Thursday, 8 August 2024

शिवाजी विद्यापीठाचे सेट परीक्षेत घवघवीत यश

 पदार्थविज्ञान अधिविभागाचे सर्वाधिक २९ विद्यार्थी उत्तीर्ण



कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: एप्रिल-२०२४मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तथा सेट परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून पदार्थविज्ञान अधिविभागाचे सर्वाधिक २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महत्त्वाची असलेली महाराष्ट्र- राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एम.एच.-सेट) ७ एप्रिल २०२४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आली. या परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश मिळविले. पदार्थविज्ञान अधिविभागाखालोखाल गणित अधिविभागाचे २७ आणि संख्याशास्त्र अधिविभागाचे २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याखालोखाल शिक्षणशास्त्र अधिविभागाचे १०, सूक्ष्मजीवशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रत्येकी ८, रसायनशास्त्र अधिविभागाचे ७, इलेक्ट्रॉनिक्सचे ६, पर्यावरणशास्त्र व इतिहासाचे प्रत्येकी ५, समाजकार्य विषयाचे ३, समाजशास्त्र, जीवरसायनशास्त्र आणि वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागांचे प्रत्येकी २ तर जैवतंत्रज्ञान व मानसशास्त्राचे प्रत्येकी १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यंदा दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनीही सेट परीक्षेत उत्तम यश मिळविले आहे. या केंद्राचे एकूण १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये अर्थशास्त्राचे ५, राज्यशास्त्राचे ४, समाजशास्त्राचे ३ आणि इतिहासाचे २ विद्यार्थी आहेत.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींसह त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिविभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment