Friday, 24 December 2021

शिवरायांचे स्त्रीदाक्षिण्य विवेकी आणि वास्तववादी: डॉ. मंजुश्री पवार

डॉ. श्रीकृष्ण महाजन लिखित 'छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन' या पुस्तकाचे प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, डॉ. महाजन, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. मंजुश्री पवार आणि श्यामसुंदर मिरजकर.


कोल्हापूर, दि. २४ डिसेंबर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन हा अत्यंत विवेकी आणि वास्तववादी स्वरुपाचा होता, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन लिखित छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि इस्लामपूरचे नाग-नालंदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

डॉ. पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांना आपण द्रष्टा युगपुरूष असे संबोधतो. त्यांच्या जीवन कारकीर्दीत स्त्रियांकडे पाहण्याचा पुरूषी दृष्टीकोन कसा असला पाहिजे, किती उदात्त असला पाहिजे, याचा वस्तुपाठ देणारे अनेक प्रसंग आहेत. तथापि, महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य पापभिरू अथवा भोळसट स्वरुपाचे नव्हते. म्हणजे केवळ स्त्री आहे, म्हणून तिचा सन्मान केला पाहिजे अगर तिच्यापासून दूर राहावे, असा नव्हता. तर, प्रसंगी युद्धसज्ज स्त्रियांविरुद्ध हाती शस्त्र धरण्यासही त्यांनी कमी केलेले नाही. बेलवडीच्या सावित्रीबाईंनी स्वराज्याचे बैल पळविले म्हणून तिच्या गढीवर सैन्य पाठवून वेढा घालून स्वराज्याच्या सैनिकांनी सुमारे २७ दिवस निकराचा लढा चालविला. मात्र, आपल्या एका सेनानीकडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न होताच त्याच्यावर कठोर कारवाई करून सेवेतून निष्कासित करावयास महाराजांनी कमी केले नाही. त्याचप्रमाणे सावित्रीबाईंचाही साडीचोळी देऊन सन्मान केला. सूरतेच्या लुटीवेळी एका व्यापाऱ्याचे नुकतेच निधन झाले होते. तेव्हा त्याच्या शोकाकुल पत्नी व कुटुंबाला अभय देऊन त्यांचे घर लुटीपासून सुरक्षित राखले. शिवाजी महाराजांचा हा भला दृष्टीकोन लक्षात घेऊन शाहिस्तेखान लाल महालातील जनानखान्यात जाऊन लपला, मात्र, महाराजांनी त्यावेळी जनानखान्यात जाऊन त्याच्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहिले नाही. मात्र, जनानखान्यातील स्त्रियांना कोणताही त्रास दिला नाही. अशी आणखीही उदाहरणे सापडतात. स्त्रियांप्रती महाराजांचे नैतिक भान सदैव जागृत असे. त्यांनी आपल्या सैन्यालाही महिला व बालके यांना चुकूनही त्रास न देण्याच्या कडक सूचना दिलेल्या होत्या. महाराजांचा हा दृष्टीकोन विकसित होण्यामागे मातोश्री जिजाऊ यांचे संस्कार कारणीभूत होते, याची कृतज्ञ जाणीव आपण ठेवायला हवी, याचेही स्मरण त्यांनी करून दिले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, छत्रपतींच्या जीवनकार्याचे, कर्तृत्वाचे अद्याप असे अनेक पैलू आहेत, ज्यांच्यावर आपल्याला अद्याप प्रकाश टाकावयाचा आहे. महाराजांचे प्रशासकीय कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य यांच्याविषयी तपशीलाने संशोधन होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे डॉ. महाजन यांनी त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टीकोनाची मांडणी करून या विषयाला तोंड फोडले आहे. मात्र, त्या संदर्भात अधिक तपशीलवार अभ्यास, संशोधन होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने या विषयाचा अधिक विस्तार करून त्यांनी लिहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील यांनी सदर पुस्तक सर्वदूर वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शुल्कसवलतीसह विविध प्रयोग करण्याची आवश्यकता व्यक्त केली. लेखक डॉ. महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लोकशाहीवादी आणि मानवी मूल्यांची रुजवात केली, त्यांचा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याच्या अनुषंगाने आधुनिक परिप्रेक्ष्यातून वेध घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर श्यामसुंदर मिरजकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, विलास सोयम, डॉ. के.आर. मारुलकर, प्रा. शोभा शेटे, अविनाश भाले, यांच्यासह इतिहासाचे अभ्यासक, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment