विद्यापीठात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना बेंगलोरचे प्राध्यापक डॉ. शिरीष शेवडे. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. शशीभूषण महाडिक. |
कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या झंझावातामध्ये मानवाच्या खऱ्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास होत जाणे
चिंताजनक आहे, असे प्रतिपादन बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे
प्राध्यापक डॉ. शिरीष शेवडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र
अधिविभागामध्ये नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या केंद्राचे उद्घाटन
डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात ‘ए.आय. ते जेन-ए.आय.: संधी आणि आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते,
तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. शेवडे म्हणाले, तंत्रज्ञानावर विसंबून
राहण्याचे प्रमाण सार्वत्रिकरित्या वाढले आहे. हे खूप धोकादायक आहे. तंत्रज्ञान हे
मानवी बुद्धीला सहाय्यभूत स्वरुपाचे आहे, त्याला तसेच राहू द्यावे.
तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे योग्य नाही. चॅटजीपीटीसारखे जनरेटिव्ह ए.आय. अनेकदा
आपल्याला चुकीची माहिती पुरविते आणि त्या माहितीचे समर्थनही करते. वापरकर्त्याला
जर ही माहिती चुकीची असल्याचे ठाऊक नसेल, तर पुन्हा दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे ही
सर्व माध्यमे अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारपूर्वक वापरावीत. सृजनशीलता हा यामधील
अत्यंत कळीचा मुद्दा आहे.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध साधनांचे आपण केवळ वापरकर्ते बनून न राहता
सर्जक निर्माते बनणे आवश्यक आहे. या सर्व बाबी इतक्या गतीने बदलत आहेत की
विद्यार्थ्यांना, वापरकर्त्यांना त्या गतीनुसार अगदी दररोज बदलावे लागेल. त्यासाठी
सातत्याने नवनवीन बाबी शिकत राहणे आणि विश्लेषणाची सवय लावून घेणे फार महत्त्वाचे
आहे. समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी या
नवतंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.
शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुकुमार राजगुरू यांनी आभार
मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. आर.एन. रट्टीहाळी, अधिष्ठाता डॉ.
श्रीकृष्ण महाजन, डॉ. सरिता ठकार, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ.
सागर डेळेकर, डॉ. कविता ओझा, डॉ. सोमनाथ पवार यांच्यासह शिक्षक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment