Tuesday, 31 August 2021

दारिद्र्य निर्मूलन हा देशाच्या सर्वंकष धोरणाचा अविभाज्य घटक हवा: डॉ. योगेंद्र अलघ

 



शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. योगेंंद्र अलघ


अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: दारिद्र्य निर्मूलन हा देशाच्या केवळ निवडणुकीचा नव्हे, तर सर्वसाधारण सर्वंकष धोरणाचा अविभाज्य घटक असायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी केंद्रीय मंत्री व नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र अलघ यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने सुरू असलेल्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. भारतातील निवडक अर्थविषयक समस्या आणि त्यामागे कार्यरत सिद्धांत (सिलेक्टेड इंडियन इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स: इज देअर थिअरी बिहाईंड देम) असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात प्रमुख उपस्थित होते.

डॉ. अलघ म्हणाले, देशाच्या सामाजिक-आर्थिक धोरणांचा हेतू हा सर्वंकष सुधारणा असतो. या सुधारणांमध्ये नागरिकांचे राहणीमान उंचावणे म्हणजेच दारिद्र्यामधील वाढती दरी सांधणे, कमी करणे या बाबीला मोठे प्राधान्य असायला हवे. देशाच्या विकासामध्ये अनुसूचित जाती जमातींमधील घटकांनाही बरोबरचे स्थान प्राप्त व्हायला हवे. त्याचप्रमाणे त्यांच्या लोकसंख्येमध्ये अर्धा हिस्सा असणाऱ्या महिलांनाही त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. आदिवासी, दलित महिलांनाही या विकासात त्यांचा वाटा उचलण्याची संधी मिळायला हवी. विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोकसंख्या, तंत्रज्ञान, सुधारणा अर्थातच व्यापारी स्पर्धात्मकता या सर्व घटकांचा सहभाग आणि त्याग हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे.

सर्वसमावेशक विकास धोरण आखत असताना त्यामध्ये पर्यावरणपूरकता आणि नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीतली संवर्धनशीलता यांना प्राधान्याने स्थान द्यायला हवे असे सांगून डॉ. अलघ म्हणाले, दूरगामी संवर्धनशील विकास साधण्यासाठी उद्योगांना कर सवलतींसह विविध सवलती देऊन उत्तेजन द्यायला हवे. वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांची अतिरिक्त सामाजिक किंमत चुकवावी लागू नये, असे वाटत असेल, तर धोरणात्मक मुद्यांच्या संदर्भात सर्वच घटकांनी भूमिका घ्यायला शिकले पाहिजे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

सर्वच सुविधांचे सरसकट खाजगीकरण करणे हे आर्थिक सुधारणांना मारक असल्याचे सांगून डॉ. अलघ म्हणाले, खाजगीकरणाचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. एअर इंडियाची विमानसेवा नसती, तर काबूलमधून भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचा धोका कोणत्या खाजगी कंपनीने पत्करला असता? त्यामुळे परिपक्व देश खाजगीकरणाच्या बाबतीतला निर्णय अत्यंत शहाणपणाने घेतात. याचा अर्थ सुधारणा करू नयेत, असा मात्र नाही. व्यावसायिक अर्थतज्ज्ञ आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेला पाठिंबा दर्शवितात कारण त्या हळू होत असल्या, तरी खात्रीशीररित्या होतातच. मात्र, त्यासाठी आजच्या पिढीने त्यागाची तयारी मात्र ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, परिवर्तनीय दारिद्र्यरेषेच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण अभ्यास व संशोधन करण्यासाठी तरुण अर्थशास्त्रज्ञांनी पुढे येण्याची नितांत गरज आहे. त्याचप्रमाणे संवर्धनशील विकास ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीनेही भावी विकासाचा आराखडा निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. यशवंतराव थोरात यांनी प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.

 

Monday, 30 August 2021

विद्यापीठास ‘सेक्शन-८’ कंपनी म्हणून मान्यता मिळणे अभिमानास्पद: पालकमंत्री सतेज पाटील यांचे गौरवोद्गार

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील. शेजारी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

'शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशन'ला 'सेक्शन-८' कंपनी म्हणून मान्यता प्राप्त झाल्याचे पत्र कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना प्रदान करताना पालकमंत्री सतेज पाटील. सोबत (डावीकडून) अभिजीत रेडेकर, डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. संजय जाधव, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्ही.टी. पाटील, गजानन पळसे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. आर.के. कामत.


कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना प्रदान केले मान्यतेचे पत्र

कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठातर्फे स्थापित शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशनला कंपनी कायद्यानुसार सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता मिळणे ही अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे. यामुळे विद्यापीठाला आता कौशल्य व स्टार्ट-अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक गतिमानतेने कार्य करता येऊ शकेल, असे मत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशनला सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता मिळाल्याचे पत्र केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडून प्राप्त झाले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ते आज कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वीकारले. या प्रसंगी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री सतेज पाटील म्हणाले, सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता मिळाल्याने विद्यापीठास आता विद्यार्थीहिताचे तसेच संशोधन व विकासाचेही अनेक नवनवीन उपक्रम हाती घेणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र नवोन्मेष सोसायटीच्या अटीअंतर्गत ही प्रक्रिया विद्यापीठाने तातडीने पूर्ण केली, हे महत्त्वाचे आहे. भविष्यात याचे अनेक लाभ विद्यार्थी तसेच समाजालाही होतील.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक कार्याच्या पलिकडे जाऊन महापूर असो, अवर्षण असो की कोरोना, या सर्वच कालावधीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून योगदान दिले आहे. येथील संशोधनकार्याचा दर्जा अत्युच्च आहे, यावर थेट नॅकच्या ++’ मानांकनाचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता अनेक मोठमोठ्या संधी आणि निधी विद्यापीठास उपलब्ध होणार आहे. त्याचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करावा. येत्या डिसेंबरपर्यंत कोल्हापूर विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. दोन महामार्गांनी हा भाग देशाच्या इतर भागांशी जोडलेला आहे. त्यामुळे आता जागतिक कनेक्टिव्हिटी वाढविण्याची संधी विद्यापीठासही आहे. त्याचा लाभ घेण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील भूस्खलन आणि हवामान बदल यांविषयी संशोधन व विश्लेषण करण्यासाठी विद्यापीठाने नोडल एजन्सी म्हणून पुढाकार घ्यावा. पूर व्यवस्थापनाच्या कार्यातही आपले संशोधकीय योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाच्या नवोपक्रमांमध्ये तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील, याची ग्वाहीही त्यांनी या प्रसंगी दिली.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी ग्रंथभेट देऊन मंत्री श्री. पाटील यांचे स्वागत केले आणि विद्यापीठाविषयी थोडक्यात सादरीकरणही केले. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. या वेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, डॉ. आर.के. कामत, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. ए.डी. जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय जाधव, सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर आदी उपस्थित होते.

सेक्शन-८ कंपनीची उद्दिष्ट्ये-

शिवाजी विद्यापीठाच्या शिवाजी विद्यापीठ संशोधव व विकास फौंडेशनला कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावरील सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. या कंपनीची उद्दिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे असतील.

·         जलसंवर्धनाचे, पर्यावरणपूरक प्रकल्प प्रस्थापित करणे, त्यांना प्रोत्साहन देणे

·         शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये प्रशिक्षण व संशोधन केंद्रांना प्रोत्साहित करणे

·         शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण, आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन यांसाठी शैक्षणिक संस्थांच्या स्थापनांसाठी आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे

·         नैसर्गिक स्रोतांचे, साधनसंपत्तीचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने हरित व अपारंपरिक ऊर्जाविषयक संशोधन व उपक्रम राबविणे, हरित विकासाला प्राधान्य देणे

·         तदअनुषंगिक स्टार्ट-अप प्रकल्प, कौशल्य विकास यांना प्रोत्साहन देणे

·         त्यासाठी आवश्यक तो निधी उभा करणे, त्यासाठी विविध उपक्रम राबविणे, विविध चॅरिटी पोर्टल, वेबसाईट उभारणे, ई-कॉमर्स सेवा निर्माण करणे, निर्धारित लक्ष्य साध्यतेसाठी इंटरनेट आधारित सेवा उभारणे

·         विविध संशोधन संस्थांमध्ये भागीदारीसाठी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणे

·         शासकीय, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून उद्दिष्टपूर्तीसाठी, प्रबोधनासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे इत्यादी कार्यक्रम घेणे

Wednesday, 25 August 2021

दिवंगत कवी ना.वा. देशपांडे यांची ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द

 

दिवंगत कवी ना.वा. देशपांडे यांचा ग्रंथसंग्रह शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याबाबतचे पत्र उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांना देताना सुनंदा देशपांडे



कोल्हापूर, दि. २५ ऑगस्ट: जुन्या पिढीतील ज्येष्ठ दिवंगत कवी ना.वा. तथा नारायण वामन देशपांडे यांच्या इच्छेनुसार त्यांची समग्र ग्रंथसंपदा त्यांच्या पत्नी सुनंदा देशपांडे यांनी आज शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राकडे सुपूर्द केली. विद्यापीठाच्या वतीने उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांनी स्वीकार केला.

कवी ना.वा. देशपांडे यांनी त्यांच्या हयातीत कविता, गीतांसोबतच अनेक नामवंत शाहीरांसाठी लेखन केले. त्यांचे दोन वर्षांपूर्वी वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याकडे महाभारत, भगवद्गीता, त्यांवरील भाष्ये, संतसाहित्य यांसह अनेकविध प्रकारची दुर्मिळ ग्रंथसंपदा होती. त्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. आपल्या माघारी ही ग्रंथसंपदा चांगल्या ठिकाणी जावी आणि भावी पिढ्यांच्या उपयोगी पडावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या माघारी पत्नी सुनंदा यांनी त्यांच्या ग्रंथसंपदेचा जिव्हाळ्याने सांभाळ केला आणि आज शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयास देणगी स्वरुपात एकूण ४५६ ग्रंथ उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांच्याकडे सुपूर्द केले. डॉ. सुतार यांनी त्यांच्या मंगळवार पेठेतील घरी जाऊन त्यांचा स्वीकार केला. प्रा. शशिकांत चौधरी यांचे या प्रक्रियेसाठी सहकार्य लाभले, तर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांचे मार्गदर्शन लाभले.


कवी ना.वा. देशपांडे

कवी ना.वा. देशपांडे यांच्याविषयी थोडक्यात...

कवी ना.वा. देशपांडे हे कोल्हापुरातील अनेक शाहीरांचे लाडके कवी होते. त्यांच्या अनेक रचना संगीतकार कै. दिनकरराव पोवार यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. शीघ्रकवी लहरी हैदर, ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांच्याशी त्यांचा मोठा स्नेह होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

Monday, 23 August 2021

'गांधीयन अभियांत्रिकी'च्या मार्गानेच समावेशी नवोन्मेष शक्य: डॉ. रघुनाथ माशेलकर

 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर


कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट: देशाच्या विकासात महत्त्वाच्या असणाऱ्या शिक्षण, आरोग्य आदी सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमधील मागणी व पुरवठा या दोहोंमधील असमानता कमी करीत नेऊन समाजातील सर्व घटकांची सर्वसमावेशकता वाढविणे अशा समावेशी नवोन्मेषी धोरणाची देशाला गरज आहे. त्यासाठी आपल्याला 'गांधीयन अभियांत्रिकी'च्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत दुसरे पुष्प गुंफताना इनोव्हेशन लेड अॅक्सिलरेटेड इन्क्लुजिव्ह ग्रोथ (नवोन्मेषप्रणित गतिमान समावेशी वृद्धी) या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले, समावेशी नवोन्मेष व वृद्धीसाठी 'गांधीयन अभियांत्रिकी' हा अत्यंत मूलभूत व नैसर्गिक मार्ग आहे. आपली वसुंधरा प्रत्येक माणसाची गरज भागेल, इतके जरुर देते; प्रत्येकाची हाव भागविण्यास मात्र ती अक्षम आहे, हा गांधीविचार त्याचा पाया आहे आणि कमीत कमी संसाधनांच्या वापरातून अधिकाधिक लोकांसाठी अधिकाधिक, दर्जेदार साधन-सुविधांची निर्मिती करणे (MLM- More from Less for More and More)  हा त्याचा गाभा आहे. त्या दृष्टीने नवोन्मेषाकडे, नवनिर्माणाकडे पाहायला हवे. श्रीमंतांसाठी आणि श्रीमंतधार्जिणे तंत्रज्ञान बनविणे सोपी बाब आहे. तथापि, अत्याधुनिक तंत्रज्ञान बनविणे आणि दारिद्र्यात पिचलेल्या व्यक्तींसाठी तिचा सुयोग्य वापर करणे, हे मात्र अवघड असते. हेच आपल्या तरुणांसमोरचे खरे आव्हान आणि अपेक्षाही आहे. दारिद्र्यातील माणसांसाठी तंत्रज्ञानाची निर्मिती करून त्यांना आत्मप्रतिष्ठा प्रदान करण्यास इच्छुक असणाऱ्या युवाशक्तीची या देशाला खरी गरज आहे.

डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, भारत म्हणजे १३० कोटी खाणाऱ्या तोंडांचा देश म्हणविण्यापेक्षा १३० अब्ज विचार करणाऱ्या डोक्यांचा देश म्हणून ओळखला जाणे महत्त्वाचे वाटते. आजवर केवळ आपण जोडणी आणि जुळणी (असेंबल) करणाऱ्यांचा देश आहोत. त्याऐवजी आता नवसंशोधन करणाऱ्यांचा देश व्हायला हवे. भारताने आता शोध-संशोधन या मार्गाने मेक इन इंडिया ही मोहीम यशस्वी करायला हवी. आता देशाने नवोन्मेषाच्या बाजूने उभे राहायला हवे. त्यासाठीची भौतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक बांधणी करण्याबरोबरच उत्तम दर्जाच्या शैक्षणिक व संशोधन संस्था, इनक्युबेटर्स, त्यासाठी मदत प्रदान करणारे प्रोत्साहक, तंत्रज्ञान पार्क्स आणि भरीव भांडवल प्रदाते यांची मोठी गरज आहे. त्याबरोबरच पूरक शासकीय धोरण आखणीचीही आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षण आणि योग्य पूरक संधी यांच्या संयुक्त बळावरच आपले आणि आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, डिजीटल तंत्रज्ञानाची दरी सांधणे, डिजीटल समावेशन वाढविणे ही आजची खरी गरज आहेच. पण त्याचबरोबर शिक्षणाचा अधिकारही महत्त्वाचा आहे. योग्य शिक्षण, शिक्षण प्रदान करण्याची योग्य पद्धती आणि मूल्यसंवर्धन या बाबी देशाची भावी पिढी सकारात्मक व संतुलित बनविण्यासाठी फार आवश्यक आहेत. युवकांनीही नवोन्मेष, काहीतरी चांगले, भरीव करण्याची ऊर्मी व जिद्द तसेच समाजातल्या वंचित, शोषित समाजाप्रती आस्था, सहृदयता या बळावर देशातील सामाजिक-आर्थिक विषमता दूर होऊन समावेशी समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. डॉ. माशेलकर यांनी आपल्या व्याख्यानात देशातील तरुण समाजातील दरिद्री, वंचित, गरजू घटकांच्या समस्या सोडवून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा, नवोन्मेषाचा कशा पद्धतीने सकारात्मक वापर करीत आहेत, याची अनेक उदाहरणे दिली.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, देशातील विविध घटकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवोन्मेषी उत्तर शोधण्याचे काम आजची तरुण पिढी करीत आहे, तिच्यामध्ये या सामाजिक जाणिवा आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मिळालेल्या संधीचे रुपांतर मोठ्या व्यवसायात करण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे डॉ. माशेलकर यांच्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रापलिकडे जाऊन सर्वोत्कृष्ट ते देण्याची क्षमता विकसित करण्याचीही मोठी आवश्यकता आहे. देशातील सामाजिक-आर्थिक असमानता व दारिद्र्य यांच्यावर आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात करता येऊ शकते, याची ठोस जाणीव डॉ. माशेलकर यांनी करून दिली आहे. त्याचे अनुसरण करणेही गरजेचे आहे.

यावेळी अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले, तर ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी स्वागत व परिचय करून दिला.  

 

शिक्षण+संधी=भवितव्य

सन २००० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन् यांच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारताना (डावीकडून अनुक्रमे) ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि डॉ. रघुनाथ माशेलकर
(सौजन्य: डॉ. माशेलकर यांच्या सादरीकरणातून साभार)

शिक्षण+संधी=भवितव्य हे समीकरण माणसाचे आयुष्य कसे पालटून टाकते, याचे उदाहरण म्हणून डॉ. माशेलकर यांनी सन २००० सालची दोन छायाचित्रे सादर केली. या वर्षी टाटा उद्योग समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा आणि डॉ. माशेलकर यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन् यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले, याची ती छायाचित्रे होती. त्यांचा संदर्भ देऊन डॉ. माशेलकर म्हणाले, राष्ट्रपती के.आर. नारायणन् हे अत्यंत गरीब दलित कुटुंबातून आले. अशा परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी आपले शिक्षण घेतले. उच्चशिक्षणासाठी त्यांना टाटा फौंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या बळावर त्यांनी शिक्षण पूर्ण करून अंतिमतः देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतली. व्यक्तीशः माझ्या घरची परिस्थितीही बेताचीच होती. मलाही टाटा फौंडेशनची दरमहा साठ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली, म्हणून मी माझे शिक्षण पूर्ण करून आयुष्यात काही तरी भरीव करू शकलो. उपरोक्त कार्यक्रमात केवळ शिक्षणाच्या बळावर आयुष्यात काही तरी साध्य केलेल्या आणि टाटा फौंडेशनच्या एका लाभार्थ्याने दुसऱ्या लाभार्थ्याचा पद्म पुरस्कार प्रदान करून गौरव केलाच, शिवाय, त्याच लाभार्थ्याने प्रत्यक्ष टाटा फौंडेशनच्या अध्यक्षाचाही पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला. ही बाब केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकली, असे भावोद्गार डॉ. माशेलकर यांनी काढले.

Saturday, 21 August 2021

‘भुईभिंगरी’मधून शिक्षण क्षेत्रातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना स्पर्श: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

प्रा. वसंत खोत लिखित 'भुईभिंगरी' या स्वकथनात्मक पुस्तकाचे प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) संजय शेलार, डॉ. नंदकुमार मोरे, दशरथ पारेकर, प्रा. खोत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. यु.के. सकट.

प्रा. वसंत खोत यांच्या भुईभिंगरी स्वकथनाचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: भुईभिंगरी हे प्रा. वसंत खोत यांचे स्वकथन शिक्षण क्षेत्रातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना स्पर्श करणारे आहे. त्या अनुषंगाने समाजात सर्वंकष चिंतन होण्याची गरज आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने येथील शिक्षक, लेखक व प्रकाशक प्रा. वसंत खोत यांच्या भुईभिंगरी या स्वकथनात्मक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक दशरथ पारेकर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, भुईभिंगरीमधील सामाजिक भोवताल हा एका वेगळ्या अनुभवविश्वाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामध्ये एकत्र कुटुंब आहे, त्याचे सर्व ताणेबाणे आहेत, तत्कालीन कष्टप्रद आयुष्यातून मुलाची आणि त्याच्या भवितव्याची सुटका व्हावी, म्हणून प्रयत्न करणारी आई आहे. हे सारे समजून घेण्याची उत्सुकता, वास्तवाच्या झळा आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. ते समजावून घेऊन त्यावर चिंतन करण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. तत्कालीन काळात शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेपुढे जे प्रश्न उभे ठाकले होते, त्यांनी आज अधिक गंभीर रुप धारण केले आहे. त्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी आजच्या पिढीने तत्परतेने सज्ज होण्याची गरज आहे.

ज्येष्ठ पत्रकार, संपादक दशरथ पारेकर म्हणाले, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील ग्रामीण भागातील साठ-सत्तरच्या दशकातील पिढीचे प्रातिनिधिक कथन म्हणून भुईभिंगरीकडे पाहण्याची गरज आहे. शिक्षणाचा प्रवाह ग्रामीण भागापर्यंत विस्तारण्याचे कार्य या पिढीने कष्टातून साकारले. त्याचे प्रतिबिंब यामध्ये दिसते. प्रा. खोत यांच्या प्रवाही, काव्यमय लेखनशैलीमुळे हे कथन अत्यंत वाचनीय झाले आहे. एक प्रकारचे कुतूहल व आत्मीयता वाचकाच्या मनात निर्माण करण्यात ते निश्चितपणाने यशस्वी होतात.

मराठी अधिविभागाच्या डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, सामान्य व्यक्तीच्या स्वकथनामध्ये इतिहासाच्या पाऊलखुणांचा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून सामोरे येण्याची क्षमता असते. त्या दृष्टीने प्रा. खोत यांच्या या लेखनाचे स्वागत करणे आवश्यक आहे. या कथनामध्ये मीपणाचा दर्प नाही. मानवी जगण्यात लाभलेल्या भूमीमध्ये स्वतःचा विस्तार करीत रिंगण पूर्ण करण्याचा एका सामान्य शिक्षकाचा चिंतन करावयास लावणारा प्रवास यामध्ये आहे. रम्य व वाचनीय भाषेमुळे कादंबरी वाचनाइतकाच आनंद यामधून वाचकाला लाभतो.

लेखक प्रा. वसंत खोत म्हणाले, आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावरील वळणवाटेची ही स्मरणचित्रे आहेत. अस्थिर भणंगपण, अपमान आणि मानहानीच्या जीवन कालखंडाचे कथन भुईभिंगरीत आहे.

या वेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रा. खोत यांचा शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चित्रकार संजय शेलार, डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. यु.के. सकट यांच्यासह मराठी अधिविभागाचे संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

तंत्रज्ञान अधिविभागातील २३ विद्यार्थ्यांची अग्रगण्य कंपन्यांत निवड

 


ऋत्विक पवारला एअरबसचे ९ लाखांचे पॅकेज

कोल्हापूर, दि. २१ ऑगस्टशिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान शाखेतील (सन २०२०-२१) अंतिम वर्षातील २३ विद्यार्थ्यांची निवड देशातील अग्रगण्य आयटी तसेच मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये झाली आहे.

ऋत्विक पवार या विद्यार्थ्यास नऊ लाखाचे पॅकेज एअरबस ग्रुप इंडिया प्रा.लिमिटेड या कंपनीचे मिळाले. केशव शिंदे, अमोल देवकाते, ऋषिकेश नलावडे, वैभव पाटील, ललित धने, ओमकार कोष्टी, अमित चौगुले या विद्यार्थ्यांची निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे येथे झाली. तसेच ॲक्सेंचर या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये प्रियंवदा राऊल, सुधांशु श्यामकुमार, अक्षय पालकृतवार, निकिता शिंदे, युगल टले या विद्यार्थ्यांची निवड झाली. सोनिया घाटगेची निवड विप्रो कंपनीत झाली. तसेच शीतल पाटील, ऋतुजा सुतार या सायबर सक्सेस या कंपनीत निवडल्या गेल्या. कॉग्निझंट या कंपनीत सॉफ्टवेअर असोसिएट या पदावर आशुतोष भोसले, काका सोनटक्के यांची निवड झाली. अनिकेत माहुरे हा एम्फसिस या मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर निवडला गेला. तसेच मौरीटेक या कंपनीत प्रतीक्षा कदम] ऐश्वर्या शेट्टी यांची निवड झाली तर शिवानी हेब्बाळे  ही विद्यार्थिनी हेक्झावेअर टेकनॉलॉजी या कंपनीत सिलेक्ट झाली. ऋत्विक पेडणेकर हा स्पेरेडिअन  टेक्नोलॉजी मध्ये तर ऋषिकेश मोहोळकर वॉल स्टार टेक्नॉलॉजी मध्ये निवडला गेला. राणी गर्जे ही विद्यार्थिनी कस्टमर सिन्त्रीया इंटरप्राइस या कंपनीत सिलेक्ट झाली. या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ट्रेनिंग कंपनी मार्फत सुरू आहे.

       संगणकशास्त्र शाखेप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान आधिविभागातील सहा विद्यार्थी अशुतोष साहू, असीम शेख, अनिष भेंडे व स्वप्नील पाटील हे सायबर सक्सेस या मल्टिनॅशनल आयटी कंपनीत निवडले गेले. तसेच प्रेरणा रजपुत ही टाटा कन्सल्टन्सी पुणे येथे निवडली गेली. श्रेया सावंत या विद्यार्थिनीची एम्फसीस या कंपनीमध्ये निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वार्षिक वेतन ४.२ लाख रुपये इतके आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी .एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आधिविभागाचे संचालक डॉ. आर.के.कामत यांचे मार्गदर्शन लाभले. संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान विभागाचे समन्वयक अनुक्रमे डॉ. सौ. आर. जे. देशमुख व डॉ. एस. बी. चव्हाण यांचे सहकार्य लाभले. प्लेसमेंट ऑफिसर श्री. सी. जे. आवटी व श्री. ए. ए. डूम यांनी ट्रेनिंग व प्लेसमेंटचे काम पाहिले.


Monday, 16 August 2021

कोविडमुळे प्रभावित झालेली परिस्थिती बदलण्यासाठी एकजुटीने काम करणे आवश्यक: डॉ. नरेंद्र जाधव

 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव

 

कोल्हापूर, दि. १६ ऑगस्ट: कोविड-१९ महामारीमुळे देशाची आर्थिक प्रगती निश्चितपणे प्रभावित झाली असून दारिद्र्यरेषेवर असणारी बहुसंख्य कुटुंबे या काळात दारिद्र्यरेषेखाली ढकलली गेली आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला नजीकच्या काळात एकजुटीने काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने आर्थिक धोरणे व सद्यस्थिती या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत पहिले पुष्प गुंफताना माझा जीवनकाळ(माय लाइफ अँड माय टाइम्स) या विषयावर डॉ. जाधव बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्र् डॉ. यशवंतराव थोरात प्रमुख उपस्थित होते.

देशाच्या आर्थिक धोरणांचा वेध घेत असताना माझ्या जीवनकार्याशीच निगडित हा विषय असल्याने माझा जीवनकाळ या अनुषंगाने मांडणी करणार असल्याचे सुरवातीलाच सांगून डॉ. जाधव यांनी त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक वाटचालीचा अभिनव पद्धतीने वेध घेतला. ते म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेने काम करण्याच्या तसेच सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. त्या संधी घेत वेगळ्या पद्धतीने काम करीत गेलो. जगभरातल्या संघटनांशी जोडला गेलो. त्याचप्रमाणे भारताच्या आर्थिक धोरण निश्चितीमध्ये रिझर्व्ह बँक, नियोजन आयोग तसेच अन्य विविध समित्या यांच्या माध्यमातून योगदान देता आले, याचे समाधान आहे.

डॉ. जाधव यांनी, भारताने सन १९९१मध्ये जे नवे जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले, त्यामध्ये अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या बरोबरीनेच भारतीय रिझर्व्ह बँक आणि तत्कालीन गव्हर्नर वेंकटरमण या अत्यंत विद्वान व्यक्तीमत्त्वाचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे, ही बाब त्यांच्या व्याख्यानात अधोरेखित केली.

आपल्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या कार्याचा वेध घेताना डॉ. जाधव यांनी इथिओपियातील सरकारचे आर्थिक सल्लागार, हवाला मार्केट अभ्यासासाठी दुबईला गुप्त भेट, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आयएमएफ)मधील साडेचार वर्षे आणि नॅशनल एडव्हायजरी कौन्सिल व नियोजन आयोगातील कारकीर्द यांचा सविस्तर आढावा घेतला. या माध्यमातून आयएमएफची कोटा पद्धती ही विकसनशील देशांसाठी मारक असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्याचप्रमाणे सोनेबाजार खुला करून तस्करीचे कंबरडे मोडण्याचा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चीफ इकॉनॉमिस्ट हे विशेष पद त्यांच्यासाठी निर्माण केले आणि त्यांच्यानंतर रद्द केले, असा महत्त्वाचा अनुभवही त्यांनी सांगितला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद हे केवळ सामाजिक न्यायाचा फेरा पूर्ण करण्यासाठी आपण स्वीकारले आणि अवघ्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत शिक्षण क्षेत्राला भरीव योगदान देता आले, याचे समाधानही डॉ. जाधव यांनी व्यक्त केले. त्या काळात आपण समर्थ भारत अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. हेच अभियान आज उन्नत भारतनावाने केंद्र सरकार चालविते आहे, हे मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर आणि डॉ. आंबेडकर म्युझियम यांची पाठपुरावा करून पूर्तता करता आल्याचेही समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. नामनिर्देशित खासदार असूनही सभागृहात नियमित व पूर्णवेळ उपस्थिती तसेच कामकाजात सहभाग घेऊन जनहिताच्या, देशहिताच्या अनेक प्रश्नांबाबत चर्चा करून मार्ग काढण्याची संधी लाभल्याचे विद्यार्थ्यांनी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड न करता पुढे जायला हवे, प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता उभे राहायला शिकले पाहिजे आणि जे कराल, त्यात सर्वश्रेष्ठ होण्याचे ध्येय बाळगले पाहिजे, हे स्वतःच्याच आयुष्यातील अनेक उदाहरणे देऊन डॉ. जाधव यांनी ओघवत्या भाषेत सांगितले.

सध्या आपण आंबेडकर आणि गांधी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना आणि भारतातील जाती व अमेरिकेतील वंश ही तीन महत्त्वाची पुस्तके लिहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. नरेंद्र जाधव यांनी अत्यंत अभिनव आणि ओघवत्या शैलीत त्यांच्या जीवननुभवातून अनेक महत्त्वाचे धडे युवा पिढीला सांगितले आहेत. त्यांनी केलेले मार्गदर्शन केवळ, संशोधक, अर्थतज्ज्ञांसाठीच नव्हे, तर कुटुंबातल्या, भोवतालातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त स्वरुपाचे आहे. विशेषतः कोणत्याही स्वरुपाच्या अन्यायाविरुद्ध आत्मविश्वासाने उभे राहण्याचा, आवाज उठविण्याचा त्यांचा गुणविशेष अत्यंत मार्गदर्शक आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी केले, तर डॉ. यशवंतराव थोरात यांनी परिचय करून दिला.

 

व्याख्यानमालेत होणारी व्याख्याने...

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने देश विदेशातील नामवंत अर्थतज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञाची विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून यामध्ये दर आठवड्याला एक या प्रमाणे तज्ज्ञ व्याख्यान देणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकरमाजी केंद्रीय मंत्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रावाय.के. अलघ, बँकिंग ज्ज्ञ डॉ. मुकुंदन, अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ हॉवर्ड जोन्स, रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. राजस परचुरे, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात, प्रा. ज्ञानदेव ळुले आदींची "आर्थिक धोरणे आणि सद्यस्थिती" या विषयावर व्याख्याने होतील.