Friday 26 February 2021

शिवाजी विद्यापीठाचा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

 



कोल्हापूर, दि. २६ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (मुंबई) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान काल (दि.२५) सामंजस्य करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टसमवेत झालेल्या या सामंजस्य कराराद्वारे उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणार असून ग्रामीण भागातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी व संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. तसेच उद्योगनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कौशल्य व उद्योजकता क्षेत्रामध्ये करिअर करावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी या कराराच्या माध्यमातून अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत.

उद्योजकांना खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांच्यापर्यंत  पोहचविणे, कच्च्या मालापासून दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करणे, देशांतर्गत व देशाबाहेरील नवीन उद्योजक, तंत्रज्ञ व तंत्रज्ञान निर्माण करणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे. याच बरोबर या दोन्ही संस्थाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, महाविद्यालये, परिसंस्था यांचेबरोबर संयुक्त पदवी कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सेक्रेटरी जनरल प्रदीप मांजरेकर यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. . एम. गुरव, सॅटर्डे क्लबचे हर्षवर्धन भुरके, विद्यापीठ परिक्षेत्रातील उद्योजक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment