![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना किशोर बेडकीहाळ. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. विलास शिंदे, डॉ. सरोज शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना किशोर बेडकीहाळ. |
कोल्हापूर, दि.
१५ जुलै: डॉ.
एन.डी. पाटील म्हणजे राजकारणातील नैतिकता आणि सामाजिक न्यायाचा ध्यास होते.
त्यांच्या प्रत्येक चळवळीला, आंदोलनाला त्यांच्या उच्च नैतिकतेचे अधिष्ठान लाभलेले
होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी आज येथे केले.
ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील
यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात ‘डॉ.
एन.डी. पाटील आणि सामाजिक चळवळी’ या
विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. बेडकीहाळ यांनी डॉ. पाटील यांच्या
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींचा
सर्वांगीण आढावा घेतला. विद्यापीठाच्या डॉ. एन.डी. पाटील लोकचळवळ अध्यासनाच्या
वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर
डॉ. सरोज (माई) पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी बहुजन व शोषितकेंद्री राजकारण, श्रमिककेंद्री
अर्थकारण आणि सामाजिक न्यायकेंद्री समाजकारण हा डॉ. पाटील यांच्या संपूर्ण राजकीय
आणि सामाजिक चळवळीचा गाभा असल्याचे सांगून श्री. बेडकीहाळ म्हणाले, डॉ.
एन. डी. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व विचार आणि आचार यांचा दुर्मीळ संगम होते.
राजकारणातील नैतिकता आणि नैतिकतेचे राजकारण यांचे अद्वैत त्यांनी आयुष्यभर जपले.
सार्वजनिक जीवनात वैयक्तिक स्वार्थाला कधीही स्थान न देता पारदर्शक, मूल्यनिष्ठ
आणि संघर्षशील नेतृत्व त्यांनी उभे केले. शेतकरी, शेतमजूर, कामगार, धरणग्रस्त, वंचित
आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना त्यांनी आयुष्यभर प्राधान्य दिले. संयुक्त
महाराष्ट्र चळवळ, दुष्काळग्रस्तांचे आंदोलन, शेतमालाला
योग्य भाव, रोजगार हमी, नामांतर
चळवळ, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचा हक्क अशा विविध
प्रश्नांवर त्यांनी सातत्याने संघर्ष उभारला.
डॉ. पाटील यांच्या आंदोलनांची
वैशिष्ट्ये स्पष्ट करताना बेडकीहाळ यांनी सांगितले की, प्रत्येक
आंदोलनामागे सखोल अभ्यास, प्रश्नांची नैतिकता, योग्य
वेळ आणि शांततामय संघर्षाची भूमिका असे चार महत्त्वाचे आधारस्तंभ असत. आंदोलन
करतानाही संवादाचे दरवाजे कायम खुले ठेवण्याची त्यांची भूमिका होती. गांधीवादी
अहिंसा आणि समाजवादी विचार यांचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीत स्पष्टपणे दिसून
येत होता.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा
उल्लेख करताना बेडकीहाळ म्हणाले, शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, आर्थिक
परिस्थिती त्यासाठी अडथळा ठरू नये, ही
त्यांची ठाम भूमिका होती. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये
तसेच गुणवत्तापूर्ण आणि न्याय्य शिक्षणव्यवस्था उभी राहावी, यासाठी त्यांनी
सातत्याने प्रयत्न केले.
अध्यक्षीय समारोपात कुलसचिव डॉ. विलास
शिंदे यांनी डॉ. एन. डी. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व हे सखोल अध्ययन, चिंतन
आणि मूल्याधिष्ठित कृतीतून घडल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही
प्रश्नावर भूमिका घेण्यापूर्वी त्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याची वृत्ती
अंगीकारावी, हाच डॉ. पाटील यांच्या जीवनातून
घेण्यासारखा मोठा संदेश असल्याचे त्यांनी नमूद केले. महापुरुषांचे अंधानुकरण न
करता त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम घडवावे, असे
आवाहन त्यांनी केले. तसेच, डॉ. सरोज (माई) पाटील यांनी डॉ. एन. डी. पाटील यांच्या
सहजीवनातील आठवणी पुस्तक स्वरूपात जतन करून पुढील पिढीसमोर आणाव्यात, अशी
अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. सरोज पाटील यांनीही डॉ.
एन.डी. पाटील यांच्यासोबतच्या आपल्या सहजीवनातील आठवणींना उजाळा दिला. एन.डी.
पाटील यांना लोक वादळ समजत आणि या वादळासमवेत मी संसार केला, याबद्दल माझे कौतुक
करतात. तथापि, एन.डी. सर हे वादळ नव्हेत, तर समाजाच्या वेदनांवर हळुवार फुंकर
घालणारी सुखद वाऱ्याची झुळुक होते. त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या उच्च नीतिमानतेचा
आम्हा सर्वच कुटुंबियांना नेहमीच अभिमान राहिला, असे त्यांनी सांगितले.
अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला.
प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला
डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. अवनीश पाटील, डॉ.
प्रभंजन माने, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. अक्षय सरवदे, दिनकर झिंबरे, एम.बी. शेख,
अभिषेक मिठारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. एन.डी. पाटील यांच्यावरील पोवाडा सादर करताना शाहीर रंगराव पाटील
डॉ.
एन.डी. पाटील यांच्यावर पोवाडा
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. एन.डी. पाटील यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारा अतिशय स्फूर्तीदायक पोवाडा शाहीर रंगराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मोठी वाहवा मिळविली.


No comments:
Post a Comment