शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर व्हिजिट उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी सिक्टॅबचे डॉ. डी. रवी. |
शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर व्हिजिट उपक्रमात सहभागी झालेले नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका या देशांतील अभ्यासक व प्रतिनिधी. |
आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर व्हिजिट उपक्रमास विद्यापीठात प्रारंभ
कोल्हापूर, दि. २
फेब्रुवारी: कोल्हापूर हे भारताच्या सहकारी चळवळीचे महत्त्वाचे
केंद्र असून येथील सहकारी चळवळीच्या गुणवैशिष्ट्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी
अभ्यास करावा, असे आवाहन पुणे येथील वैकुंठ
मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (वाम्निकॉम) व सेंटर फॉर इंटरनॅशनल
ट्रेनिंग इन अॅग्रीकल्चर बँकिंग (सिक्टॅब) संस्थेचे संचालक डॉ. के.के. त्रिपाठी (आय.ई.एस.)
यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि केंद्रीय
कृषी व कृषक कल्याण विभाग, वाम्निकॉम व सिक्टॅब यांच्या संयुक्त विद्यमाने
सहकारविषयक व्यावसायिक प्रतिमानाचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील
अभ्यासकांसाठी ‘एक्स्पोजर
व्हिजिट प्रोग्राम’
आयोजित केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात झाला.
त्यावेळी पुणे येथून डॉ. त्रिपाठी बोलत होते. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के होते.
डॉ. त्रिपाठी म्हणाले, वाम्निकॉम आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान झालेल्या
सामंजस्य कराराअंतर्गत लगेचच हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम होतो आहे. या
उपक्रमात नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका या देशांतील अभ्यासक सहभागी झाले
आहेत. कोल्हापूर हे भारताच्या सहकारी चळवळीच्या विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू
असून शिवाजी विद्यापीठ हे त्याचे अभ्यासकेंद्र आहे. या भेटीचा अभ्यासकांनी पुरेपूर
लाभ करून घ्यावा आणि या अनुभवाच्या जोरावर आपापल्या देशांमध्येही या चळवळीचा विकास
व विस्तार करावा.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सहकारविषयक जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी
आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठीचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोल्हापूर
विभागात जवळपास सर्वच क्षेत्रांत सहकाराने मोठी क्रांती घडवून आणली आहे. पशु व
दुग्धविकास, ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग, ग्राहक संस्था, पतसंस्था, साखर
कारखानदारी अशी अनेक क्षेत्रे सांगता येतील. या सशक्त सहकारी चळवळीने विभागामध्ये
केवळ आर्थिक क्रांतीच घडविली आहे, असे नव्हे, तर सहकार हे येथील सामाजिक विकासाचे
महत्त्वाचे साधन बनले आहे. सहकाराने स्वतःबरोबरच परिसराचा शैक्षणिक, सांस्कृतिक,
सामाजिक, राजकीय असा सर्वांगांनी विकास करण्यात बहुमोल कामगिरी बजावली आहे. आर्थिक
लाभापेक्षाही सहकारी चळवळीमुळे झालेले शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, महिलांचे सबलीकरण
आदी सामाजिक लाभ हे दूरगामी महत्त्वाचे आहेत. त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
यावेळी सिक्टॅबचे सल्लागार डॉ. डी. रवी, वाम्निकॉमचे डॉ. यशवंत पाटील यांनीही
यावेळी मनोगते व्यक्त केली. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून उपक्रमाचे
उद्घाटन करण्यात आले. चेतन गळगे यांनी स्वागत केले. डॉ. वैशाली भोसले यांनी
प्रास्ताविक केले, तर डॉ. संतोष सुतार यांनी आभार मानले.
यावेळी कार्यक्रमास डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह नेपाळ,
बांगलादेश या देशांतील अभ्यासक प्रत्यक्ष उपस्थित होते, तर ऑनलाईन स्वरुपात नेपाळच्या
नील को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या श्रीमती चित्रा थम्सुहांग, श्रीलंकेच्या राष्ट्रीय
सहकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. असंका थिलंगरत्ने, डॉ. गणेश भाड, डॉ.
जयमोहन नायर, डॉ. कल्पिता सरकार, बांगलादेशहून मोहम्मद मुर्शदुल इस्लाम आदी
उपस्थित होते.
एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्रामविषयी...
श्रीलंका नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आदी भारताच्या शेजारी
राष्ट्रांसमवेत सकारात्मक सहकार्य संबंध वृद्धिंगत व्हावेत, यासाठी केंद्रीय कृषी
विभाग, वाम्निकॉम, सिक्टॅब आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्राम ऑन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॉडेल हा उपक्रम दि. २ ते ५
फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत उपरोक्त
देशांमधील अभ्यासक, प्रतिनिधी सहभागी झालेले असून कोल्हापूर विभागातील सहकारी
चळवळीचा प्रत्यक्ष काही प्रकल्पांना, उद्योग-व्यवसायांना भेट देऊन अभ्यास करणार
आहेत. विविध सत्रांतर्गत त्यांना येथील सहकार चळवळीच्या विविध बाजूंचा परिचय करून
देण्यात येणार आहे. सदर उपक्रम त्यांनी आपापल्या देशात जाऊन राबवावेत आणि तेथील
सर्वसामान्य नागरिकांचा सहकाराच्या बळावर विकास करावा, अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment