आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी


कोल्हापूर, दि.18 जानेवारी - सकारात्मक विचारांनी प्रेरीत होवून सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से) यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने विद्यापीठ अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये करण्यात आले होते.कार्यशाळेचे उद्धाटन प्रसंगी 'प्रशासनातील नेतृत्व' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ.कलशेट्टी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर होते. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.श्रीमती मिनाक्षी गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुक्त डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील नेतृत्व विकास घडविण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.  माझ्या जडण घडणीमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचा फार मोठा वाटा आहे.  कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणी करण्यामध्ये नेतृत्वाची अत्यंत आवश्यकता असते.  एखाद्या कार्याच्या ध्येयपूर्तीकडे जाण्यासाठी, कार्याचे नियोजन, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची निकड भासते. आपल्या कार्याप्रती प्रमाणिक सकारात्मक राहून समूहामध्ये उत्साह ऊर्जा निर्माण करण्याचे कौशल्ये असले पाहिजे.  विविध अभियानांमध्ये कामे करीत असताना आपले व्यक्तीमत्व विकास उत्तम प्रकारे होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. विविध शाखांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी समाजाप्रती कृतघ्न राहून सामाजिक बांधीलकी जोपासत नेतृत्व कौशल्ये आत्मसात केले पाहिजेत. आपल्याला नेमून दिलेल्या जबाबदारीच्या पलीकडे जाऊन आपली आवड आणि जिद्दीच्या माध्यमातून कार्य संपन्न केले पाहिजे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, संशोधनाच्या माध्यमातून समाजहीत जोपासण्यासाठी विद्यार्थींनी प्राथमिकता दिली पाहिजे. विद्यार्थीदशेत वावरताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेवून, सर्वांना सोबत घेऊन हिरहिरेने कार्य संपन्न केले पाहिजे.एखाद्या कार्यामध्ये लोकांचा सहभाग, विविध घटकांचा सहभाग कसे वाढविता येईल यावर मंथन केले पाहिजे. विद्यार्थ्योचे प्रश्न, सहकार्यांचे प्रश्न, भागातील प्रश्न सोडविण्याची प्रवृत्ती स्वत:मध्ये विकसित करणे आवश्यक आहे.
स्वागत प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी केले.वृत्तपत्र विद्या संवादशास्त्र अधिविभगाचे डॉ.शिवाजी जाधव यांनी आभार मानले.यावेळी विद्यापीठ परिसरातील विविध अधिविभागांमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----

Friday, 17 January 2020

भारतीय वाङमय ही संकल्पना विकसित होणे आवश्यक - ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ



कोल्हापूर, दि.17 जानेवारी - भारत आणि भारतीय वाङमय ही संकल्पना विकसित होण्यासाठी  भारतातील वेगवेगळया प्रांतातील भाषा आपल्यामधील काही लोकांनी आत्मसात केले पाहिजे.  ही भाषिक देवाण-घेवाण झाल्याशिवाय भारतीय नावाची संकल्पना अस्तित्वात येवू शकणार नाही, ही येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादान ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी आज येथे केले.


                शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये मराठी अधिविभागाच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के होते. यावेळी डॉ.रसाळ यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुमती रसाळ यांची उपस्थिती होती.  मराठीतील नामवंत समीक्षक डॉ.म.सु.पाटील यांच्या कुटुंबियांनी  
दिलेल्या देणगीतून मराठीतील महत्वाच्या समीक्षाग्रंथाला/समीक्षकाला दिला जाणारा पहिला डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना ज्येष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते देण्यात आला. 
सत्काराला उत्तर देताना डॉ. सुधीर रसाळ म्हणाले, वाङमयाच्या समीक्षेच्या माध्यमातून आपली परंपरा विकसित केली पाहिजे.  मराठीतील समीक्षकांनी वाङमयातील पुर्नमांडणी करण्याची आवश्यकता आहे.  आर्थिक पातळीवर पंचवार्षिक योजना केली त्याचप्रमाणे सांस्कृतिक पातळीवर भावी आराखडा मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  पंडीत जवाहरलाल नेहरु यास अपवाद आहेत.  सैधांतिक समीक्षेवर अभ्यासपूर्ण कार्य करणे आवश्यक आहे.  आपल्या समीक्षेला फार दीर्घ अशी परंपरा लाभलेली नाही. खुप मोठे कवी, लेखक मराठीमध्ये झालेल आहेत.  अन्य भाषेच्या तोडीची कविता मराठीमध्ये लिहिण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे.  समाज आणि वाङमय यांच्या नात्याचे, एखाद्या कवितेच्या कालखंडाचे अभ्यासपूर्ण लेखन होणे आवश्यक आहे.  आपण भारतीय साहित्यशास्त्र दूर्लक्षित केलेले आहे. 
                याप्रसंगी प्रमुख अतिथी वसंत आबाजी डहाके म्हणाले, थोर समीक्षकांच्या लेखणितून मराठी वाङ्मयाला दिशा देण्याचे कार्य झालेले आहे.  डॉ.रसाळ यांनी लिहिलेले ग्रंथ समीक्षेचे वैभव वाढविणारे आहे.  आजकाल, अभ्यासपूर्ण लेखनातून मांडणी करण्याचे प्रमाण फार दूर्मिळ होत चालेले आहे.  ही वेैभवशाली प्रजाती नष्ट होत चालेली आहे, असे वाटते.  डॉ.रसाळ यांच्या वाङ्मयीन संस्कृती या  पुस्तकामधून ही खंत व्यक्त केलेली आहे. मराठीमधून चांगल्याप्रकारचे समीक्षा करण्याचे काम होत रहावे जेणे करून वाचकाला, लेखकाला दिशा मिळत राहील.  इतिहास आणि संस्कृती असलेल्या मानवाच्या मानवी समुहाचे चित्रण साहित्यकृतीमध्ये होत असते त्यामुळे वाचकाला इतिहास आणि संस्कृतीचे आकलन असले पाहिजे.  मानसिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा कोणत्या परिस्थितीत माणसे जगत असतात त्यांच्या जगण्याचा विचार करणारे जे शास्त्र आहे, त्याचे ज्ञान समीक्षकाला असल्यास साहित्यकृतीचे आकलन करणे शक्य होते.  म.सु.पाटील यांनी आपल्या लेखनामध्ये वक्रृती आणि ध्वनी यां दोन्ही संकल्पनांचा चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे.  मराठी समीक्षा सक्षमपणे मांडण्यासाठी अध्ययन होणे गरजेचे आहे.  त्याचबरोबर विचार अत्यंत संतुलित, तर्क-तांत्रिक पध्दतीने मांडण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. 
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, डॉ.म.सु.पाटील हे मराठीतील नामवंत समीक्षक होते.  भारतीय साहित्यशास्त्रात महत्वाचा समीक्षाविचार त्यांनी मांडला.  डॉ.सुधीर रसाळ यांच्या समीक्षेने मराठी साहित्यामध्ये फार मोलाची भर घातली. 
 यावेळी म.सु.पाटील यांच्या कन्या ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री नीरजा धुळेकर, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.रमेश वरखेडे, न्या.नरेंद्र चपळगावकर, डॉ.प्रतिभा कणेकर, ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे या मान्यवरांनी चित्रफितीद्वारे आपले विचार व्यक्त केलेे. 
याप्रसंगी म.सु.पाटील लिखीत 'साहित्यकृतींचे वाचन आणि निर्वचन' या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाकडून डॉ.रसाळ यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ.नंदकुमार मोरे यांनी केले. पुरस्काराच्या स्वरूपामध्ये रुपये एक्कावन्न हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देण्यात आले.
मराठी अधिविभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.  राजेश पाटील, सुस्मिता खुटाळे यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी म.सु.पाटील यांचे कुटुंबीय साहित्यप्रेमी ज्येष्ठ मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
-----