शिवाजी विद्यापीठाच्या संगणक केंद्राची महत्त्वपूर्ण कामगिरी
शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन सुविधा पोर्टलचे विविध स्क्रीनशॉट्स |
कोल्हापूर, दि. ७ ऑगस्ट: विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध
शैक्षणिक दस्तावेजांची उपलब्धता करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने नवीन ऑनलाईन
पोर्टलची निर्मिती केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता केवळ तेवढ्यासाठी
विद्यार्थी सुविधा केंद्राकडे प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता उरणार नाही. ही
माहिती संगणक केंद्राचे प्रभारी संचालक अभिजीत रेडेकर यांनी दिली आहे.
कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांच्या निर्देशानुसार अभिजीत रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यापीठाचे संगणक केंद्र आणि परीक्षा विभागाकडील आयटी कक्ष यांनी संयुक्तपणे काम
करून ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना आवश्यक
असणारे पदवी प्रमाणपत्र, तात्पुरते
पदवी प्रमाणपत्र, दुबार गुणतक्ता, उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र, रॅंक प्रमाणपत्र, गुणवत्ता
प्रमाणपत्र आणि विशेष प्रमाणपत्र अशी सात प्रकारची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची
ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत सदर सेवांसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी
सुविधा केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन त्यासंबंधीचे अर्ज व पैसे भरावे लागत असत. या
ऑनलाईन पोर्टलमुळे उपरोक्त सात सेवांसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची
आवश्यकता भासणार नाही.
या पोर्टलद्वारेच विद्यार्थ्यांना सदर
दस्ताऐवजांसाठीचा अर्ज आणि पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन
२००५ पासून पुढे उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा पर्मनंट रजिस्ट्रेशन
क्रमांक (पी.आर.एन.) आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष इतक्या माहितीवर ऑनलाईन लॉगीन
करता येऊ शकेल. सन २००५ पूर्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मॅन्युअल फॉर्म भरावा
लागणार असून तोही येथे उपलब्ध आहे. या मागील विद्यार्थ्यांच्या माहितीचा समावेश
करण्याची प्रक्रियाही प्रगतीपथावर आहे.
सदर प्रणालीचे प्रमुख वैशिष्ट्य असे की, विद्यार्थ्यांना एकाच लॉगिनमधून सर्व दस्तावेजांकरिता
अर्ज करण्याची तसेच, त्या सर्वांसाठी एकत्र ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देण्यात
आलेली आहे. सदर प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. सदर
प्रणालीमध्ये Sukapps.unishivaji.ac.in/sfcapp/#/login या लिंकद्वारे प्रविष्ट होता येते. सदर प्रणाली तयार करण्यासाठी
आशिष घाटे, शशिकांत हुक्केरी, विजय पाटील आणि सागर आंबेकर यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे.
या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय
होणार असल्याने संगणक केंद्रातील सर्व सहकारी अभिनंदनास पात्र असल्याची
प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह
जाधव आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनीही श्री. रेडेकर यांच्यासह
सर्वांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment