![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विविध स्पर्धांत यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठाचा युवा चित्रकार आदित्य घडशी याने कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे उत्स्फूर्तपणे काढलेले व्यंगचित्र त्यांना या समारंभात भेट दिले. |
विद्यार्थी विकास विभागामार्फत विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा
सत्कार
कोल्हापूर, दि. १७ जुलै: विद्यार्थ्यांनी समर्पितपणे आणि नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास त्यांना निश्चित यश प्राप्त होते, हे विद्यापीठाच्या संघाने विविध स्पर्धांतील घवघवीत यशातून सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघात सहभागी होऊन युवा महोत्सव, राष्ट्रीय कव्वाली, आविष्कार, अन्वेषण स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आज झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, युवा महोत्सव, राष्ट्रीय कव्वाली, आविष्कार, अन्वेषण स्पर्धेमध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साहवर्धक आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले हे यश निश्चित उल्लेखनीय व वाखाण्याजोगे आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा लौकिक उंचावला आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्ये, सामर्थ्य, ऊर्जा आणि उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणासह अन्य सुविधा वाढविण्याबाबत निश्चित विचार केला जाईल.
सुरूवातीला प्रातिनिधिक स्वरूपात निवडक कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये लोककला वाद्यवृंदासह रूची पटेल (भरतनाटयम्), सुमंत कुलकर्णी आणि सहकारी (पांडुरंगांचे अभंग), रवीराज भिसे (मिमिक्री), ऋषीकेश देशमाने, सुमंत कुलकर्णी आणि सहकारी (कव्वाली), वैष्णवी पोतदार (वक्तृत्व) यांनी सादरीकरण केले. याप्रसंगी, युवा चित्रकार आदित्य घडशी यांनी उत्स्फूर्तपणे कुलगुरू डॉ.राजनीश कामत यांचे व्यंगचित्र काढले. ते
त्यांना भेट देण्यात आले.
तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांत पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना १६० पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी सहभागी विद्यार्थी शुभम गिरीगोसावी, संघ व्यवस्थापक डॉ. प्रमोद कसबे, वैजयंता पाटील, विद्यार्थी मार्गदर्शक शंतनू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिराळा येथील विश्वासराव नाईक महाविद्यालयाचे डॉ.प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ.आर.एच. अतिग्रे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment