पणदुरकर दाम्पत्याने शिवाजी विद्यापीठास दिले एकूण रू.60 लाख
कोल्हापूर, दि.19 ऑगस्ट - शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त भूगोल अधिविभागप्रमुख व ज्येष्ठ कायदा अभ्यासक डॉ.ॲड.राम पणदुरकर व पत्नी सौ. हेमकिरण यांनी त्यांची स्वर्गीय कन्या, एकमेव अपत्य, कै.डॉ.ॲड.रूपाली पणदुरकर यांच्या स्मरणार्थ कमवा व शिका महिला वसतिगृहातील अभ्यासिकेसाठी रू.35 लाख देणगी गतवर्षी कन्येच्या पुण्यतिथी दिनी दिली होती.त्या देणगीमधून अभ्यासिकेचा तळ मजला पूर्ण झाला आहे.सदर धनादेश देताना सौ.पणदुरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांना आणखीही देणगी देण्याचे वचन दिले होते.आता, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने पहिला मजला विस्तारीकरण करण्याचे ठरविले असल्याने पणदुरकर पती-पत्नींनी त्यासाठी अधिक रू.25 लाखाचे धनादेश आज कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांचेकडे सुपूर्द केले.याप्रसंगी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, डॉ.संभाजी शिंदे उपस्थित होते.
पणदुरकर दाम्पत्यांच्या अर्थसहाय्यामुळे अभ्यासिकेची संपूर्ण इमारत लवकर पूर्ण होईल. दिलेले वचन, मुलीच्या स्मृतीसाठी धडपड व गरीब मुलींच्या शिक्षणातून त्या मुलींच्या डोळयात कै.रूपालीचे 'रूप' पाहाणे, या ध्येयाने प्रेरीत झालेल्या पणदुरकर दाम्पत्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.येत्या पुण्यतिथी पर्यंत सदर अभ्यासिकेचे उद्धाटन करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.'शिकणाऱ्या नातींसाठी' नारळी पोर्णिमा व रक्षाबंधन या शुभदिनी आजी-आजोबांकडून अभ्यासिकेच्या स्वरूपात सप्रेम भेट देत असून मुलींनी या अभ्यासिकेत शिकून खूप मोठे व्हावे, विद्यापीठाचे नांव लौकीक करावे, अशी भावना या दांम्पत्यांने व्यक्त केली.
----------
No comments:
Post a Comment