Friday, 2 August 2024

'मराठी साहित्यात भाकरीचा हुंदका समजलेला कवी अण्णा भाऊ साठे'

शिवाजी विद्यापीठात रंगले 'कविता प्रबोधनाची' निमंत्रितांचे संमेलन

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभागी कवी (डावीकडून) मंदार पाटील, विनोद कांबळे, रमजान मुल्ला, आबा पाटील, चंद्रशेखर कांबळे, लता ऐवळे आणि प्रकाश नाईक. 


कोल्हापूर, दि. २ ऑगस्ट: मराठी साहित्य क्षेत्रात खऱ्या अर्थाने भाकरीचा हुंदका समजलेला कवी म्हणजे अण्णा भाऊ साठे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात रंगलेल्या बहारदार निमंत्रितांच्या काव्यसंमेलनामध्ये कवितेच्या माध्यमातून बरसला.

विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने 'कविता प्रबोधनाची' या विषयावर आज निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वि.स. खांडेकर भाषा भवन व इतिहास अधिविभागातील विद्यार्थी आणि काव्यरसिक यावेळी उपस्थित होते.

अण्णा भाऊ साठे यांच्या प्रबोधन परंपरेची साक्ष देणाऱ्या आणि समकालीन सामाजिक जीवनावर भाष्य करणार्‍या कविता आजच्या संमेलनात सादर करण्यात आल्या. मंगसुळीचे कवी आबा पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर चंद्रशेखर कांबळे (राधानगरी), रमजान मुल्ला (नागठाणे), विनोद कांबळे (तिसंगी), लता ऐवळे(अंकलखोप), प्रकाश नाईक (सरुड) व मंदार पाटील (कोल्हापूर) या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

 कवी आबा पाटील यांनी मोनालिसाचं गूढ स्मित आणि श्रमिकांच्या हाताची सांगड घालणारी सुंदर कविता सादर केली.

माझ्या भाकरीचा शोध संपेपर्यंत 

अशीच हसत रहा मोनालिसा 

तुला हसताना पाहून मला बरं वाटतं 

तुझं हसणं मला भाकरीइतकं सुंदर वाटतं 

पण तूर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळले तुझे गाल तर दृष्टावशील 

आणि विनाकारण तुला शेणामातीचं इन्फेक्शन नको व्हायला 

जरा धीर धर मोनालिसा मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गूढ

 

शेणाला गेलेल्या पोरी लिहीणारे प्रख्यात कवी चंद्रशेखर कांबळे यांनी समकाळावर भाष्य करताना मानवतेचे महत्त्व अधोरेखित करणारी कविता सादर केली.

हिंदू आहे म्हणून हिरव्या पिकांनी नाकारलं नाही हिंदूंना अन्नद्रव्याचे मूलभूत घटक 

रक्ताने कधीच केला नाही उठाव मुसलमानाच्या अंगातून फिरताना 

ऊन सावली पाऊस देताना आभाळानेही घातली नाही आरक्षणाची अट 

माणसांच्या हत्येची सुपारी घेताना 

रंगांवर कुणाचं तरी दडपण आहे बरं का...

 

कवी प्रकाश नाईक यांनी अण्णा भाऊ साठे यांचे संत परंपरेच्या विद्रोहाशी असणारे नाते उलगडून दाखविणारी कविता सादर केली.

'तुझ्या रे शब्दांत मला दिसे ओवी पसायदान हे समतेचे 

तुकयाचे नाव केलेस तू सार्थ, नाठाळाचा माथा सडकला

संतांच्या मेळ्यात दिसतो शोभून अण्णाला वारसा मानियेला'

 

प्रख्यात कवी रमजान मुल्ला यांनीही मानवतावादाचे सर्वसमावेशी तत्त्वज्ञान आपल्या कवितेतून मांडले.

मी नाकारत नाही अस्तित्त्व अल्लाहचे 

तरीही त्यांना वाटतं मी दररोज पाच वेळा नमाज अदा करावे. 

सुन्नीं असो वा असो कुणी शिया

पण कुठंतरीच रूजल्या चांगल्या बिया

या अल्ला अशा अनेक बीचे झाड होऊ दे

त्या झाडाच्या सावलीत इथल्या इन्सानियतचा चेहरा घडू दे.

 

कवयित्री लता ऐवळे यांनी मायबापाच्या मायेचे हृदयस्पर्शी वर्णन करणारी कविता सादर करून उपस्थितांना हेलावून सोडले.

माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा 

आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा 

बाप कष्टला झुंजला माय मातीमय झाली 

तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली 

तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण 

नाही तुटायचे असे वेड्या मायेचे बंधन'

 

युवा कवी मंदार पाटील तथा चैत्र यांनी शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करणारी कविता सादर केली.

'या देशातील सत्ता नीतिमत्ता गेली पार लयाला,

लाविली विखारी नखे कुणी आमच्या लोकशाहीला

शेतकरी रोज नागवा केला जातो शेतात 

बेईमान व्यापाऱ्यांचा गंध त्याच्या प्रेतास

 

प्रसिद्ध कवी विनोद कांबळे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

ठाऊक नव्हते तेव्हाचं माहित करून दिले.

पुस्तकांचे महत्त्व परिस्थितीने

कळत गेले जसे तसे वाचत गेलो

स्वतःला पुस्तकात शोधत राहिलो.’

 

या कविसंमेलनाचे प्रास्ताविक प्रा. रणधीर शिंदे यांनी केले. सहभागी कवींचे स्वागत कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कांबळे यांनी केले. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे तसेच, विष्णु पावले, सुधीर कदम, शाहीर रणजित कांबळे, राजवैभव शोभा रामचंद्र, उमेश सुतार आदी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment