शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करंजफेण परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत साहित्य वाटप करण्यात आले. |
कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शाहूवाडी
तालुक्यातील करंजफेण, पाल आणि सावर्डी आदी गावातील
पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम केले. या परिसरातील ७०० कुटुंबांना
धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू तसेच स्वच्छता कीट वाटप करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाकडे पुणे येथील नॉर ब्रॅमसे, ग्लोबल केअर यांच्या सीएसआर फंडातून तसेच वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक
संस्थेच्या माध्यमातून या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठाचा शिव आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलमेंटच्या
समाजकार्य अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी ही मदत वाटण्यासाठी पुढाकार घेतला.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एम. गायकवाड आणि
समाजकार्य अधिविभागातील सहायक संचालक अमोल मिणचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीस विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ही मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आली.
करंजफेण परिसराला पूराचा मोठा तडाखा बसला आहे. मात्र हा परिसर दुर्गम असल्याने
सुरूवातीला त्याची तीव्रता लक्षात आली नव्हती. करंजफेण, पाल
आणि सावर्डी या गावातील सत्तर टक्क्यांहून अधिक घरे पाण्यात होती. 12 घरे अतिवृष्टीने जमीनदोस्त झाली आहेत. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
हा दुर्गम भाग असल्याने प्रशासनाची मदत पोहोचणे जिकीरीचे ठरत आहे. त्यामुळे शिवाजी
विद्यापीठाने पुढाकार घेऊन अत्यंत गरजू असलेल्या या दुर्गम भागातील पूरग्रस्त
नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचवली. यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.
डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन
केले.
विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध आणि गहिवरलेले ग्रामस्थ
शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अधिविभागातील विद्यार्थी आणि
शिक्षक करंजफेण परिसरात दोन वर्षापूर्वी ग्रामीण विकासाचा आढावा घेण्यासाठी
आठवडाभर मुक्कामी होते. या काळात या विद्यार्थ्यांचे संबंधित गावकर्यांशी
ऋणानुबंध जुळले होते. ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना हेच विद्यार्थी
मदत साहित्य घेऊन गावात आल्याने ग्रामस्थांचे डोळे भरून आल्याचे चित्र होते.
No comments:
Post a Comment