कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या
प्रस्तावित लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी भौतिकशास्त्र अधिविभागाचे निवृत्त
प्राध्यापक डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी आपल्या ८०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६ लाख
५० हजार रुपयांचा निधी देणगीदाखल दिला.
शिवाजी
विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या
निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हे वसतिगृह लोकांच्या
सहभागातून उभारावे आणि त्यातून लोकांच्या स्मृती जतन केल्या जाव्यात, अशा हेतूने
विद्यापीठाने या वसतिगृहाची संकल्पना मांडली. लोकांनी आपले कुटुंब, आप्तस्वकीय
यांमधील प्रिय व्यक्तीच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावयाचा आणि त्या
व्यक्तीच्या नावे निवासी खोल्यांची उभारणी करावयाची, अशी ही संकल्पना आहे.
या वसतिगृहाचे महत्त्व लक्षात घेऊन दातृत्वाचा ओघ विद्यापीठाकडे सुरू आहे. डॉ.
मुरलीधर डोंगरे यांनीही उदात्त भावनेतून आपल्या ८०व्या वाढदिवसानिमित्त
विद्यापीठास ६ लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे. डॉ. डोंगरे यांच्या वतीने
त्यांच्या पत्नी व वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निवृत्त प्राध्यापक डॉ. मीना
डोंगरे यांनी काल सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यांच्याकडे देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांच्यासह डॉ. सचिन पवार, डॉ.
प्रशांत चिकोडे, डॉ. विजय कोठावळे, डॉ. चिदानंद कनमाडी, डॉ. ऐश्वर्या
पवार, डॉ. तुषार घाटगे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment