डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात आयोजित अभिवादन सभेत बोलताना प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार. व्यासपीठावर डॉ. अविनाश भाले व डॉ. एस.एस. महाजन. |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात आयोजित अभिवादन सभेत बोलताना डॉ. एस.एस. महाजन. समवेत डॉ. अविनाश भाले व प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार. |
कोल्हापूर, दि. ६
डिसेंबर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्यात
भारतीय समाज कमी पडला, म्हणूनच देशाची प्रगती खुंटली, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.
प्रकाश कुंभार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या
वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात
आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
प्राचार्य कुंभार म्हणाले, आपण समस्त महामानवांची जातीजातींत विभागणी करून
टाकली आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि कार्य यांचा संकोच झाला पाहिजे. बाबासाहेब
असोत की फुले, शाहूंसारखे द्रष्टे नेते असोत, सामाजिक तळमळीचे कार्य करताना
त्यांच्या डोळ्यांसमोर काही केवळ एकच समाज नव्हता, तर अखिल भारतीय समाजाच्या
कल्याणाची तळमळ त्यांच्या ठायी होती. महिलांसह शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी,
वंचित, शोषित आदी सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सारी धडपड होती.
सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार म्हणजेच देशाच्या कल्याणाचा, प्रगतीचा विचार होता.
मात्र, हे समजून घेण्यात आपण कमी पडलो आहोत. त्यांचा हा मानवतावाद, समतावाद आपण
कधी स्वीकारणार, हा कळीचा मुद्दा आहे. बाबासाहेबांचे वाचन करणे हा महत्त्वाचा
मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर त्यांना ‘बिटविन
द लाइन्स’ वाचणे हा भाग सुद्धा
खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने भारतीय समाजाने त्यांचे आकलन करवून घेणे आवश्यक
आहे, असेही ते म्हणाले.
केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांचा जागतिक
पातळीवर फार मोठ्या प्रमाणावर स्वीकार झालेला आहे कारण मानवी समाजाला उन्नत
करण्याचा तो विचार आहे. भारतीय लोकशाही समृद्ध व बळकट करण्यासाठी तितकेच सक्षम असे
संविधान बाबासाहेबांनी आपल्याला प्रदान केले, हे त्यांचे भारतीय समाजावरील थोर
उपकार आहेत. बाबासाहेब समजून घेण्याची ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे, इतका
त्यांच्या कार्याचा आवाका आणि व्याप्ती आहे. त्यांच्या कार्याचे अनेक पैलू
अद्यापही जगासमोर आलेले नाहीत. त्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचे
वाहक तयार करणे ही आजची खरी गरज आहे.
केंद्राच्या ‘संविधान
दूत’ उपक्रमामध्ये योगदान
देण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. यावेळी
प्राचार्य डॉ. कुंभार, डॉ. महाजन यांच्यासह उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प वाहून अभिवादन केले. डॉ. अविनाश भाले यांनी
आभार मानले. यावेळी डॉ. राजू श्रावस्ती, डॉ. सरदार सोनंदकर, डॉ. वाय.व्ही.
धुपदाळे, आनंद खामकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment