Friday, 13 August 2021

अहिल्यादेवी होळकर हा मराठेवीरांच्या नभोमंडळातील उजळता शुक्रतारा: अण्णासाहेब डांगे

 

शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' वाहिनीसाठी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांची मुलाखत घेताना डॉ. आलोक जत्राटकर

ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे



(श्री. अण्णासाहेब डांगे यांची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी या व्हिडिओ लिंकवर क्लिक करा.)


कोल्हापूर, दि. १३ ऑगस्ट: अठराव्या शतकाच्या नभोमंडळात अनेक मराठेवीर चमकत होते, त्याच पटलावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शुक्रताऱ्यासारख्या उजळल्या होत्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आज येथे केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. डांगे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ या विषयावर विद्यापीठाच्या शिव-वार्ता या वाहिनीवर विशेष ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.


अण्णासाहेब डांगे म्हणाले, अहिल्यादेवी सत्ताधारी होत्या, राजकारणी धुरंधर होत्या, मात्र सत्तेच्या चढाओढीत नव्हत्या. पेशव्यांशी एकनिष्ठ होत्या, मात्र लाचारीने नतमस्तक होणाऱ्यांतल्या नव्हत्या. त्यांच्या जहागिरीत धान्याची कोठारे भरलेली असायची. मात्र सर्व प्रजा जेवल्याची खात्री झाल्याखेरीज त्या स्वतः अन्नग्रहण करीत नसत. त्यांचा खजिना सोन्याचांदीने भरलेला असला तरी त्यांच्या स्वतःच्या अंगावर मात्र स्फटिकाच्या माळेशिवाय अन्य दागिना नसे. अहिल्यादेवी धार्मिक वृत्तीच्या होत्या, मात्र धर्मभोळ्या नव्हत्या. जीवनात लढाया टाळण्यास त्यांनी प्राधान्य दिले, मात्र चालून आलेल्या शत्रूला नामोहरम केल्याशिवाय त्या सोडत नसत. पुरूषांच्या बरोबरीने लढाया लढत असताना स्त्रित्वाच्या मर्यादा मात्र त्यांनी सोडल्या नाहीत. त्या जेव्हा लढाईस जात, तेव्हा लुटणे अगर सत्ता प्रस्थापित करणे एवढाच त्यांचा उद्देश नसे, तर त्या भागाचा विकास करण्याची संधी मिळाल्याचे समाधान त्यांना असे. अशा साऱ्या प्रदेशात त्यांच्या समस्त योजना साकारत होत्या. त्यांच्या जीवनदायी प्रेरणेतून अन्नछत्रे, धर्मशाळा आकार घेत होत्या. दैवी गुणांच्या अलंकारांनी त्यांचे जीवन नटलेले होते. माणूसपणाच्या मर्यादांमध्येही हे सर्वगुणसंपन्नत्व उठून दिसणारे होते.

श्री. डांगे पुढे म्हणाले, अहिल्यादेवींच्या ठायी धर्मभावना, देशप्रेम, कर्तृत्व आणि दूरदृष्टी यांचा अनोखा संगम आढळतो. त्या केवळ कोणा एका समाजाच्या होत्या, असे मानणे अन्यायकारक ठरेल. संपूर्ण देशकल्याणाचा विचार आणि कृती त्यांच्या कारकीर्दीतून आपल्याला जागोजागी आढळते. मोरोपंत, वामन पंडित या तत्कालीन पंडितांनी पुण्यश्लोक पदवी देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे सच्चे मूल्यमापन व गौरव केला. अहिल्यादेवींनी वीस देशी वाणाच्या झाडांची निवड केली होती, ज्यांचा औषधी, अन्नासाठी तसेच उपयुक्त लाकूड मिळण्यासाठी वापर करता येऊ शकेल. अशा झाडांच्या लागवडीस त्यांनी प्रोत्साहन दिले. नागरिकांच्या सोयीसाठी दर वीस मैलांवर विहीरी बांधल्या. चार धाम रस्त्याने जोडण्याचे काम केले. देवळे ही संस्कृतीचे प्रतीक त्या मानत. संस्कृती रक्षण करण्यासाठी त्यांनी देवळांना संरक्षण पुरविले. काशीहून दररोज पाण्याची कावड रामेश्वरपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करीत असताना त्या जोडीनेच त्यांनी टपाल पाठविण्याची व्यवस्थाही विकसित केली. बहुतांश ज्योतिर्लिंगे ही आपल्या देशाच्या सीमा दर्शवितात. या सीमांचे रक्षण करण्यासाठी म्हणून ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार व संरक्षण करण्याचे कार्य त्यांनी केले. कृतीशीलतेचा आणि आदर्श राज्यकारकारभाराचा वस्तुपाठ म्हणून आपण त्यांच्या जीवनकार्याकडे पाहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यावेळी अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत समाजहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. हुंडाबंदी, सतिप्रथा यांच्याविरोधात त्यांनी आवाज उठविला. जलसंधारण, वृक्षलागवड, शिक्षण या क्षेत्रांसाठी त्यांनी घेतलेले व राबविलेले निर्णय अत्यंत मूलगामी स्वरुपाचे व पथदर्शक स्वरुपाचे आहे. आपल्या राज्याच्या सीमांपलिकडे जाऊन समाजहिताचे कार्य त्यांनी केले. आजही अशी अनेक ठिकाणे त्यांच्या स्मृती जागवित देशभरात उभी आहेत. एक द्रष्टा प्रशासक कसा असावा, याचे त्या ज्वलंत उदाहरण होत्या. तत्कालीन इतिहासकार, कवी यांनी त्यांची तुलना इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीसह तत्कालीन जागतिक स्तरावर कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांशी केलेली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीने समजून घेऊन त्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

शिवाजी विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीवरुन ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली. डॉ. एम.टी. गोफणे यांनी स्वागत व प्रास्ताविक तसेच कार्यक्रमाचे समन्वयन केले.

No comments:

Post a Comment