Monday, 23 August 2021

'गांधीयन अभियांत्रिकी'च्या मार्गानेच समावेशी नवोन्मेष शक्य: डॉ. रघुनाथ माशेलकर

 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर


कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट: देशाच्या विकासात महत्त्वाच्या असणाऱ्या शिक्षण, आरोग्य आदी सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमधील मागणी व पुरवठा या दोहोंमधील असमानता कमी करीत नेऊन समाजातील सर्व घटकांची सर्वसमावेशकता वाढविणे अशा समावेशी नवोन्मेषी धोरणाची देशाला गरज आहे. त्यासाठी आपल्याला 'गांधीयन अभियांत्रिकी'च्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत दुसरे पुष्प गुंफताना इनोव्हेशन लेड अॅक्सिलरेटेड इन्क्लुजिव्ह ग्रोथ (नवोन्मेषप्रणित गतिमान समावेशी वृद्धी) या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले, समावेशी नवोन्मेष व वृद्धीसाठी 'गांधीयन अभियांत्रिकी' हा अत्यंत मूलभूत व नैसर्गिक मार्ग आहे. आपली वसुंधरा प्रत्येक माणसाची गरज भागेल, इतके जरुर देते; प्रत्येकाची हाव भागविण्यास मात्र ती अक्षम आहे, हा गांधीविचार त्याचा पाया आहे आणि कमीत कमी संसाधनांच्या वापरातून अधिकाधिक लोकांसाठी अधिकाधिक, दर्जेदार साधन-सुविधांची निर्मिती करणे (MLM- More from Less for More and More)  हा त्याचा गाभा आहे. त्या दृष्टीने नवोन्मेषाकडे, नवनिर्माणाकडे पाहायला हवे. श्रीमंतांसाठी आणि श्रीमंतधार्जिणे तंत्रज्ञान बनविणे सोपी बाब आहे. तथापि, अत्याधुनिक तंत्रज्ञान बनविणे आणि दारिद्र्यात पिचलेल्या व्यक्तींसाठी तिचा सुयोग्य वापर करणे, हे मात्र अवघड असते. हेच आपल्या तरुणांसमोरचे खरे आव्हान आणि अपेक्षाही आहे. दारिद्र्यातील माणसांसाठी तंत्रज्ञानाची निर्मिती करून त्यांना आत्मप्रतिष्ठा प्रदान करण्यास इच्छुक असणाऱ्या युवाशक्तीची या देशाला खरी गरज आहे.

डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, भारत म्हणजे १३० कोटी खाणाऱ्या तोंडांचा देश म्हणविण्यापेक्षा १३० अब्ज विचार करणाऱ्या डोक्यांचा देश म्हणून ओळखला जाणे महत्त्वाचे वाटते. आजवर केवळ आपण जोडणी आणि जुळणी (असेंबल) करणाऱ्यांचा देश आहोत. त्याऐवजी आता नवसंशोधन करणाऱ्यांचा देश व्हायला हवे. भारताने आता शोध-संशोधन या मार्गाने मेक इन इंडिया ही मोहीम यशस्वी करायला हवी. आता देशाने नवोन्मेषाच्या बाजूने उभे राहायला हवे. त्यासाठीची भौतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक बांधणी करण्याबरोबरच उत्तम दर्जाच्या शैक्षणिक व संशोधन संस्था, इनक्युबेटर्स, त्यासाठी मदत प्रदान करणारे प्रोत्साहक, तंत्रज्ञान पार्क्स आणि भरीव भांडवल प्रदाते यांची मोठी गरज आहे. त्याबरोबरच पूरक शासकीय धोरण आखणीचीही आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षण आणि योग्य पूरक संधी यांच्या संयुक्त बळावरच आपले आणि आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, डिजीटल तंत्रज्ञानाची दरी सांधणे, डिजीटल समावेशन वाढविणे ही आजची खरी गरज आहेच. पण त्याचबरोबर शिक्षणाचा अधिकारही महत्त्वाचा आहे. योग्य शिक्षण, शिक्षण प्रदान करण्याची योग्य पद्धती आणि मूल्यसंवर्धन या बाबी देशाची भावी पिढी सकारात्मक व संतुलित बनविण्यासाठी फार आवश्यक आहेत. युवकांनीही नवोन्मेष, काहीतरी चांगले, भरीव करण्याची ऊर्मी व जिद्द तसेच समाजातल्या वंचित, शोषित समाजाप्रती आस्था, सहृदयता या बळावर देशातील सामाजिक-आर्थिक विषमता दूर होऊन समावेशी समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. डॉ. माशेलकर यांनी आपल्या व्याख्यानात देशातील तरुण समाजातील दरिद्री, वंचित, गरजू घटकांच्या समस्या सोडवून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा, नवोन्मेषाचा कशा पद्धतीने सकारात्मक वापर करीत आहेत, याची अनेक उदाहरणे दिली.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, देशातील विविध घटकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवोन्मेषी उत्तर शोधण्याचे काम आजची तरुण पिढी करीत आहे, तिच्यामध्ये या सामाजिक जाणिवा आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मिळालेल्या संधीचे रुपांतर मोठ्या व्यवसायात करण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे डॉ. माशेलकर यांच्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रापलिकडे जाऊन सर्वोत्कृष्ट ते देण्याची क्षमता विकसित करण्याचीही मोठी आवश्यकता आहे. देशातील सामाजिक-आर्थिक असमानता व दारिद्र्य यांच्यावर आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात करता येऊ शकते, याची ठोस जाणीव डॉ. माशेलकर यांनी करून दिली आहे. त्याचे अनुसरण करणेही गरजेचे आहे.

यावेळी अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले, तर ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी स्वागत व परिचय करून दिला.  

 

शिक्षण+संधी=भवितव्य

सन २००० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन् यांच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारताना (डावीकडून अनुक्रमे) ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि डॉ. रघुनाथ माशेलकर
(सौजन्य: डॉ. माशेलकर यांच्या सादरीकरणातून साभार)

शिक्षण+संधी=भवितव्य हे समीकरण माणसाचे आयुष्य कसे पालटून टाकते, याचे उदाहरण म्हणून डॉ. माशेलकर यांनी सन २००० सालची दोन छायाचित्रे सादर केली. या वर्षी टाटा उद्योग समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा आणि डॉ. माशेलकर यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन् यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले, याची ती छायाचित्रे होती. त्यांचा संदर्भ देऊन डॉ. माशेलकर म्हणाले, राष्ट्रपती के.आर. नारायणन् हे अत्यंत गरीब दलित कुटुंबातून आले. अशा परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी आपले शिक्षण घेतले. उच्चशिक्षणासाठी त्यांना टाटा फौंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या बळावर त्यांनी शिक्षण पूर्ण करून अंतिमतः देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतली. व्यक्तीशः माझ्या घरची परिस्थितीही बेताचीच होती. मलाही टाटा फौंडेशनची दरमहा साठ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली, म्हणून मी माझे शिक्षण पूर्ण करून आयुष्यात काही तरी भरीव करू शकलो. उपरोक्त कार्यक्रमात केवळ शिक्षणाच्या बळावर आयुष्यात काही तरी साध्य केलेल्या आणि टाटा फौंडेशनच्या एका लाभार्थ्याने दुसऱ्या लाभार्थ्याचा पद्म पुरस्कार प्रदान करून गौरव केलाच, शिवाय, त्याच लाभार्थ्याने प्रत्यक्ष टाटा फौंडेशनच्या अध्यक्षाचाही पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला. ही बाब केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकली, असे भावोद्गार डॉ. माशेलकर यांनी काढले.

No comments:

Post a Comment