Friday, 24 July 2026

गोविंदराव टेंबे महाराष्‍ट्राचे उपेक्षित साहित्यिक: सुधीर पोटे

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ गायक सुधीर पोटे


कोल्हापूर, दि. २४ जुलै: गोविंदराव टेंबे हे महाराष्‍ट्राचे उपेक्षित साहित्यिकआहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक व संगीततज्ज्ञ सुधीर पोटे यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्‍या मराठी अधिविभागात गोविंदराव टेंबे कार्यकर्तृत्‍व या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे होते.

सुधीर पोटे म्‍हणाले की, गोविंदराव टेंबे यांनी मराठीत पहिल्‍यांदा लक्षण गीतांची निर्मिती केली. तसेच त्‍यांनी स्‍वतंत्र स्‍वररागदारी निर्माण केल्‍या. भारतीय सांगितिक परंपरेत टेंबे यांचे मोलाचे योगदान आहे. ही गीते आणि रागदारीच्या माध्यमातून त्यांनी संगीताबरोबरच साहित्यसेवाही केली आहे. त्याची अपेक्षित दखल घेण्यात आली नाही. टेंबे यांच्या या योगदानाचा नव्याने अभ्यास करण्याची आवश्यकता असल्‍याचे पोटे यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणधीर शिंदे म्‍हणाले, कोल्‍हापूरचा सांगितिक-सांस्‍कृतिक दस्‍तऐवज म्‍हणून गोविंदराव टेंबे यांच्‍या कार्याकडे, योगदानाकडे पाहायला हवे. कोल्‍हापूरच्‍या कलाक्षेत्राची ओळख गोविंदराव टेंबे यांनी सर्वदूर पसरवली. त्याविषयीही आपण कृतज्ञ असायला हवे. त्यांच्या योगदानाची दखल नव्या पिढीने घ्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. सुखदेव एकल यांनी प्रा‍स्‍ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मराठी अधिविभागातील संशोधक विद्यार्थी आणि एम. ए. चे विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment