Friday, 10 December 2021

शिवाजी विद्यापीठास ‘जिल्हा उत्पन्न अंदाज’ तयार करण्याचा ८५ लाखांचा प्रकल्प मंजूर

 

कोल्हापूर, दि. १० डिसेंबर: महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत शिवाजी विद्यापीठास सांख्यिकी सक्षमीकरणासाठी सहाय्य व केंद्र योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर जिल्हा उत्पन्न अंदाज (District Domestic Product) तयार करण्याचा सुमारे ८५ लाख रुपयांचा पथदर्शी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. अशा स्वरुपाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती अर्थशास्त्र विभागामार्फत देण्यात आली आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सांख्यिकी सक्षमीकरणासाठी सहाय्य या केंद्र योजनेंतर्गत मंजूर सामंजस्य करारान्वये राज्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा उत्पन्न अंदाज करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या कामी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र व संख्याशास्त्र अधिविभागातील तज्ज्ञांच्या द्वारे शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास शासनाच्या नियोजन विभागाकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांच्या उपस्थितीत संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि विद्यापीठातील अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विभागांतील तज्ज्ञ यांच्यामध्ये वेळोवेळी ऑनलाईन बैठका होऊन त्यातील चर्चेनुसार जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्याच्या प्रकल्पास अंतिम स्वरुप देण्यात येऊन सदर प्रकल्प मंजूर झाला आहे.

सदर मान्यतेनुसार, जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्याची कार्यपद्धती विकसित करणे, त्यानुसार प्रथम पुणे विभागातील एका जिल्ह्यासाठीचा म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याकरिता जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करणे आणि त्यानंतर इतर महसुली विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे पाच जिल्ह्यांचे जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करणे या कामांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, नंदूरबार, उस्मानाबाद, यवतमाळ व नागपूर यांचा समावेश आहे. या पथदर्शी प्रकल्पानंतर पुढील टप्प्यात राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाने ८५ लाख १४ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता दिली आहे. विद्यापीठाने अर्थशास्त्र व संख्याशास्त्र अधिविभागांतील तज्ज्ञांची समिती तयार केली असून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम आरंभले आहे.

प्रकल्पाचे महत्त्व:

राष्ट्रीय स्तरावर सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product) मोजले जाते. त्यावरुन देशाच्या आर्थिक स्थितीचा आणि वाटचालीचा अंदाज घेतला जातो. याच्या आधारे देशाची विविध आर्थिक धोरणे आखली जातात. राज्य स्तरावर मात्र अशी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक वाटचालीचा वस्तुनिष्ठ वेध घेता येत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून सदरचा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून याअंतर्गत सुरवातीला कोल्हापूर जिल्हा आणि त्यानंतर प्रत्येक विभागातील एक या प्रमाणे सहा जिल्ह्यांचे जिल्हा उत्पन्न अंदाज निर्धारित करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी, वाणिज्य, व्यापार, उद्योग, सहकार, सेवा आदी सर्वच क्षेत्रांचा समावेश असल्याने जिल्ह्याचे नेमके उत्पन्न प्रथमच सामोरे येणार आहे. या अधिक नेमक्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे राज्य शासनाला आपली आर्थिक धोरणे अधिक नेमकेपणाने व काटेकोरपणे आखण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील अर्थ व सांख्यिकी तज्ज्ञांकडून या प्रकल्पाला दिशा लाभणार आहे, ही बाब महत्त्वाची आहे.

 

शिवाजी विद्यापीठाचे देशाच्या अर्थकारणासाठी मोठे योगदान

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, जिल्हानिहाय जिल्हा उत्पन्न अंदाज पद्धती विकसित करण्याचा हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रयोग व प्रकल्प आहे. यामुळे सूक्ष्म स्तरावर देशाच्या आर्थिक उत्पन्नाचा अंदाज अधिक नेमकेपणाने घेता येणे शक्य होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पानंतर पुढे हा प्रकल्प राज्यभरात राबविला जाणार आहे. पुढे राष्ट्रीय स्तरावरही विस्ताराची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे हे देशाच्या आर्थिक विकासाची धोरणे ठरविण्याच्या कामी मोलाचे योगदान असणार आहे, ही बाब अभिमानपूर्वक नमूद करायला हवी. या सर्व अर्थ व सांख्यिकी तज्ज्ञांचे अभिनंदन करताना मनस्वी आनंद होतो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment