Thursday, 29 August 2024

खाशाबा जाधव यांचा आदर्श घेऊन क्रीडापटूंनी वाटचाल करावी: रणजीत जाधव

 विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याला समर्पित दोनदिवसीय प्रदर्शनास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व रणजीत खाशाबा जाधव. सोबत (डावीकडून) डॉ. राजेंद्र रायकर, शरद बनसोडे, रामचंद्र पवार, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. तानाजी चौगुले, दौलत इंगवले, डॉ. विलास शिंदे, डॉ. रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर व डॉ. प्रकाश गायकवाड.

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे.

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ वस्तू व दस्तावेज 

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनामध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये परिधान केलेला पोषाख पाहताना मान्यवर. 

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शन पाहताना शालेय विद्यार्थी. 

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शन पाहताना महाविद्यालयीन विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: जाज्ज्वल्य देशप्रेम, उत्तुंग इच्छाशक्ती आणि उच्च नैतिक मूल्यांची जोपासना या त्रिसूत्रीची जोपासना करीत देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी आयुष्य व्यतित केले. उदयोन्मुख क्रीडापटूंनी त्यांचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन त्यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याला समर्पित दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. जाधव म्हणाले, आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांच्या गेल्या १२८ वर्षांच्या इतिहासात चीनने ७००हून अधिक, अमेरिकेने १३०० हून अधिक तर युरोपियन व आफ्रिकन देशांनीही मोठ्या संख्येने ऑलिंपिक पदके मिळविली आहेत. जगातील २५ टक्के लोकसंख्या असणाऱ्या भारताने मात्र या काळात ४८ पदके मिळविली असून त्यातही वैयक्तिक पदके अवघी २३ आहेत. ही खूप मोठी पोकळी आहे. व्यवस्थाप्रणित काही त्रुटी असल्या तरी खेळाडूंनी पूर्ण ध्येयनिष्ठेने आणि नितिमानतेने आपल्या नैपुण्याचा कस लावून पदके मिळविण्यासाठी सज्ज व्हायला हवे.

विद्यापीठाच्या कुस्ती संकुलातील पहिला उपक्रम हा खाशाबा जाधव यांच्याशी निगडित असल्याचा मोठा अभिमान वाटत असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, खाशाबा जाधव यांच्या कुटुंबियांनी सदर प्रदर्शन भरविण्याच्या अनुषंगाने विद्यापीठावर विश्वास टाकला, ही मोठी बाब आहे. या दुर्मिळ दस्तावेजांचे डिजीटायझेशन वगैरे प्रकारे जतन व संवर्धन करण्याच्या कामी विद्यापीठ सहकार्यासाठी सदैव तत्पर राहील. विद्यापीठाने यापूर्वीच मिशन ऑलिंपिकची घोषणा करून क्रीडापटूंना पाठबळ दिले आहे. विद्यापीठाच्या प्रत्येक खेळाडूने आपापले लक्ष्य निर्धारित करून त्याचा हिरीरीने पाठपुरावा करावा. खेळण्याबरोबरच क्रीडाविषयक ज्ञान वाढविण्याकडेही लक्ष देणे अभिप्रेत आहे.

या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह दौलत इंगवले, शामराव जाधव, प्रियांका जाधव, डॉ. राजेंद्र रायकर आदी उपस्थित होते. क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुचय खोपडे यांच्यासह क्रीडा अधिविभागाच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

यावेळी सुरवातीला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

खाशाबा जाधव यांच्या दुर्मिळ आठवणींचा संग्रह

या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के व श्री. जाधव यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक व आशियाई स्पर्धांसह विविध स्पर्धांत जिंकलेली पदके, चषके, स्मृतिचिन्हे, ऑलिंपिक स्पर्धेमध्ये घातलेला ब्लेझर व पोषाख,  पोलीस सेवेतील कॅप्स, वेपन, हॉकी स्टीक, दुर्मिळ छायाचित्रे, हस्तलिखित पत्रे, त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेख, बातम्या इत्यादी बाबी मांडण्यात आल्या आहेत. जाधव कुटुंबियांनी प्रथमच अशा प्रकारे खाशाबा जाधव यांच्याशी निगडित अमूल्य व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली.

No comments:

Post a Comment