![]() |
| शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. कृष्णा पाटील, विनय शिंदे आणि दिलीप मोहाडीकर. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित उद्बोधन वर्गात डॉ. आलोक जत्राटकर यांचे स्वागत करताना विनय शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. कृष्णा पाटील व दिलीप मोहाडीकर. |
कोल्हापूर, दि. ६ जुलै: प्रशासकीय
कामकाजात प्रभावी संवाद कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ज्या संस्थेमध्ये
कार्यरत आहोत, त्या संस्थेची उद्दिष्टे, कार्यपद्धती, नियम आणि विविध उपक्रमांची अचूक माहिती प्रत्येक
कर्मचाऱ्याला असणे आवश्यक आहे. विद्यार्थी,पालक आणि अभ्यागतांशी
सकारात्मक व परिणामकारक संवाद साधण्याची क्षमता ही प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली
आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक
जत्राटकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व
ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने समूह जनजागृती कार्यक्रम (Community Awareness Programme) या अंतर्गत विद्यापीठातील हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी 'प्रशासकीय साक्षरता आणि
जीवन कौशल्ये' या विषयावरील उद्बोधन वर्गाचे आयोजन मानव्यविद्या सभागृहात शनिवारी (दि.
४) करण्यात आले होते. यावेळी 'शिवाजी विद्यापीठ आणि संवाद कौशल्य' या विषयावर डॉ. जत्राटकर
मार्गदर्शन करीत होते. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक डॉ.
कृष्णा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. जत्राटकर म्हणाले की, कोणत्याही कार्यालयाची
सकारात्मक प्रतिमा घडविण्यात तेथील कर्मचाऱ्यांचा संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो.
प्रशासकीय प्रक्रियेची माहिती, कायद्याचे प्राथमिक ज्ञान आणि प्रभावी संवाद कौशल्य यांच्या
साहाय्याने विद्यार्थी व नागरिकांना दर्जेदार सेवा देता येते. बदलत्या काळात संवाद
कौशल्य ही प्रत्येक कर्मचाऱ्याची मूलभूत गरज बनली असून, प्रत्येकाने आपल्या
व्यक्तिमत्त्वात व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि संवादातील स्पष्टता विकसित केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी 'प्रशासकीय साक्षरता आणि
जीवन कौशल्ये' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी
सांगितले की, प्रशासकीय कार्यात वेळेचे नियोजन, शिस्त, जबाबदारीची जाणीव, सकारात्मक वृत्ती, आवश्यक कौशल्ये आणि
अद्ययावत ज्ञान यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या डिजिटल युगात
प्रशासकीय साक्षरतेसोबतच डिजिटल साक्षरता, संगणक साक्षरता आणि
कायद्याचे प्राथमिक ज्ञान प्रत्येक कर्मचाऱ्याने आत्मसात करणे आवश्यक आहे.
प्रशासनात होत असलेल्या तांत्रिक बदलांचा स्वीकार करून सातत्याने स्वतःला अद्ययावत
ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कोर्स को-ऑर्डिनेटर नाझिया
मुल्लाणी यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण
केंद्रामार्फत सुरू असलेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. तसेच ऑनलाईन एम.कॉम., ऑनलाईन एम.एस्सी. (गणित)
आणि ऑनलाईन एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती
उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली.
डॉ. संजय चोपडे यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. दयानंद गावडे यांनी परिचय करून दिला. डॉ. नगीना माळी यांनी सूत्रसंचालन
केले, तर सुमन लोहार यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, सहाय्यक कुलसचिव दिलीप
मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. नितीन रणदिवे, विश्वनाथ वरुटे, रुपाली बन्ने, तेजस्विनी शिंदे यांच्यासह
शंभरहून अधिक हंगामी रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.

.jpeg)

No comments:
Post a Comment