मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य पुरस्कार विजेते डॉ. शिंदे, जत्राटकर यांचा
सत्कार
कोल्हापूर, दि. २६
फेब्रुवारी: सर्व शाखांतील ज्ञान
मराठीमध्ये यावे आणि त्याद्वारे मराठी भाषा समृद्ध व्हावी, यासाठी आत्मियतेने काम
करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संपादक वसंत भोसले यांनी आज
येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित
केलेल्या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
मराठी अधिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज राज्य शासनाच्या महात्मा
फुले वाङ्मय पुरस्कार विजेते डॉ. व्ही.एन. शिंदे आणि विजय तेंडुलकर वाङ्मय
पुरस्कार विजेते अनुप जत्राटकर यांचा श्री. भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, पुष्प व ग्रंथभेट असे सत्काराचे स्वरुप होते.
यावेळी वसंत भोसले म्हणाले, मराठी भाषेच्या समृद्धीसाठी विज्ञान, अभियांत्रिकी,
तंत्रज्ञान, वैद्यक इत्यादी विविध विद्याशाखांचे ज्ञान मराठीत यायला हवे. तेव्हाच ती
खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होऊ शकेल. जागतिकीकरणाला गवसणी घालणाऱ्या युरोपातील देशांतील
नागरिक मातृभाषेच्या संदर्भात प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे त्या भाषांची समृद्धी
झाली आहे. अमेरिकेत एकट्या
न्यूयॉर्क शहरात १९३ भाषा लिहीता वाचता येणारे तर ८०० बोलीभाषा बोलणारे लोक राहतात.
जगभरातील सांस्कृतिक, साहित्यिक आदान-प्रदानाचे ते केंद्रच बनले आहे. आपल्या
मुंबईची आठवण यावी, असे हे चित्र. भाषा हे जागतिक सांस्कृतिक आदानप्रदानाचे प्रतीक
आहे. अशा प्रकारे सर्व भाषांचा आदर व स्वीकार होणे आजच्या काळात फार गरजेचे आहे. कोणत्याही
भाषेचा द्वेष करण्यापेक्षा विविध भाषांतील साहित्य वेगवेगळ्या भाषांतून अनुवादित
व्हायला हवे. भाषासमृद्धीसाठी ते अत्यावश्यक आहे. भाषेच्याच अनुषंगाने विचार करीत
असताना दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांतील चित्रपट जगाची भाषा बोलत असताना, त्यांची
स्वीकारार्हता वृद्धिंगत करीत असताना त्यांच्या तुलनेत मराठी चित्रपट कमी पडताहेत
का, याचाही विचार करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. शिंदे आणि श्री. जत्राटकर यांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे
साहित्याच्या क्षेत्रात अधिक उज्जवल कामगिरी करण्याची त्यांच्यावरील जबाबदारी वाढली
असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, भाषेचा गौरव वाढविणे अगर
सन्मान करणे याचा अर्थ शक्य त्या सर्व बाजूंनी त्या भाषेत अभिव्यक्त होणे असा
अभिप्रेत आहे. वैज्ञानिक साहित्य हे केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच भारतीय
भाषांमध्ये निर्माण होणे खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर अशा व्यापक
प्रयत्नांची गरज आहे.
यावेळी डॉ. शिंदे, श्री. जत्राटकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार
मोरे यांनी परिचय करून दिला. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश
पाटील यांनी आभार मानले.