शिवाजी विद्यापीठात युसिक-सीएफसीमार्फत आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. पी.एन. वासंबेकर. |
कार्यशाळेत सहभागी अभ्यासक, संशोधक. |
शिवाजी
विद्यापीठाच्या ‘युसिक’मध्ये चार दिवसीय कार्यशाळेस
प्रारंभ
कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: पदार्थ विश्लेषण ही एक जटिल प्रक्रिया असून प्रयोगशाळा, उद्योग, तंत्रज्ञान अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक म्हणून गणली जाते. शिवाजी विद्यापीठ आपल्या अत्याधुनिक कुशल तंत्रज्ञांच्या जोरावर पदार्थ विश्लेषणात्मक संशोधन- अभ्यासात अग्रेसर राहिले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रा. पी.एन. वासंबेकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शास्त्रीय उपकरणे केंद्र (युसिक) व सर्वसाधारण सुविधा
केंद्र (सीएफसी) यांच्यामार्फत चार दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेस काल (दि. २२) प्रारंभ
झाला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्ट्राईड कार्यक्रमांतर्गत ही कार्यशाळा आयोजित
करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. वासंबेकर बोलत होते.
प्रा. वासंबेकर म्हणाले, विद्यापीठाच्या युसिक व सीएफसी मधील अत्याधुनिक
उपकरणे व येथे चालणारे उपक्रम केवळ शैक्षणिक क्षेत्रासाठीच नव्हे, तर औद्योगिक
तसेच तंत्रज्ञान निर्मितीच्या कामासाठी नक्कीच उपयुक्त ठरणारे आहेत. त्या दृष्टीने
अभ्यासक, संशोधकांसोबतच औद्योगिक आस्थापनांनीही येथील सुविधेचा अधिकाधिक उपयोग
करून घेणे आवश्यक आहे.
यावेळी युसिक-सीएफसीमध्ये उपलब्ध उपकरणे व सुविधांची माहिती देताना सीएफसी
विभागप्रमुख प्रा. आर.जी. सोनकवडे म्हणाले, पदार्थ विश्लेषणासाठी आवश्यक असणारी
बहुतेक सारी सामग्री व उपकरणे युसिक-सीएफसीमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये फॉरियर
ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर, गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमीटर,
थर्मल ग्रॅव्हीमॅट्रिक- डिफरन्शियल एनालिसीस- डिफरन्शियल स्कॅनिंग कॉलॉरीमीटर,
इंडक्टीव्हली कपल्ड प्लाझ्मा ऑप्टीकल एमिशन स्पेक्ट्रोस्कोप, मायक्रोवेव्ह
डायजेस्टीव्ह सिस्टीम आणि पार्टिकल साइझ एनालायझर विथ झेटा पोटॅन्शियल आदी
उपकरणांचा समावेश आहे. अलीकडेच त्यात एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर (एक्सआरडी
एडव्हान्स्ड डी८), व्हेक्टर नेटवर्क एनालायझर (व्हीएनए), अल्ट्रा सेंट्रिफ्युज,
बायो-एटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप (बायो-एएफएम) आणि मायक्रो-रामन स्पेक्ट्रोमीटर या
उपकरणांची भर पडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक विश्लेषणासाठी
अत्यावश्यक असणारी पण सहजासहजी उपलब्ध न होणारी एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन
स्पेक्ट्रोस्कोप (एक्सपीएस) आणि ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोप (टीईएम)
ही उपकरणेही सीएफसीमध्ये उपलब्ध झाली असून लवकरच ती कार्यान्वित करण्यात येणार
आहेत. ही आपल्या विभागातील संशोधकांसाठी मोठी उपलब्धी असून येथील सुविधांचा लाभ
घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये युसिक व सीएफसीमधील उपलब्ध विविध वैज्ञानिक
उपकरणांच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामध्ये विशेषतः एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर
(एक्सआरडी) आणि व्हेक्टर नेटवर्क एनालायझर (व्हीएनए) या आधुनिक उपकरणांची माहिती व
प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
विविध उपकरणांच्या दुरुस्ती व देखभालीविषयी उत्कृष्ट सेवा प्रदान करणे,
सीएफसीमधील विश्लेषणात्मक सुविधा विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांतील
विज्ञान विभागांना प्रदान करणे, प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक कर्मचारी यांना
प्रयोगशाळेतील उपकरणांची दुरुस्ती व देखभाल याविषयी अवगत करणे यासाठी युसिक व
सीएफसी विभाग कार्यरत असून सदर कार्यशाळेमुळे शिक्षक, संशोधक, अभ्यासकांना
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथे उपलब्ध विविध उपकरणांची व संबंधित विषयाची सखोल
माहिती समजावून देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे
प्रा. पी.एन. वासंबेकर, पदार्थविज्ञान अधिविभागाच्या प्रा. विजया पुरी, प्रा.
आर.जी. सोनकवडे, आर.आय.टी., इस्लामपूरचे डॉ. ए.बी. काकडे, वैज्ञानिक अधिकारी डॉ.
जे.बी. यादव यांच्यासह संबंधित उपकरणांचे अभियंते यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment