Friday 5 February 2021

‘विद्यापीठाच्या विकासात अधिसभा सदस्यांची भूमिका प्रभावी’

शिवाजी विद्यापीठात अधिसभा सदस्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. ए.पी. कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आणि डॉ. बी.एम. हिर्डेकर.


शिवाजी विद्यापीठात आयोजित अधिसभेची कार्यप्रणाली कार्यशाळेत सूर

कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: विद्यापीठाच्या विकासामध्ये अधिसभा सदस्यांची भूमिका प्रभावी असते. त्यांनी सर्व घटकांच्या विकासासाठी आग्रही राहायला हवे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात अधिसभा सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत उमटला.

शिवाजी विद्यापीठाच्या अॅकेडमी ऑफ अॅकेडेमिक अॅडमिनिस्ट्रेशन (ए.ए.ए.) च्या वतीने आज अधिसभा सदस्यांसाठी अधिसभेची कार्यप्रणाली या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ए.पी. कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, माजी परीक्षा नियंत्रक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर आणि वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांनी पॅनल डिस्कशनमध्ये सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

डॉ. ए.पी. कुलकर्णी म्हणाले, अधिसभा सदस्य हे एक प्रकारे विद्यापीठाच्या सर्वोच्च सभागृहाचे विश्वस्त असतात. त्यांनी आपले कार्य केवळ अधिसभेपुरते सीमित न करता वर्षभर विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत राहिले पाहिजे. विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांच्या ते संपर्कात असतात. त्या आधारे विद्यापीठ विकासाच्या विविध सूचना त्यांनी कराव्यात. यामुळे कायद्यातील अपेक्षित भूमिकेपेक्षाही अधिक प्रभावी भूमिका बजावणे त्यांना शक्य होईल.

ते म्हणाले, माजी विद्यार्थी हा विद्यापीठाचा अत्यंत महत्त्वाचा घटक पण आपले त्याकडे मोठे दुर्लक्ष होते. माजी विद्यार्थ्यांकडे आपण केवळ आर्थिक लाभाचे साधन म्हणून नव्हे, तर ज्ञानाचे भांडार म्हणूनही पाहायला हवे. त्यांना वेळोवेळी आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अधिसभा सदस्यांनी जरुर पुढाकार घ्यायला हवा. गरजू विद्यार्थ्यांसाठी काही नवीन शिष्यवृत्ती सुरू करावयाच्या असतील अगर जुन्या शिष्यवृत्तींच्या रकमा वाढवायच्या असतील, तर त्या कामी सुद्धा माजी विद्यार्थी निश्चितपणे सहकार्य करण्यास पुढे येतात. आपण केवळ त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचायला हवे.

डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, अधिसभेमध्ये आपण सर्वच संबंधित घटकांचे प्रश्न मांडत असतो. तथापि, आपला सर्वाधिक भर हा विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकडे असायला हवा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ज्या विविध समित्यांची, मंडळांची स्थापना करणे अपेक्षित आहे, त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला गेला पाहिजे. विद्यार्थी प्रश्नांच्या सोडवणुकीत अधिसभा सदस्य प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

डॉ. बी.एम. हिर्डेकर म्हणाले, अधिसभा सदस्यांनी आपले प्रश्न वा प्रस्ताव नाकारले गेल्यास सभात्याग करण्यापेक्षा सभागृहात चर्चा घडवून आणण्यावर भर द्यावा. संबंधित प्रश्नी योग्य तोडगा अगर पर्याय काढण्याचा प्रयत्न करावा. उपलब्ध वेळेमध्ये सभागृहात जास्तीत जास्त कामकाज होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, अधिसभा सदस्यांनी आपली कार्यमर्यादा केवळ अधिसभेच्या बैठकीपुरती असल्याचे समजू नये. विविध प्रश्न मांडण्यासाठी अधिसभेच्या बैठकीची वाट न पाहता विद्यापीठाचे कुलगुरू अगर संबंधित विभाग प्रमुखाशी आवश्यक पत्रव्यवहार केल्यास संबंधित प्रश्न मार्गी लागू शकतो. संवादातून प्रश्न सोडविण्याची भूमिका सर्वच घटकांनी घेतल्यास अधिसभेमध्ये अधिक धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध होऊ शकेल.

यावेळी अधिसभा सदस्यांच्या विविध शंकांचे समाधानही मान्यवरांनी केले. तत्पूर्वी, डॉ. ए.पी. कुलकर्णी यांनी अधिसभा बैठकीच्या माध्यमातून योगदान कसे द्यावे?’, डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी अधिसभा कार्यप्रणालीचे परिनियम आणि डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी अधिसभेतील प्रश्न या विषयांवर तीन तांत्रिक सत्रांत मार्गदर्शन केले. सुरवातीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. एस.टी. कोंबडे यांनी आभार मानले. बैठकीस अधिसभा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment