शिवाजी विद्यापीठातर्फे दिव्यांग दिनानिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना मीरा बडवे. |
शिवाजी विद्यापीठातर्फे दिव्यांग दिनानिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना सोनाली नवांगुळ |
शिवाजी विद्यापीठातर्फे दिव्यांग दिनानिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के |
कोल्हापूर, दि. ३
डिसेंबर: दिव्यांगांप्रती भेदभाव बाळगून त्यांना
सर्वसामान्यांपेक्षा वेगळे समजणे गैर आहे, असे मत पुणे येथील निवांत अंध मुक्त
विकासालयाच्या संस्थापक-संचालक मीरा बडवे यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समावेशी शिक्षण संसाधन केंद्र, युजीसी स्कीम फॉर
पर्सन्स विथ डिसॅबिलीटीज् आणि सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र
यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष
ऑनलाईन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के होते.
मीरा बडवे म्हणाल्या, दिव्यांग तसेच विशेष दृष्टी मुले यांना सर्वसामान्यांहून
वेगळे समजणे चुकीचे आहे. सामाजिक पातळीवर त्यांना समजून घेऊन मुख्य प्रवाहात
सक्षमपणाने सामील होण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता आहे. अद्यावत तंत्रज्ञानाचा,
माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन दिव्यांगांसाठी सहाय्यकारी असा स्वरुपाची साधने व
सुविधा यांची निर्मिती करून त्यांचे जगणे सुकर होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी
प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसह जीवनाच्या विविध परीक्षांनाही सामोरे
जाण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठीही मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी चिरंतन
चालणारी व्यवस्था निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, आजवर ‘निवांत’मधून हजारो मुले शिकून बाहेर पडली
आणि आज किमान ७८ नातवंडांची मी आजी आहे. या दिव्यांग मुलांना संस्थेपेक्षा
कुटुंबाची गरज अधिक असते, असे मी अनुभवातून ठामपमे सांगू शकते. संस्था उभारणीच्या
अनेक कटुगोड आठवणीही त्यांनी या प्रसंगी सांगितल्या.
लेखिका सोनाली नवांगुळ म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिवाजी
विद्यापीठ तत्पर आणि संवेदनशील असल्याचा मला वैयक्तिक अनुभव आहे. आपल्या वेगळ्या
जगण्याचा विद्यापीठाच्या व्यासपीठावरुन परामर्ष घेण्याची मिळालेली संधी खूप महत्त्वाची
आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काही नवे उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून उभे
करू या, जे राज्य आणि देशभरात आदर्शवत ठरेल. हातात हात घालून चांगल्या कामांसाठी
एकत्रपणाने उभे राहू या, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मीरा बडवे यांच्या
कार्यकर्तृत्वातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीची
नव्हे, तर समान हक्क, अधिकार प्रदान करण्याची आवश्यकता आहे, हे त्यांच्या
व्याख्यानातून अधोरेखित झाले. सुमारे २५ वर्षे दिव्यांगांसाठी त्यांनी केलेले काम
फार मोलाचे आहे. टेक व्हिजन, चॉकलेट फॅक्टरी आदी उपक्रमांद्वारे दिव्यांगांना
स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. शिवाजी
विद्यापीठाने यंदाच्या युवा महोत्सवापासून शक्य त्या सर्व कला प्रकारांत दिव्यांग
विद्यार्थ्यांना सहभागाची बरोबरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांसाठी
आपल्या स्तरावर छोटे मोठे प्रकल्प राबविता येतील का, या दृष्टीने संकल्प करून त्याची
अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबद्ध होऊ या. या व्यक्तींना आत्मविश्वास देऊन उभे करणे
हेच आपले ध्येय आणि ध्यास असला पाहिजे.
सुरवातीला मीरा बडवे यांनी ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून निवांत अंध मुक्त
विकासालयाच्या कार्याची ओळख करून दिली. यावेळी डॉ. नमिता खोत यांनी स्वागत,
प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्रभारी वित्त
व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह डॉ. जगन कराडे, अधिविभागांतील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व विविध महाविद्यालयांचे ग्रंथपाल
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment