Thursday, 25 May 2023

शिवाजी विद्यापीठातील आठ विद्यार्थी ‘उत्कृष्ट युवा संसदरत्न’; दिल्लीत होणार गौरव

 पवन पाटील याच्यासह सात विद्यार्थिनींचा समावेश

संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए.बी. आचार्य आणि निरीक्षक प्रा. एस.बी. देओसकर यांच्यासमवेत शिवाजी विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय युवा संसदेमधील 'उत्कृष्ट युवा संसदपटू' बहुमानाचे मानकरी विद्यार्थी (खाली बसलेले) प्रतीक्षा कांबळे, पवन पाटील, ऋतिका धनगर, प्रतीक्षा पाटील, आसिया जमादार, श्रेया म्हापसेकर, सिमरन घाशी आणि अनमोल पाटील. सोबत (उभे) डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. तानाजी चौगुले आदी.


कोल्हापूर, दि. २५ मे: शिवाजी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेअंतर्गत विद्यापीठातील आठ विद्यार्थ्यांची उत्कृष्ट युवा संसदरत्नम्हणून निवड करण्यात आली. यामध्ये पवन पाटील, असिया जमादार, अनमोल पाटील, श्रेया म्हापसेकर, प्रतीक्षा पाटील, सिमरन घाशी, ऋतिका धनगर, प्रतीक्षा कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये सात विद्यार्थिनींचा समावेश आहे.

संसदीय कार्य मंत्रालयामार्फत बक्षीस वितरण समारंभासाठी विद्यापीठातील समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह निवड झालेल्या आठ विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे निमंत्रित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्रालयाचे उपसचिव ए. बी. आचार्य यांनी यावेळी जाहीर केले. या राष्ट्रीय संसद स्पर्धेसाठीच्या संघ निवडीचा अंतिम निकाल कालांतराने जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये स्वच्छ भारत, कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण,नवीन शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरण, संरक्षण इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. या स्पर्धे निरीक्षक म्हणून केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए. बी. आचार्य, शिक्षणतज्ज्ञ प्रा. एस. बी. देओसकर उपस्थित होते. स्पर्धा झाल्यानंतर श्री. आचार्य यांनी निकाल जाहीर केला. "या स्पर्धेचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करणे इतकाच नसून युवकांमध्ये नेतृत्व कौशल्याचा विकास व्हावा, असा आहे," असे प्रतिपादन आचार्य यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा संसद स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ भारत'ची शपथ घेतली. राष्ट्रगीताने स्पर्धेची सांगता झाली.

Tuesday, 23 May 2023

शिवाजी विद्यापीठात साकारणार मत्स्यालय व जल-जैवविविधता केंद्र

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासमवेत सामंजस्य करार

 

कोल्हापूर, दि. 23 मे : दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासमवेत येथील शिवाजी विद्यापीठाचा अध्यापन, संशोधन विस्तार कार्यासाठी सामंजस्य करार झाला. या करारान्वये शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय आणि जल-जैवविविधता केंद्र साकार करण्यासाठी कृषी विद्यापीठासह त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांचेही सहकार्य लाभणार आहे.

शिवाजी विद्यापीठाने जलसाठ्यांसाठी प्रसिद्ध आहे, शिवाय, पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. पूरस्थितीमध्ये याच पाणवठ्यांमधून संपूर्ण शहरास पाणी पुरवठा करण्याचे कामही विद्यापीठाने केले. सदर जलस्रोतांमध्ये (विद्यापीठ परिसरातील तळी) विविध प्रकारचे मासे, जलचर यांचे संवर्धन करणे, ज्यायोगे ळ्यातील पाणी निसर्गत: स्वच्छ राहील आणि पाण्यामधील अन्नसाखळी समृद्ध होईल, या दृष्टीने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी लग्नित त्स्यविज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी यांचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यापीठास लाभणार आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात भव्य त्स्यालय जल-जैवविविधता केंद्र निर्माण करण्यासाठीही डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन लाभणार आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संशोधकांना औषधी वनस्पतींचे जैवरासायनिक पृथक्करण, औषधी वनस्पती तसेच जंगलात आढळणाऱ्या पण संख्येने कमी प्रमाणात असणाऱ्या वनस्पतींचे टिश्यू कल्चरद्वारे पुनरूज्जीवन करण्यासाठी सहकार्य मार्गदर्शन लाभणार आहे. भविष्यात दोन्ही विद्यापीठांच्या सहचर्याने विविध कार्यशाळा, व्याख्याने, चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी कृषी विद्यापीठ अकृषी विद्यापीठाध्ये होणारा हा सामंजस्य करार वेगळ्या स्वरुपाचा असून दोन्ही विद्यापीठातील सर्व घटकांच्या  संशोधनात्मक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

या सामंजस्य करारामुळे वन्यविज्ञान महाविद्यालय, दापोली औषधी वनस्पतींवर संशोधन करणाऱ्या कृषी विद्यापीठातील संशोधकांना शिवाजी विद्यापीठातील समृद्ध उपकरण कक्ष, प्रयोगशाळा संशोधकांच्या ज्ञानाचा लाभ होईल, असे मत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी ऑनलाईन उपस्थित राहून व्यक्त केले.

सदर सामंजस्य करार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्राणिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. आशिष देशमुख, डॉ. अधिकराव जाधव यांच्यासह अधिविभागातील सर्व शिक्षक, वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. भावे, मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. शिंगारे, वनशास्त्र महाविद्यालय दापोलीचे डॉ. अजय राणे आदी ऑनलाईन उपस्थित होते.

डॉ. भिलावे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आभार मानले.

देशाच्या शाश्वत विकासाचे तरुण ‘ग्रोथ इंजिन’: डॉ. प्रमोद पाटील

 सोळावी राष्ट्रीय युवा संसद शिवाजी विद्यापीठात उत्साहात



शिवाजी विद्यापीठात सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, प्रा. एस.बी. देओसकर, केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए.बी. आचार्य, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड.


कोल्हापूर, दि. २३ मे: तरुण हे राष्ट्रीय शाश्वत विकासाचे ग्रोथ इंजिन आहेत. त्यामुळे तरुणांनी मूल्याधिष्ठित जाणीवा मनाशी बाळगून राष्ट्रविकासाच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आज सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेस निरीक्षक म्हणून केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए.बी. आचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. एस.बी. देओसकर उपस्थित होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड मंचावर होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, राष्ट्रीय युवा संसद उपक्रमाच्या माध्यमातून सांविधानिक लोकशाहीची मूल्ये युवा पिढीमध्ये रुजविण्याच्या दिशेने केंद्रीय मंत्रालय अतिशय सकारात्मक प्रयत्न करीत आहे. हा उपक्रम देशभरातील विद्यापीठांमध्ये राबविला जातो. यामुळे युवा पिढीच्या व्यक्तीमत्त्वाला नवे आयाम प्राप्त होतात, तसेच त्यांचे भवितव्यही मूल्याग्रही बनते. या माध्यमातून भारताची विविधतेमधील एकता आणि बहुसांस्कृतिकतेमधील एकात्मताही युवकांच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये रुजतात. यातून भारताचा चांगला नागरिक म्हणून त्यांचे व्यक्तीमत्त्व विकसित होते. असा युवक हा देशाच्या शाश्वत विकासासाठी कार्य करण्यास कटिबद्ध असतो. देशातील सामाजिक समस्या सोडविण्याचा प्राधान्यक्रम त्याच्याकडून आखला जाणे या ठिकाणी अभिप्रेत असते. त्यातच आता आपण जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहोत. या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ घेण्यासाठी आपण सातत्याने कार्यप्रवण राहण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. यंदा आपण स्वच्छ भारत ही संकल्पना घेऊन हा उपक्रम साजरा करीत आहोत, तेव्हा केवळ भौतिक स्वच्छता करणे, यातून अभिप्रेत नसून स्वच्छतेचा संस्कार जनमानसात रुजणे आणि लोकांची परस्परांबद्दलची मनेही स्वच्छ व पारदर्शक होणे नितांत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर युवा संसदेमध्ये सुमारे एक तासभर विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारतशपथ घेतली. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत, प्रास्ताविक केले, तर डॉ. संतोष सुतार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Monday, 22 May 2023

शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर, दि.22 मे - महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.



कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार,राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.तानाजी चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, सर्वश्री सुरेश बंडगर, मधुकर पाटील, राजेंद्र जाधव, सौरभ पवार, महेश नायकवडी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

----

Saturday, 20 May 2023

क्रांतीवन परिसराच्या सुशोभीकरणास प्रारंभ

 

शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन परिसराच्या सुशोभीकरण कामास प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर.


कोल्हापूर, दि. २० मे: शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन परिसराचे सुशोभीकरण क्रांतिदिनापर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केली.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रमांक आठ प्रवेशद्वारासमोरील भागात क्रांतीवन परिसर आहे. या ठिकाणी हुतात्मा स्मारक तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा आणि सोलापूर (सन २००३ पर्यंत) जिल्ह्यांतील शहीदांचे स्मृतीफलक आहेत. या क्रांतीवन परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामास शुक्रवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

क्रांतीवनामध्ये आता पेव्हिंग ब्लॉक बसविलेला वॉकिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे. मार्गावर ठिकठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात येणार असून ठिकठिकाणी लॉन निर्मिती, जलसाठे, सौरदिवे, बाजूने बोगणवेलीचे कुंपण अशी आखणी करण्यात आली आहे. उद्यानामध्ये आधीपासूनच चाफा, आवळा, वड, चिंत, शिरीष अशी झाडे आहेत. त्यामध्ये त्या प्रजातींसह सोनचाफा, कांचन, जांभूळ आदी झाडांची रोपे लावण्यात येणार आहेत. उद्यान अधिकाधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारची फुलझाडे वगैरे लावण्यात येतील. सध्या शहीदांचे स्मृतीफलक एकत्रित उभे केले आहेत. ते उद्यानामध्ये ठिकठिकाणी नव्याने उभारण्यात येतील. त्यांच्या नावांवर २४ तास प्रकाशझोत राहील, याची सौरदिव्यांच्या सहाय्याने व्यवस्था करण्यात येईल. येथे फिरावयास येणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास प्रसन्न वाटावे आणि विद्यार्थ्यांच्याही मनात शहीदांप्रती कृतज्ञभाव निर्माण व्हावा, या दृष्टीने या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा मानस असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. कैलास सोनवणे, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजित यादव, महेश साळुंखे, सहाय्यक कुलसचिव अमित कांबळे, एस.जे. पाटील, जी.बी. मस्ती, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव, एस.एस. साळुंखे यांच्यासह अभियांत्रिकी व उद्यान विभागाचे सहकारी उपस्थित होते.

क्रांतीवनाची पूर्वपिठिका

कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम नाशिक येथे झाला. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे उपस्थित होते. त्या प्रसंगी कुसुमाग्रजांनी, प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या त्या परिक्षेत्रातील शहीदांची नावे असणारे एक स्मृतीस्थळ विकसित करण्याची सूचना केली होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्यसैनिकांच्या तसेच युद्धात शहीद झालेल्या आपल्या भागातील सैनिकांच्या स्मृती जाग्या राहतील आणि त्यांनाही देशकार्यासाठी त्या प्रेरित करीत राहतील, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या सूचनेनुसार सन २०००मध्ये शिवाजी विद्यापीठात क्रांतीवनाची निर्मिती करण्यात आली. कुसुमाग्रजांची अनाम वीरा... या कवितेचा फलक स्मृतीस्थळी उभारण्यात आला आहे. आता विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व उद्यान विभागाच्या वतीने या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.