Saturday, 21 August 2021

‘भुईभिंगरी’मधून शिक्षण क्षेत्रातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना स्पर्श: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

प्रा. वसंत खोत लिखित 'भुईभिंगरी' या स्वकथनात्मक पुस्तकाचे प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) संजय शेलार, डॉ. नंदकुमार मोरे, दशरथ पारेकर, प्रा. खोत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. यु.के. सकट.

प्रा. वसंत खोत यांच्या भुईभिंगरी स्वकथनाचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: भुईभिंगरी हे प्रा. वसंत खोत यांचे स्वकथन शिक्षण क्षेत्रातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना स्पर्श करणारे आहे. त्या अनुषंगाने समाजात सर्वंकष चिंतन होण्याची गरज आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने येथील शिक्षक, लेखक व प्रकाशक प्रा. वसंत खोत यांच्या भुईभिंगरी या स्वकथनात्मक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक दशरथ पारेकर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, भुईभिंगरीमधील सामाजिक भोवताल हा एका वेगळ्या अनुभवविश्वाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामध्ये एकत्र कुटुंब आहे, त्याचे सर्व ताणेबाणे आहेत, तत्कालीन कष्टप्रद आयुष्यातून मुलाची आणि त्याच्या भवितव्याची सुटका व्हावी, म्हणून प्रयत्न करणारी आई आहे. हे सारे समजून घेण्याची उत्सुकता, वास्तवाच्या झळा आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. ते समजावून घेऊन त्यावर चिंतन करण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. तत्कालीन काळात शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेपुढे जे प्रश्न उभे ठाकले होते, त्यांनी आज अधिक गंभीर रुप धारण केले आहे. त्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी आजच्या पिढीने तत्परतेने सज्ज होण्याची गरज आहे.

ज्येष्ठ पत्रकार, संपादक दशरथ पारेकर म्हणाले, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील ग्रामीण भागातील साठ-सत्तरच्या दशकातील पिढीचे प्रातिनिधिक कथन म्हणून भुईभिंगरीकडे पाहण्याची गरज आहे. शिक्षणाचा प्रवाह ग्रामीण भागापर्यंत विस्तारण्याचे कार्य या पिढीने कष्टातून साकारले. त्याचे प्रतिबिंब यामध्ये दिसते. प्रा. खोत यांच्या प्रवाही, काव्यमय लेखनशैलीमुळे हे कथन अत्यंत वाचनीय झाले आहे. एक प्रकारचे कुतूहल व आत्मीयता वाचकाच्या मनात निर्माण करण्यात ते निश्चितपणाने यशस्वी होतात.

मराठी अधिविभागाच्या डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, सामान्य व्यक्तीच्या स्वकथनामध्ये इतिहासाच्या पाऊलखुणांचा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून सामोरे येण्याची क्षमता असते. त्या दृष्टीने प्रा. खोत यांच्या या लेखनाचे स्वागत करणे आवश्यक आहे. या कथनामध्ये मीपणाचा दर्प नाही. मानवी जगण्यात लाभलेल्या भूमीमध्ये स्वतःचा विस्तार करीत रिंगण पूर्ण करण्याचा एका सामान्य शिक्षकाचा चिंतन करावयास लावणारा प्रवास यामध्ये आहे. रम्य व वाचनीय भाषेमुळे कादंबरी वाचनाइतकाच आनंद यामधून वाचकाला लाभतो.

लेखक प्रा. वसंत खोत म्हणाले, आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावरील वळणवाटेची ही स्मरणचित्रे आहेत. अस्थिर भणंगपण, अपमान आणि मानहानीच्या जीवन कालखंडाचे कथन भुईभिंगरीत आहे.

या वेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रा. खोत यांचा शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चित्रकार संजय शेलार, डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. यु.के. सकट यांच्यासह मराठी अधिविभागाचे संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

1 comment:

  1. सुंदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मराठी विभागातील सर्व मान्यवरांचे अभिनंदन!!

    ReplyDelete