कोल्हापूर, दि. ६ जुलै: संत गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज त्यांना प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत,
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अंतर्गत
गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक
डॉ. सावलीराम घाणे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर
यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी
उपस्थित होते.
संत श्री गुलाबराव
महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती...
संत
श्री गुलाबराव महाराज (दि. ६ जुलै १८८१
- २० सप्टेंबर १९१५)
संत शिरोमणी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांचा जन्म ६ जुलै १८८१ रोजी अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथे गोंदुजी व अलोकाबाई मोहोड यांच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव गुलाब गोंदुजी मोहोड असे होते. वयाच्या अवघ्या नऊ महिन्यांत त्यांना अंधत्व आले, परंतु असामान्य बुद्धिमत्ता, आध्यात्मिक चिंतन व विलक्षण स्मरणशक्तीच्या बळावर त्यांनी ज्ञानाचे अद्वितीय शिखर गाठले. त्यांचे बालपण माधान येथे व्यतीत झाले असून हे गाव त्यांच्या कार्यामुळे पावन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
अल्पायुषी असूनही त्यांनी अध्यात्म, तत्त्वज्ञान, भक्ती, वेदान्त
व साहित्य या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी सुमारे १३४ ग्रंथ, २०९९
अभंग, २२५२ पदे, १२५०
गीते, १००० लोक व २३,०००
ओव्या अशी अमूल्य साहित्यसंपदा निर्माण केली. त्यांचे लेखन संस्कृत, मराठी, हिंदी, ब्रजभाषा
व वऱ्हाडी भाषेत उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा
प्रचार-प्रसार करणारे आणि माधुर्यभक्तीचे महान उपासक म्हणून त्यांना विशेष मान्यता
मिळाली. भारत सरकारने सन २०१९ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित
केले. २० सप्टेंबर १९१५ रोजी पुणे येथे त्यांचे निर्वाण झाले.


No comments:
Post a Comment