कार्यशाळेस उपस्थित शिक्षक व संशोधक विद्यार्थी. |
कोल्हापूर, दि. २४
फेब्रुवारी:
शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक करिअर संधी उपलब्ध
आहेत. त्या संधींची माहिती घेऊन त्यांचा लाभ घेण्याची मानसिकता विद्यार्थ्यांत
निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.
पी.एस. पाटील यांनी केले.
विद्यापीठाच्या
इंटरनॅशनल अफेअर्स सेल आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात
पीएच.डी. संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘परदेशातील संशोधनविषयक करिअर संधी’ या विषयावर नुकतीच कार्यशाळा
आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.
प्र-कुलगुरू
डॉ. पाटील म्हणाले, परदेशामध्ये मूलभूत संशोधनासह उपयोजित संशोधनाच्या करिअर संधी
मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपण आपल्या संशोधनाची जागतिक स्तरावर सुरू असलेल्या
संशोधनाशी सांगड घातली पाहिजे. जेणे करून त्याची दखल घेतली जाईल आणि या संधींचे
महाद्वार आपल्यासाठी खुले होईल. संयुक्त संशोधन प्रकल्पांचीही मोठी संधी आहे.
जागतिक स्तरावरील उद्योगांनाही नवनवे संशोधन हवे आहे. त्यासाठी आपण आपले इंग्रजी भाषाज्ञान
आणि आत्मविश्वास उंचावला पाहिजे. त्या बळावर आपल्यातील उणेपणाची भावना कमी होऊन
आंतरराष्ट्रीय करिअर संधींना आपण मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. त्या
दृष्टीने विद्यापीठातील संशोधकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
यावेळी प्रा. एस. डी डेळेकर यांनी परदेशात उपलब्ध फेलोशिपविषयी विस्तृत माहिती दिली.
इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे समन्वयक डॉ. ए. व्ही. घुले यांनी व्यावसायिक पद्धतीने सीव्ही कसा लिहावा, संवाद कौशल्ये विकास याविषयी
माहिती दिली. यावेळी रसायनशास्त्रातील
विभागप्रमुख डॉ. जी.एस. गोकावी, डॉ. डी.एस. भांगे यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. के.एम. गरडकर, प्रा. पी.व्ही.अनभुले, प्रा. एस.पी. हंगीरगेकर, प्रा. के.के. शर्मा, डॉ. एस.एन. तायडे, डॉ. एस.ए. संकपाळ व
रसायनशास्त्र अधिविभागातील शिक्षक, प्रवेशित पीएच. डी. विद्यार्थी व
परदेशी पीएच.डी. विद्यार्थी उपस्थित होते. ऋतूजा चव्हाण यांनी प्रास्ताविक
केले. डॉ. घुले यांनी आभार
मानले.
No comments:
Post a Comment