शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना आमदार लहू कानडे. |
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना आमदार लहू कानडे. |
कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे यांनी कष्टकऱ्याला मराठी साहित्याच्या प्रांतात कथानायक म्हणून त्याचे
अस्तित्व प्रदान करण्याचे महत्कार्य केले, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक-कवी आणि
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य लहू कानडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अध्यासनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन
व्याख्यानामध्ये ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब
वाहिनीवरून प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर
प्रमुख उपस्थित होते.
श्री. लहू कानडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे मराठीतले
अव्वल दर्जाचे साहित्यिक होते. व्यक्तीप्रधानतेऐवजी घटनाप्रधान लेखनाला त्यांनी
सदैव प्राधान्य दिले. खरे तर अण्णाभाऊ हे शेक्सपिअरच्या तोडीचे साहित्यिक, पण
इथल्या जातव्यवस्थेमुळे त्यांच्यावर अन्याय झाला. तरीही अण्णाभाऊंनी न डगमगता आपली
लेखणी चालविली. त्यांनी वंचित, शोषित, कष्टकरी लोकांना कथा-कादंबऱ्यांचे नायक
केले. हे लोक कधी जिंकतात, कधी हरतात, मात्र संघर्षकडे पाठ फिरवित नाहीत.
कष्टकऱ्यांची, श्रमिकांची ही संघर्षशीलता अण्णाभाऊंनी अत्यंत प्रत्ययकारकतेने
आपल्या साहित्यात चित्रित केली. अण्णाभाऊंची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक,
संघर्षाचे मूल्य शिकविते. कलात्मकतेच्या निकषांवर त्यांची साहित्यनिर्मिती अत्यंत
दर्जेदार स्वरुपाची आहे. या माध्यमातून अण्णाभाऊ हे दलित-शोषित समाजाचे महापुरूष
म्हणून झळाळून सामोरे उभे राहतात. त्यांच्यामध्ये सातत्ने संघर्षाचे बळ आणि विजयी
होण्याची प्रेरणा पेरताहेत, असेही ते म्हणाले.
अण्णाभाऊ हे आजही आपल्यासाठी एक क्रांतीकारक
तत्त्व म्हणून उभे असल्याचे सांगून श्री. कानडे पुढे म्हणाले, अण्णाभाऊंचे गिरणी
कामगार होणे ही अत्यंत परिवर्तनकारी घटना होती. या कामगार चळवळीने त्यांच्यातल्या
शाहीराला व्यासपीठ व ओळख प्राप्त करून दिली. अन्यथा ते या व्यवस्थेने त्यांच्यावर
लादलेल्या गुलामीच्या चौकटीमध्येच बंदिस्त झाले असते. आपल्या चौफेर प्रतिभेच्या
बळावर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्राण फुंकून ती जिवंत
राखण्याचे काम केले, हे त्यांचे फार मोलाचे योगदान आहे.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के |
यावेळी अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक डॉ.
रणधीर शिंदे यांनी स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्र-कुलगुरू
डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर
यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
शाहीर देवानंद माळी
यांचे बहारदार सादरीकरण
शाहीर देवानंद माळी |
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात आज सांगली येथील शाहीर देवानंद माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑनलाईन सहभागी होत अण्णाभाऊंच्या काही कवनांचे बहारदार सादरीकरण केले आणि उत्तम वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाची सुरवात शाहीर माळी यांनी ‘माझी मैना गावावर राह्यली..’ ही छक्कड सादर केली, तर कार्यक्रमाचा समारोप ‘जग बदल घालुनी घाव’ या सुप्रसिद्ध कवनाने केली.
अण्णाभाऊ साठे यांना
अभिवादन
दरम्यान, आज सकाळी १०.३० वाजता शिवाजी
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व
लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर.
पळसे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment