Thursday, 30 December 2021

डॉ. आप्पासाहेब पवार यांना

स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 



कोल्हापूर, दि. ३० डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त आज विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते डॉ. पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ प्रांगणातील अतिथीगृहासमोरील डॉ. पवार यांचा अर्धपुतळा आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा आणि शिका विद्यार्थी वसतीगृह येथील अर्धपुतळा यांनाही पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह प्रा. किसनराव कुराडे, डॉ. टी.के. सरगर, प्राचार्य डॉ. जी.पी. माळी, डॉ. एस.जे. नाईक, डॉ. मानसिंगराव जगताप, डॉ. सी.टी. पवार, डॉ. सी.एच. भोसले, डॉ. एन.एल. तरवाळ आदी उपस्थित होते.


Saturday, 25 December 2021

गार्डन क्लबच्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेत

शिवाजी विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद

गार्डन क्लबच्या ५१व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी अरुण नरके यांच्या हस्ते स्वीकारताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव आणि उद्यान विभागाचे कर्मचारी. सोबत गार्डन क्लबचे सर्व पदाधिकारी.

गार्डन क्लबच्या ५१व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी अरुण नरके यांच्या हस्ते स्वीकारताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव आणि उद्यान विभागाचे कर्मचारी. सोबत गार्डन क्लबचे सर्व पदाधिकारी.


विविध ३५ गटांत पटकावली एकूण ५८ पारितोषिके

कोल्हापूर, दि. २५ डिसेंबर: येथील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने विविध ३५ गटांत एकूण ५८ पारितोषिके प्राप्त करीत यंदाही सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

विद्यापीठाने विविध पुष्प स्पर्धांमध्ये एकूण १३ प्रथम क्रमांक, २६ द्वितिय आणि १९ तृतीय अशी एकूण ५८ पारितोषिके प्राप्त केली. गेले दोन दिवस कृषी महाविद्यालयात झालेल्या या प्रदर्शन व स्पर्धेचा आज सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ झाला.

यावेळी समारंभाचे अध्यक्ष अरुण नरके यांच्या हस्ते विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, गार्डन क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, कोषाध्यक्ष राज अथणे उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागामार्फत या स्पर्धेसाठीची आवश्यक ती तयारी करण्यात आली. विद्यापीठास मिळालेल्या पारितोषिकांचा तपशील पुढीलप्रमाणे:

गुलाब प्रदर्शन व स्पर्धा: पांढरा (द्वितीय व तृतीय), नारंगी (द्वितीय), गडद गुलाबी (द्वितीय व तृतीय), किरमिजी (तृतीय), फिका पिवळा (द्वितीय व तृतीय), पट्टेदार (प्रथम व तृतीय), गडद पिवळा (द्वितीय व तृतीय), निळा (प्रथम व द्वितीय), दुरंगी (द्वितीय व तृतीय).

एकूण सहा फुले (प्रथम व तृतीय), एकूण नऊ फुले (तृतीय), एकूण बारा फुले (द्वितीय व तृतीय), सहा जातीची सहा फुले (प्रथम, द्वितीय), नऊ जातीची बारा फुले (प्रथम, द्वितीय), बटण गुलाब (द्वितीय व तृतीय), फ्लोरीबंडा (द्वितीय), बिगोनिया (तृतीय), एस्टर (प्रथम व द्वितीय), डेलिया (प्रथम, द्वितीय), मिनी डेलिया (प्रथम, द्वितीय), ग्लॅडिओलस (द्वितीय), झेंडू (तृतीय), जिरेनियम (द्वितीय व तृतीय), झिनिया (द्वितीय व तृतीय), शेवंती (द्वितीय व तृतीय), जरबेरा (प्रथम व द्वितीय), इतर फुले (द्वितीय), निशीगंध (द्वितीय), डेझी (द्वितीय व तृतीय), जास्वंद (द्वितीय व तृतीय), औषधी व सुगंधी वनस्पती (प्रथम), गुलाब- कुंड्यातील रोपे (प्रथम व द्वितीय), कुंड्यांतील रोपे- क्रोटॉन (प्रथम, द्वितीय), कुंड्यांतील रोपे- कोलीयस (तृतीय) आणि कुंड्यांतील रोपे- फर्न (प्रथम).  


Friday, 24 December 2021

शिवरायांचे स्त्रीदाक्षिण्य विवेकी आणि वास्तववादी: डॉ. मंजुश्री पवार

डॉ. श्रीकृष्ण महाजन लिखित 'छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन' या पुस्तकाचे प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, डॉ. महाजन, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. मंजुश्री पवार आणि श्यामसुंदर मिरजकर.


कोल्हापूर, दि. २४ डिसेंबर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन हा अत्यंत विवेकी आणि वास्तववादी स्वरुपाचा होता, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन लिखित छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि इस्लामपूरचे नाग-नालंदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

डॉ. पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांना आपण द्रष्टा युगपुरूष असे संबोधतो. त्यांच्या जीवन कारकीर्दीत स्त्रियांकडे पाहण्याचा पुरूषी दृष्टीकोन कसा असला पाहिजे, किती उदात्त असला पाहिजे, याचा वस्तुपाठ देणारे अनेक प्रसंग आहेत. तथापि, महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य पापभिरू अथवा भोळसट स्वरुपाचे नव्हते. म्हणजे केवळ स्त्री आहे, म्हणून तिचा सन्मान केला पाहिजे अगर तिच्यापासून दूर राहावे, असा नव्हता. तर, प्रसंगी युद्धसज्ज स्त्रियांविरुद्ध हाती शस्त्र धरण्यासही त्यांनी कमी केलेले नाही. बेलवडीच्या सावित्रीबाईंनी स्वराज्याचे बैल पळविले म्हणून तिच्या गढीवर सैन्य पाठवून वेढा घालून स्वराज्याच्या सैनिकांनी सुमारे २७ दिवस निकराचा लढा चालविला. मात्र, आपल्या एका सेनानीकडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न होताच त्याच्यावर कठोर कारवाई करून सेवेतून निष्कासित करावयास महाराजांनी कमी केले नाही. त्याचप्रमाणे सावित्रीबाईंचाही साडीचोळी देऊन सन्मान केला. सूरतेच्या लुटीवेळी एका व्यापाऱ्याचे नुकतेच निधन झाले होते. तेव्हा त्याच्या शोकाकुल पत्नी व कुटुंबाला अभय देऊन त्यांचे घर लुटीपासून सुरक्षित राखले. शिवाजी महाराजांचा हा भला दृष्टीकोन लक्षात घेऊन शाहिस्तेखान लाल महालातील जनानखान्यात जाऊन लपला, मात्र, महाराजांनी त्यावेळी जनानखान्यात जाऊन त्याच्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहिले नाही. मात्र, जनानखान्यातील स्त्रियांना कोणताही त्रास दिला नाही. अशी आणखीही उदाहरणे सापडतात. स्त्रियांप्रती महाराजांचे नैतिक भान सदैव जागृत असे. त्यांनी आपल्या सैन्यालाही महिला व बालके यांना चुकूनही त्रास न देण्याच्या कडक सूचना दिलेल्या होत्या. महाराजांचा हा दृष्टीकोन विकसित होण्यामागे मातोश्री जिजाऊ यांचे संस्कार कारणीभूत होते, याची कृतज्ञ जाणीव आपण ठेवायला हवी, याचेही स्मरण त्यांनी करून दिले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, छत्रपतींच्या जीवनकार्याचे, कर्तृत्वाचे अद्याप असे अनेक पैलू आहेत, ज्यांच्यावर आपल्याला अद्याप प्रकाश टाकावयाचा आहे. महाराजांचे प्रशासकीय कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य यांच्याविषयी तपशीलाने संशोधन होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे डॉ. महाजन यांनी त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टीकोनाची मांडणी करून या विषयाला तोंड फोडले आहे. मात्र, त्या संदर्भात अधिक तपशीलवार अभ्यास, संशोधन होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने या विषयाचा अधिक विस्तार करून त्यांनी लिहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील यांनी सदर पुस्तक सर्वदूर वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शुल्कसवलतीसह विविध प्रयोग करण्याची आवश्यकता व्यक्त केली. लेखक डॉ. महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लोकशाहीवादी आणि मानवी मूल्यांची रुजवात केली, त्यांचा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याच्या अनुषंगाने आधुनिक परिप्रेक्ष्यातून वेध घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर श्यामसुंदर मिरजकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, विलास सोयम, डॉ. के.आर. मारुलकर, प्रा. शोभा शेटे, अविनाश भाले, यांच्यासह इतिहासाचे अभ्यासक, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


Wednesday, 15 December 2021

लाईक्स, शेअरने फोटोग्राफीचे गांभीर्य हरवले: स्वप्निल पवार, इंद्रजित खांबे यांची खंत

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना वाईल्डलाईफ फोटोग्राफर स्वप्नील पवारडॉक्युमेंट्री फोटोग्राफर इंद्रजित खांबे. समोर उपस्थित विद्यार्थी आणि पदाधिकारी.

 

डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनातर्फे फोटोग्राफी कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर, दि. १५ डिसेंबर: फोटोग्राफीसाठी संयम असायला हवा. अथकपणे दीर्घकाळ परिश्रम केल्यानंतर फोटो वाचता येतो; मात्र, अलिकडे लाईक आणि शेअरसाठी फोटोग्राफी केली जात असल्याने त्याचे गांभीर्य हरवत चालले आहे, अशी खंत वाईल्डलाईफ फोटाग्राफर स्वप्निल पवार आणि डॉक्युमेंट्री फोटोग्राफर इंद्रजित खांबे यांनी आज येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि व्हिजन आय फोटो व्हिडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत ते बोलत होते. असोसिएशनचे उपाध्यक्ष आकाश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉलमध्ये कार्यशाळा झाली.

स्वप्निल पवार म्हणाले, वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये सर्वच प्राण्यांना महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारच्या फोटोग्राफीत त्या फोटोचे नेमके उपयोजन काय, याची स्पष्ट कल्पना असायला हवी. प्राण्यांच्या प्रजननाचा काळ किंवा प्राण्यांचे अधिवास यांची फोटोग्राफी करताना काळजी घ्यावी. वन्यजीवांचा आदर करणे आणि त्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने फोटोग्राफी व्हावी. प्राण्यांच्या डोळ्यांतील भाव पकडता आले पाहिजेत.

स्वप्निल पवार म्हणाले, वन्यजीवांच्या फोटोसाठी प्रकाशाचे ज्ञान हवे. प्राण्यांची माहिती आणि त्यांच्या दिनचर्येबद्दल किमान माहिती हवी. जंगलांच्या आसपास राहणार्‍या लोकांशी संवाद साधता आला, तर त्या त्या परिसरातील वन्यजीवांची माहिती मिळू शकते. जंगलात फोटोग्राफी करताना वन्यजीव संरक्षण कायद्यासह अन्य नियम आणि संकेत पाळणे महत्त्वाचे आहे. शिवाय जंगलात कायम दक्ष असणेही आवश्यक आहे. फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकायचा आहे आणि त्याला लाईक्स मिळवायच्या आहेत, अशी भावना असेल तर गुणवत्तापूर्ण फोटोग्राफी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

इंद्रजीत खांबे म्हणाले, डॉक्युमेंट्री फोटोग्राफी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याही छोट्या विषयावर अशा पद्धतीची फोटोग्राफी करता येते. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भावभावना टिपूनसुद्धा उत्तम फोटोग्राफी होऊ शकते. कोकणातील ओमप्रकाश चव्हाण या दशावतार कलाकाराच्या जीवनावर उच्च दर्जाची फोटोग्राफी झाली आहे. कोल्हापुरातील कुस्तीवरही चांगले डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. तालीम, पैलवान, त्यांचे जगणे, व्यायाम, गावागावातील कुस्त्यांचे फड, तेथील ईर्ष्या अशा एकाच विषयाशी संलग्न असणार्‍या विविध घटकांना जोडून आगळी डॉक्युमेंट्री फोटोग्राफी करण्यात आली आहे.

खांबे पुढे म्हणाले, फोटोमध्ये सामाजिक, सांस्कृतिक बंध असतात. ते शोधता आले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी त्या त्या संस्कृतीचा फोटोशी संबंध येतो. अनेक बदलाची नोंद फोटोग्राफीमुळे घेता येते. यासाठी डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचे आहे. फोटो वाचता येणे ही एक मोठी कला असून ती लगेचच आत्मसात होत नाही. यासाठी वेळ द्यावा लागतो. अनेक चांगल्या फोटोंचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातून आपली स्वतःची धारणा निर्माण होण्यास मदत होते. सोशल मीडियाच्या जमान्यात घाईने प्रसिद्धी मिळविण्यासाठी फोटोग्राफीचा वापर केला जात आहे. मात्र यातून गुणवत्तापूर्ण फोटोग्राफी होत नसून विषयाकडे उथळपणे पाहण्याचा दृष्टीकोन बळावत आहे. फोटोग्राफीसाठी ही चांगली गोष्ट नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. कार्यशाळा सहसंयोजक अभिजित गुर्जर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. माजी समन्वयक डॉ. रत्नाकर पंडित, विवेकानंद महाविद्यालयाच्या फोटोग्राफी विषयाचे शिक्षक रवीराज सुतार, फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी आणि पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.


गव्याला त्रास देऊ नका...

वन्य प्राणी मानवी वस्तीत का येतात, याचा विचार करायला हवा. नागरिक वन्य प्राण्यांच्या मागे धावत असल्याने प्राणी बिथरतात आणि त्यातून अप्रिय घटना घडतात. यासाठी माणसांनी जंगली प्राण्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोल्हापुरात गवा आल्यानंतर नागरिकांनी ज्या पद्धतीने त्याला जेरीस आणले, ते पाहता अशा गोष्टी थांबवणे आवश्यक आहे, असे मत स्वप्निल पवार यांनी व्यक्त केले.

 

Monday, 13 December 2021

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी डॉ. प्रल्हाद माने समूह समन्वयक

 

डॉ. प्रल्हाद माने

राष्ट्रीय परीक्षक म्हणूनही काम पाहणार; संसदीय कार्य मंत्रालयाकडून निवड

कोल्हापूर, दि. १३ डिसेंबर: केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आयोजित सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी येथील शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रल्हाद माने यांची समूह समन्वयक तसेच राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाकडून देशभरातील विद्यापीठेमहाविद्यालयांमधून राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी होणाऱ्या १६ वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी डॉ. माने यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए.बी. आचार्य यांनी सदर निवडीबाबतचे पत्र डॉ. माने यांना पाठविले आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठ, कर्नाटकमधील मंगळूर विद्यापीठ, मध्यप्रदेशमधील इंदिरा गांधी केंद्री दिवासी विद्यापीठ (अमरकंटक), स्वामी विवेकानंद विद्यापीठ (सागर), देवी अहिल्या होळकर विद्यापीठ (इंदोर) आणि उत्तर प्रदेश येथील दयालबाग शिक्षण संस्था (आग्रा) या सहा विद्यापीठांमध्ये आयोजित सोळाव्या युवा संसद स्पर्धेचे समूह समन्वयक व राष्ट्रीय परिक्षक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी डॉ. माने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

डॉ. प्रल्हाद माने शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे समन्वयक आहेत. त्यांनी यापूर्वी विविध विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. सन २०१८मध्ये डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसद संघाने राष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद प्राप्त केले आहे.

डॉ. माने यांच्या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

Friday, 10 December 2021

शिवाजी विद्यापीठास ‘जिल्हा उत्पन्न अंदाज’ तयार करण्याचा ८५ लाखांचा प्रकल्प मंजूर

 

कोल्हापूर, दि. १० डिसेंबर: महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत शिवाजी विद्यापीठास सांख्यिकी सक्षमीकरणासाठी सहाय्य व केंद्र योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर जिल्हा उत्पन्न अंदाज (District Domestic Product) तयार करण्याचा सुमारे ८५ लाख रुपयांचा पथदर्शी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. अशा स्वरुपाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती अर्थशास्त्र विभागामार्फत देण्यात आली आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सांख्यिकी सक्षमीकरणासाठी सहाय्य या केंद्र योजनेंतर्गत मंजूर सामंजस्य करारान्वये राज्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा उत्पन्न अंदाज करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या कामी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र व संख्याशास्त्र अधिविभागातील तज्ज्ञांच्या द्वारे शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास शासनाच्या नियोजन विभागाकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांच्या उपस्थितीत संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि विद्यापीठातील अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विभागांतील तज्ज्ञ यांच्यामध्ये वेळोवेळी ऑनलाईन बैठका होऊन त्यातील चर्चेनुसार जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्याच्या प्रकल्पास अंतिम स्वरुप देण्यात येऊन सदर प्रकल्प मंजूर झाला आहे.

सदर मान्यतेनुसार, जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्याची कार्यपद्धती विकसित करणे, त्यानुसार प्रथम पुणे विभागातील एका जिल्ह्यासाठीचा म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याकरिता जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करणे आणि त्यानंतर इतर महसुली विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे पाच जिल्ह्यांचे जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करणे या कामांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, नंदूरबार, उस्मानाबाद, यवतमाळ व नागपूर यांचा समावेश आहे. या पथदर्शी प्रकल्पानंतर पुढील टप्प्यात राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाने ८५ लाख १४ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता दिली आहे. विद्यापीठाने अर्थशास्त्र व संख्याशास्त्र अधिविभागांतील तज्ज्ञांची समिती तयार केली असून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम आरंभले आहे.

प्रकल्पाचे महत्त्व:

राष्ट्रीय स्तरावर सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product) मोजले जाते. त्यावरुन देशाच्या आर्थिक स्थितीचा आणि वाटचालीचा अंदाज घेतला जातो. याच्या आधारे देशाची विविध आर्थिक धोरणे आखली जातात. राज्य स्तरावर मात्र अशी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक वाटचालीचा वस्तुनिष्ठ वेध घेता येत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून सदरचा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून याअंतर्गत सुरवातीला कोल्हापूर जिल्हा आणि त्यानंतर प्रत्येक विभागातील एक या प्रमाणे सहा जिल्ह्यांचे जिल्हा उत्पन्न अंदाज निर्धारित करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी, वाणिज्य, व्यापार, उद्योग, सहकार, सेवा आदी सर्वच क्षेत्रांचा समावेश असल्याने जिल्ह्याचे नेमके उत्पन्न प्रथमच सामोरे येणार आहे. या अधिक नेमक्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे राज्य शासनाला आपली आर्थिक धोरणे अधिक नेमकेपणाने व काटेकोरपणे आखण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील अर्थ व सांख्यिकी तज्ज्ञांकडून या प्रकल्पाला दिशा लाभणार आहे, ही बाब महत्त्वाची आहे.

 

शिवाजी विद्यापीठाचे देशाच्या अर्थकारणासाठी मोठे योगदान

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, जिल्हानिहाय जिल्हा उत्पन्न अंदाज पद्धती विकसित करण्याचा हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रयोग व प्रकल्प आहे. यामुळे सूक्ष्म स्तरावर देशाच्या आर्थिक उत्पन्नाचा अंदाज अधिक नेमकेपणाने घेता येणे शक्य होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पानंतर पुढे हा प्रकल्प राज्यभरात राबविला जाणार आहे. पुढे राष्ट्रीय स्तरावरही विस्ताराची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे हे देशाच्या आर्थिक विकासाची धोरणे ठरविण्याच्या कामी मोलाचे योगदान असणार आहे, ही बाब अभिमानपूर्वक नमूद करायला हवी. या सर्व अर्थ व सांख्यिकी तज्ज्ञांचे अभिनंदन करताना मनस्वी आनंद होतो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Wednesday, 8 December 2021

शिवाजी विद्यापीठात संत जगनाडे महाराजांची जयंती

 



कोल्हापूर, दि. ८ डिसेंबर: संत संताजी जगनाडे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.

संत तुकाराम महाराज यांचे शिष्य असलेले आणि त्यांचे टाळकरी व लेखनिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेस आज कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Monday, 6 December 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार व डॉ. एस.एस. महाजन. सोबत आनंद खामकर, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. सरदार सोनंदकर, डॉ. राजू श्रावस्ती आदी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात आयोजित अभिवादन सभेत बोलताना प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार. व्यासपीठावर डॉ. अविनाश भाले व डॉ. एस.एस. महाजन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात आयोजित अभिवादन सभेत बोलताना डॉ. एस.एस. महाजन. समवेत डॉ. अविनाश भाले व प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार.


कोल्हापूर, दि. ६ डिसेंबर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्यात भारतीय समाज कमी पडला, म्हणूनच देशाची प्रगती खुंटली, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

प्राचार्य कुंभार म्हणाले, आपण समस्त महामानवांची जातीजातींत विभागणी करून टाकली आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि कार्य यांचा संकोच झाला पाहिजे. बाबासाहेब असोत की फुले, शाहूंसारखे द्रष्टे नेते असोत, सामाजिक तळमळीचे कार्य करताना त्यांच्या डोळ्यांसमोर काही केवळ एकच समाज नव्हता, तर अखिल भारतीय समाजाच्या कल्याणाची तळमळ त्यांच्या ठायी होती. महिलांसह शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, वंचित, शोषित आदी सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सारी धडपड होती. सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार म्हणजेच देशाच्या कल्याणाचा, प्रगतीचा विचार होता. मात्र, हे समजून घेण्यात आपण कमी पडलो आहोत. त्यांचा हा मानवतावाद, समतावाद आपण कधी स्वीकारणार, हा कळीचा मुद्दा आहे. बाबासाहेबांचे वाचन करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर त्यांना बिटविन द लाइन्स वाचणे हा भाग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने भारतीय समाजाने त्यांचे आकलन करवून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांचा जागतिक पातळीवर फार मोठ्या प्रमाणावर स्वीकार झालेला आहे कारण मानवी समाजाला उन्नत करण्याचा तो विचार आहे. भारतीय लोकशाही समृद्ध व बळकट करण्यासाठी तितकेच सक्षम असे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला प्रदान केले, हे त्यांचे भारतीय समाजावरील थोर उपकार आहेत. बाबासाहेब समजून घेण्याची ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे, इतका त्यांच्या कार्याचा आवाका आणि व्याप्ती आहे. त्यांच्या कार्याचे अनेक पैलू अद्यापही जगासमोर आलेले नाहीत. त्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचे वाहक तयार करणे ही आजची खरी गरज आहे.

केंद्राच्या संविधान दूत उपक्रमामध्ये योगदान देण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. यावेळी प्राचार्य डॉ. कुंभार, डॉ. महाजन यांच्यासह उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प वाहून अभिवादन केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी डॉ. राजू श्रावस्ती, डॉ. सरदार सोनंदकर, डॉ. वाय.व्ही. धुपदाळे, आनंद खामकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Saturday, 4 December 2021

नववास्तववादी चित्रपटांची देशात परंपरा : डॉ. अनमोल कोठाडिया

 

इफ्फीच्या ७५ क्रिएटिव्ह माईंड्समध्ये निवड झाल्याबद्दल सोमदत्त देसाई याचा सत्कार करताना डॉ. अनमोल कोठाडिया. सोबत अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव.

कोल्हापूर, दि. ४ डिसेंबर: भारतात १९५२ साली भरलेल्या हिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून (इफ्फी) नववास्तववादी चित्रपटांची परंपरा आहे. ही परंपरा पुढे घेऊन जाण्यास गोव्यातील इफ्फीची मदत होत आहे, असे प्रतिपादन जेष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनच्या वतीने आयोजित इफ्फी आणि चित्रपट चळवळ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव होते. यावेळी इफ्फीच्या ७५ क्रिएटिव्ह माईंड्समध्ये निवड झालेला एम.ए. मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी सोमदत्त देसाई याचा डॉ. कोठाडिया याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. कोठाडिया म्हणाले,  भारतीय चित्रपट चळवळीला मोठी परंपरा आहे. इफ्फीमुळे ही परंपरा पुढे जात आहे. १९५२मध्ये त्यावेळच्या महोत्सवात दाखवलेल्या बायसिकल थिव्ज या चित्रपटाने एक नवा वास्तववादी दृष्टीकोन दिला. त्यानंतरच्या काळात नाववास्तववादी चित्रपटांची मांडणी होऊ लागली. सध्याच्या इफ्फीला समजून घेताना हा इतिहास समजून घ्यावा लागेल. तत्पूर्वी १९२५ पासून लंडनमध्ये सुरू झालेल्या चित्रपट चळवळी पासून व्हेनिस चित्रपट महोत्सवापर्यंत अनेक गोष्टीचे नीट आकलन करून घ्यावे लागेल. चित्रपटाचा समाजावर खूप मोठा आणि तत्काळ परिणाम होत असल्याने हे माध्यम प्रचारासाठी वापरले जाते. हा केवळ सांस्कृतिक उपक्रम नाही, तर त्याला अनेक बाजू आहेत.

गोव्यातील महोत्सवाने जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. जगातील चित्रपट, विषय, मांडणी आणि वेगवेगळे प्रयोग अनुभवाने शक्य झाले. भारतीय चित्रपटातील वेगळेपणही या निमित्ताने अधोरेखित होत आहे, असे ते म्हणाले. सोमदत्त देसाई यानेही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

इफ्फीच्या क्रिएटिव्ह माईंडमध्ये निवड झाल्याबद्दल सोमदत्त देसाई याचा सत्कार करताना डॉ. अनमोल कोठाडिया. सोबत अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव.